सतीश जकातदार – ज्येष्ठ समिक्षक, फिल्म सोसायटी कार्यकर्ता
साभार : रुपवाणी
‘सिनेमा संस्कृती’चं अस्तित्व म्हटलं तर अगदी गेल्या शतकातलं! विसाव्या शतकात सिनेमाने अधिराज्य गाजविलं…. तर एकविसाव्या शतकात दिवसाचे चोवीस तास सिनेमाने आपल्याभोवती फेर धरला. सिनेमा कलेचं वय अवघं शंभर-सव्वाशे ! परंतु युगानयुगं तो जणू अस्तिवात आहे, इतकं त्यानं आपलं आयुष्य व्यापलंय! चित्रकला, शिल्पकला, संगीत, नृत्यकला, साहित्य-नाट्यकला आणि लोककला या साऱ्या कलांना हजारो वर्षांचा इतिहास… या कलांनी हजारो वर्षे मानवी समाजात ‘कला संस्कृती’ निर्माण केली. या ‘कला संस्कृती’भोवती मानवी समाज समृद्ध होत असतांनाच फोटोग्राफी, कॅमेऱ्याचा शोध लागला आणि ‘सिनेमा’ चा जन्म झाला ! विज्ञानाने ही किमया घडविली. विश्वात पहिलं चित्र कुणी काढलं, पहिली कविता कुणी लिहिली आणि पहिलं गाणं कुणी म्हटलं…. हे कुणीच सांगू शकणार नाही….. पण सिनेमा कलेची हकिगत अगदी तिच्या जन्मापासून तपशीलवार ज्ञात आहे. ‘सिनेमा’ ही एकमेव कला अशी आहे की तिचा इतिहास संपूर्णपणे नोंदला गेला आहे. जगातला पहिला चित्रपट कुणी निर्माण केला, केव्हा प्रदर्शित झाला आणि त्याची चित्रफीत आजही आपण पाहू शकतो… थोडक्यात ‘सिनेमा’ची जन्मकुंडली मांडता येते.
या कुंडलीत मानवी जीवनाचं सारे संचित सामावलं आहे. सिनेमा माणसाला विश्वरूप दर्शनाची प्रचिती देणारा आहे. आधुनिक मानवाला परीसस्पर्श करणाऱ्या व त्याच्यापुढे प्रतिसृष्टी निर्माण करणाऱ्या या माध्यमाने अवघ्या शंभर वर्षात जगाला कवेत घेतलं. तंत्रज्ञानाने हे अद्भुत माध्यम निर्माण केलं आणि तंत्रज्ञानाच्या उक्रांतीबरोबर ते विकसित होत गेलं. २८ डिसेंबर १८९५ साली सिनेमाचा जन्म झाला आणि ‘सेल्युलाईड युग’ अस्तित्वात आलं…. तर अवघ्या शंभर वर्षानंतर १९९५ साली ‘डीव्हीडी’ आली आणि ‘डिजिटल युग’ सुरू झालं. नित्यनूतन शोधांच्या अखंड प्रक्रियेमुळे जगाचा चेहरामोहरा जसा बदलत गेला तसा ‘सिनेमा’ ही बदलत गेला. त्यामुळे मानवी जीवनशैली जशी समृद्ध होत गेली तशी ‘सिनेमा संस्कृती’ ही बहरत गेली.
आपल्या देशात ‘सिनेमा संस्कृती’चा प्रारंभ १८९६ मध्ये झाला. भारतीय सिनेमाचे जनक कै. दादासाहेब फाळके कृत ‘राजा हरिश्चंद्र’ हा चित्रपट १९१३ साली प्रदर्शित झाला आणि ‘सिनेमा’ची मुहूर्तमेढ झाली आणि ‘सेल्यूलाईड युगा’ची नांदी झाली. प्रारंभीच्या काळात गोष्ट सांगण्याचे तंत्र म्हणून या कलेची सुरुवात झाली. जाणून-बुजून नव्हे तर अनुभवातून, स्वतःच्या प्रतिभेने अनेक कलावंतांनी सिनेमातून मनापासून गोष्टी सांगितल्या. त्यावर आधीच्या सर्व कलांचा प्रभाव होता. या गोष्टी सांगता सांगता सिनेमा ‘स्व’तंत्र कला म्हणून विकसित झाला. त्याला या प्रारंभीच्या काळातील कलावंतांचे कौशल्य आणि कसब कारणीभूत होतं. त्यांच्यामुळेच देशातील ‘ सिनेमा संस्कृती’ला आकार मिळाला.
सिनेमा हे जागतिक कलामाध्यम. त्यामुळे पारंपरिक कला व तंत्रज्ञान यांचा एकजिनसी मेळ साधत ‘ सिनेमा ‘ ही कला म्हणून जगभर विकसित होत होती. आपल्या देशातील सिनेमाही या प्रगतीसोबत समांतर धावत होता. सिनेमाची सुरुवात कृष्णधवल व मूक प्रतिमांनी झाली. मूकपट, बोलपट, रंगीत असे टप्पे तो जलदगतीने ओलांडत होता. तो अगदी अल्प काळात रूप पालटत होता. त्यातूनच देशी सिनेमा आकाराला येत होता. त्याचं संगोपन व संवर्धन ब्रिटिश राजवटीत, पारतंत्र्यात होत होतं.
‘आलमआरा’ या १९३१ साली आलेल्या पहिल्या बोलपटानंतर सिनेमा अवघ्या काही वर्षात देशातील प्रमुख भाषा बोलू लागला. या प्रादेशिक चित्रपटांनी त्या त्या प्रदेशाची सांस्कृतिक ओळख चित्रपटातून ठसवली. तेथील पारंपरिक कला आणि भवताल सिनेमातून प्रकाशात आणला. तर भाषेच्या भिंती ओलांडून हिंदी सिनेमा अहिंदी भाषिकांच्या घरात पोहोचवला. स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरही ‘सेल्यूलाईड युगा’तील सिनेमाने भारतीय माणसांवर राज्य केलं. प्रेक्षकांनीही त्याला आपलंसं केलं, खरंतर डोक्यावर घेतलं. सिनेमाची लोकप्रियता शिगेला पोचली. सिनेमाचा धंदा तेजीत आला.
या युगातील सिनेमानं इथल्या सामान्य माणसाला विविध संकल्पना दिल्या. सौंदर्याची जाण दिली, प्रेमाची चव दिली. त्याचा जीवनानुभव विस्तृत केला. प्रेमाचा आनंद, वियोगाचं दुःख, विश्वासघाताचा धक्का, पुर्नमिलनाचा आनंद या साऱ्या गोष्टी दिल्या. त्याने माणसाला हसायला, रडायला आणि कधीकधी विचार करायलाही लावलं. खेडूत प्रेक्षकांना बदलत्या काळाचं दर्शन घडविलं, क्वचित भानही दिलं. त्यांचा न्यूनगंड कमी करुन त्यांच्या व शहरवासियांमधील दरी कमी केली. याशिवाय भारतीय सिनेमाने प्रेक्षकांना संगीत व नृत्यांचा अतुलनीय आनंद दिला. मधुर पण काहीशा हलक्या-फुलक्या संगीताने त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण फुलविले. नव-नव्या पेहरावांपासून बोलण्याच्या-चालण्याच्या लकबी आणि केसांच्या ठेवणीपर्यंत घराघरातून न थोपवता येणारा शिरकाव केला. या युगातील सिनेमाने विविध कल्पना, वागणुकीचे रिती-रिवाज, सभ्यतेचे संकेत, हालचालीतील सूचकता आणि भाव-भावनांच्या एकूण आवाक्याचं दर्शन घडविलं. या देणग्या खिशाला परवडणाऱ्या पैशात देऊन सिनेमाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सरत्या काळात या युगात अनेक पिढ्या सिनेमाच्या पकडीत वाढल्या. त्यातूनच या युगातील ‘सिनेमा संस्कृती’ भोवती वलय निर्माण झालं. त्याचे पडसाद आजही अनेकवेळा उमटत आहेत.
मात्र या युगातील ‘सिनेमा संस्कृती’ला आकार देण्यास प्रारंभ झाला स्वातंत्र्यानंतर, १९४७ साली याच सुमारास सत्यजीत राय यांनी ‘कलकत्ता फिल्म सोसायटी’ची स्थापना करुन प्रेक्षक चळवळीचे शिंग फुंकले. देश प्रजासत्ताक झाल्यावर भारताच्या पुर्नबांधणीचा कार्यक्रम राबविण्यास प्रारंभ झाला. त्यात ‘सिनेमा’चाही विचार झाला. आधीच्या पन्नास वर्षात विस्तार पावलेल्या सिनेमाला आलेले व्यापक पण बाजारू स्वरूप लक्षात घेऊन सरकारने ‘फिल्म एन्क्वायरी कमिटी’ नेमली. या समितीने सिनेमाच्या निर्मिती, वितरण, प्रदर्शन व प्रेक्षक या चार बाजूंचा एकत्र विचार करुन अभ्यासपूर्ण शिफारसी सादर केल्या. या शिफारशींचे मुख्य सूत्र होते चित्रपटाचे केवळ धंदेवाईक व बाजारू स्वरूप बदलून विशुद्ध कलापूर्ण चित्रपट निर्मितीला चालना मिळावी आणि देशात प्रगल्भ ‘सिनेमा संस्कृती’चे वातावरण निर्माण व्हावे.
यासाठी प्रथम सर्वोत्कृष्ट चित्रपटांना राष्ट्रीय पारितोषिक देण्यास प्रारंभ झाला. त्यावेळी देशात हिंदीसह पंधरा-सोळा भाषेत चित्रपट निर्माण होत होते. पारितोषिकांमुळे अन्य भाषिक चित्रपटांचा गवगवा झाला.
स्वातंत्र्यपूर्व काळात ‘हॉलिवुड’ आणि देशी चित्रपटांचीच चलती होती. सरकारने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरवून ‘हॉलिवुड’ वगळता निर्माण होत असलेल्या जगातील इतर विदेशी चित्रपटांची देशी चित्रपटकारांना व प्रेक्षकांना ओळख करुन दिली. त्यातूनच प्रेरणा घेऊन अनेक नव्या-जुन्या चित्रपट कारांनी नव्या शैली-धाटणीचे चित्रपट निर्माण केले. या ‘महोत्सवा’मुळे देशभर महोत्सव संस्कृती रुजण्यास सुरुवात झाली.
याच काळात सत्यजीत राय यांनी पथेर पांचाली या चित्रपटाची निर्मिती करुन ‘शुद्ध सिनेमा’चे बीज पेरले आणि भारतीय सिनेमात ‘नव सिनेमा ‘ ची वाट मुक्रर केली. याच सिनेमाने भारतीय सिनेमाला जगाच्या नकाशावर नेले. सरकारने उत्तम चित्रपटांना वित्त पुरवठा करणारी यंत्रणा सुरू केली. त्यातूनच ‘समांतर सिनेमा’ चा प्रवाह सुरू झाला. १९८०-९० पर्यंत याच ‘समांतर सिनेमा चळवळी’ने फॉर्म्युलावादी लोकप्रिय सिनेमासमोर रसिकप्रिय सिनेमाचा पर्याय प्रेक्षकांसमोर ठेवला.
चित्रपटाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणारी ‘फिल्म इन्स्टिट्यूट’ सुरू करण्यात आली. स्वातंत्र्यापूर्वी चित्रपट प्रशिक्षणाची अशी कोणतीच सोय उपलब्ध नव्हती. देशाच्या बहुविध प्रदेशातून आलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. यातीलच गुणवान विद्यार्थ्यांनी आपआपल्या प्रदेशातील प्रादेशिक चित्रपटांना आकार दिला. चित्रपटांचा आस्वाद म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व विशद करणाऱ्या ‘फिल्म ॲप्रिसिएशन’ कोर्सचा आराखडा या फिल्म इन्स्टिट्यूटने तयार केला. त्यातूनच या कार्यशाळा देशभर घेतल्या गेल्या. त्यातूनच चित्रपट विषयक लेखन व समीक्षेला दिशा मिळाली.
समितीच्या शिफारशीनुसार चित्रपटाचे जतन करणारे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय सुरु करण्यात आले. तेथे नव्या-जुन्या देशी व विदेशी अभिजात चित्रपटांची जपवणूक करण्यात आली. या संग्रहालयामुळेच देशभरातील प्रेक्षकांना उत्तम चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध झाली.
प्रेक्षकांची सिनेमा विषयक अभिरुची उंचावण्यासाठी समितीने बाल्यावस्थेत असलेल्या ‘फिल्म सोसायटी चळवळी’ला प्रोत्साहन देण्याचे धोरण आखले. त्यातून देशभर प्रेक्षक चळवळीचे जाळे विणले गेले. अनेक उत्साही रसिकांनी ‘फिल्म क्लब’ स्थापन केले. याच ‘क्लब’नी रसिकप्रिय चित्रपटांची पाठराखण केली. अभिजात चित्रपटांची समाजाला ओळख करुन दिली. त्यासाठी नियमित चित्रपट प्रदर्शन, महोत्सव भरविले व रसास्वाद कार्यशाळा घेतल्या. त्यातूनच नव्या-जुन्या प्रतिभावंतांच्या सिनेमांना रसिक प्रेक्षक लाभला.
‘चित्रपट संस्कृती’ संवर्धनासाठी सरकारने आखलेल्या धोरणामुळे १९८०-९०पर्यंत देशात आस्ते आस्ते सकस ‘सिनेमा संस्कृती’चे वातावरण निर्माण होत होते, तर दुसऱ्या बाजूला फॉर्म्युला प्रधान धंदेवाईक चित्रपटांचा, त्यातील चंदेरी तारे-तारकांचे ग्लॅमर यांचा गाजावाजाही तितकाच होत होता. ‘सेल्युलाईड युगात’ हर एक दशकात येणाऱ्या नव तंत्रज्ञानाचा कायम सिनेमा लोकप्रिय होण्यास हातभार लागत असे. पार्श्वगायन, आकाशवाणी, विविध भारती, सिलोन रेडिओ, ग्रामोफोन रेकॉर्डस, ऑडिओ कॅसेट, ईस्टमनकलर, सिनेमास्कोप या साऱ्या तंत्रामुळे सिनेमाच्या लोकप्रियतेत नेहमीच वाढ होत राहिली. अशातच १९८० साली दूरदर्शन व त्या पाठापोठ रंगीत टेलिव्हिजन आणि व्हीडीओ आला. या नव्या तंत्राने सिनेमाच्या लोकप्रियतेला प्रथमच धक्का दिला. घरच्या घरी चित्रपट पाहण्याची सोय उपलब्ध झाली आणि धंदेवाईक आणि समांतर या दोन्ही चित्रपटांचा प्रेक्षक घटला.
१९९०नंतर आर्थिक उदारीकरण आणि जागतिकीकरणाचे धोरण सरकारने स्वीकारले. त्याचा पहिला फटका सिनेमा व्यवसायाला बसला. खाजगी वाहिन्या सुरू झाल्या. डीव्हीडी आली आणि ‘डिजिटल युग’ सुरू झाले. डिजिटल फिल्म मेकींग सुरु झालं. २१व्या शतकात तर संगणक, इंटरनेट, सॅटेलाईट, ओटीटी, सोशल मिडीया, मोबाईल, स्मार्ट फोन अशा अनेक माध्यमांच्या झंजावाताने ‘माध्यम कल्लोळ’ निर्माण झाला. त्यात लोकांचे भावविश्व आणि समाज जीवन व्यापले गेले; पूर्णतः अडकले ! ‘सिनेमा संस्कृती’च्या एकरेषीय उत्क्रांतीला खिळ बसली. या नव्या ‘दृक-श्राव्य’ क्रांतीने ‘सिनेमा संस्कृती’ची दिशा बदलली.
‘डिजिटल युगाने’ माणसांचे जगणं पूर्णतः व्यापून टाकले. आपल्या आवडीनिवडी, विचार करण्याची पद्धत, आपल्या सवयी आणि अगदी आपल्या भावविश्वावरही या डिजिटल माध्यमांनी नकळतपणे ताबा मिळविला. एकीकडे माध्यमांचे लोकशाहीकरण तर दुसरीकडे स्वैरपणा या कात्रीत ‘सिनेमा संस्कृती’ अडकली. त्याचमुळे ‘सिनेमा संस्कृती’बाबत नवे गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण झाले आहेत?
सर्व ताकद आपल्या हातात असताना या माध्यम जंजाळातून उत्तम सिनेमाची निवड कशी करायची? तंत्रदृष्ट्या परिपूर्ण सिनेमाचे कलात्मक अधिष्ठान कसे सांभाळायचे? मार्केटिंगचा मारा करुन लोकप्रिय होणाऱ्या चित्रपटांच्या वावटळीत ‘समांतर’ सिनेमाचे अस्तित्व कसे टिकवायचे? सिनेमाच्या सौंदर्यशास्त्राचे बदलते नियम नव्या संदर्भात कसे शिकवायचे? शाळा, महाविद्यालयापासून त्याची सुरुवात कशी करायची?
‘सिनेमा संस्कृती’ संवर्धनासाठी सरकारने निर्माण केलेल्या आणि निगुतीने कार्य केलेल्या साऱ्या संस्थांचे नुकतेच विलीनीकरण करून त्यांचे स्वायत्त अस्तित्व संपुष्टात आणले. आता नव्याने निर्माण झालेली अर्धव्यावसायिक संस्था ‘संस्कृती’ संवर्धनाचे कार्य कोणत्या निकषावर व निष्ठापूर्वक करणार? प्रेक्षक चळवळीचा ‘फोकस’ या डिजिटल काळात कसा जोपासायचा? डिजिटल तंत्रामुळे चित्रपटाच्या अनेक व्यामिश्र तंत्रांचे सुलभीकरण झाले असले तरी त्यामुळे भरमसाठ होणाऱ्या चित्रनिर्मितीला आवर कसा घालायचा? आणि या सगळ्यात चित्रपटाचा व्यवसाय आणि दर्जा कसा सांभाळायचा? चित्रपट ही कलाकृती चित्रपटगृहाच्या ‘मोठ्या पडद्यावर’ शांत, अंधाऱ्या पोकळीत, समरसिकांसमवेत विलक्षण चेतना देते का घरातल्या टीव्ही स्क्रीनच्या ‘छोट्या पडद्यावर’ उजेडातच अनुभवास येते? अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे शोधत डिजिटल युगातील ‘सिनेमा संस्कृती’ला आकार देण्याचे आव्हान आता येणाऱ्या काळापुढे आहे. सिनेमाची जन्म कुंडली मांडता येत असली तरी त्याचे भवितव्य जोखणे जिकिरीचे झाले आहे, एवढे निश्चित !
सतीश जकातदार
ज्येष्ठ समिक्षक, फिल्म सोसायटी कार्यकर्ता
साभार : रुपवाणी
Leave a Reply