आयुष्यात काही माणसांना भेटायचं राहूनच जातं.. अशी व्यक्ती या जगातून गेल्यावर ती खंत, मनात कायमची घर करुन राहते.. इसाक मुजावर यांचे हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीवरील लेख मी लहानपणापासून आधाशासारखे वाचत होतो.. कालांतरानं, एक वेळ अशी आली की, त्यांच्याच पुस्तकाचं मुखपृष्ठ करण्याची संधी मला चालून आली होती.. मात्र कुठंतरी बिनसलं व ती संधी हुकली.. आणि नंतर काही महिन्यातच इसाक मुजावर यांनी एक्यांशीव्या वर्षी, आपला मायानगरीतील मुक्काम हलवला.
२२ मे १९३४ रोजी कोल्हापूर येथे इसाक मुजावर यांचा जन्म झाला. लहानपणीच वडील गेल्यामुळे शिक्षणासाठी ते मामांकडे राहू लागले. आई शिक्षिका होती. मामा, भालजी पेंढारकर यांचेकडे कामाला होते, सहाजिकच लहानपणापासून इसाकने, चित्रपटसृष्टी जवळून अनुभवली.. व वयाच्या बाराव्या वर्षी ‘तारका’ या चित्रपट विषयक मासिकात, ‘वाल्मिकी’ या चित्रपटात काम करणाऱ्या राज कपूरवर लेख लिहून कारकिर्दीचा ‘श्रीगणेशा’ केला..
जेमतेम दहावीपर्यंतच शिक्षण घेऊन त्यांनी सिनेलेखन हाच उपजिवीकेचा मार्ग पत्करला. त्यांचं लेखन हे साधं-सोपं, ओघवती होतं. त्यांनी कधीही अलंकारिक भाषा वापरली नाही. कोल्हापूर येथे त्याकाळी प्रकाशित होणाऱ्या ‘लोकशक्ती’ मधूनही त्यांनी लेखन केले..
नाशिक येथील ‘गावकरी’ दैनिकातर्फे १९५८ साली ‘रसरंग’ या कला व क्रीडा विषयक साप्ताहिकाची सुरुवात झाली. १९५९ पासून इसाक मुजावर यांनी ‘रसरंग’ या साप्ताहिकाची निवासी संपादक म्हणून, धुरा सांभाळली. येथील २० वर्षांच्या कालावधीत त्यांनी अनेक लोकप्रिय सदरांतून हिंदी-मराठी चित्रपट सृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक, लेखक, संगीतकार, गीतकार, नायक, नायिका, विनोदी कलाकार, तंत्रज्ञ यांच्यावर सविस्तर व माहितीपूर्ण लेखन केले.
‘फ्लॅशबॅक’ या सदरामध्ये जुन्या कलाकारांच्या स्मृती जागवल्या. ‘सवाल-जवाब’ मधून चित्रपटाविषयी माहिती दिली. ‘हमारी याद आयेगी’ सदरातून आठवणींना, बोलतं केलं.. या सर्व लेखनात त्यांनी कधीही अफवांना दुजोरा दिला नाही की कलाकारांच्या खाजगी गोष्टी, चव्हाट्यावर मांडल्या नाहीत..
१९७८ साली ‘रसरंग’ चा त्यांनी निरोप घेतला व मुंबईत ‘चित्रानंद’ साप्ताहिक सुरु केलं. ‘चित्रानंद’ चे दिवाळी अंक संग्रही ठेवण्याजोगे, आकर्षक व माहितीपूर्ण असायचे. मराठी चित्रपटांविषयी अंकात भरपूर मजकूर असे. एखादा कलाकार गेल्यानंतर त्याच्यावरती विषेशांक प्रकाशित केला जात असे. दहा वर्षे हा अंक नियमित प्रकाशित होत होता.. पुढे तो बंद पडला..
त्यानंतर इसाक यांनी ‘जी’ व ‘माधुरी’ या पाक्षिकांसाठी लेखन सुरु ठेवले. पन्नास वर्षांच्या त्यांच्या कारकिर्दी दरम्यान, त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली. भगवान यांच्यावरचं ‘अलबेला’, ‘आई, माॅं, मदर’, दादा कोंडके यांच्यावरचं ‘एका सोंगाड्याची बतावणी’, ‘गुरुदत्त-एक अशांत कलावंत’, ‘चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ’, ‘चित्रपट सृष्टीतील काही एकतर्फी प्रेमकहाण्या’, सुलोचना दीदींवरील ‘चित्रमाऊली’, ‘तीन पिढ्यांचा आवाज-लता’, ‘पेज थ्री’, नूरजहाँ ते लता’, ‘दादासाहेब फाळके’, ‘मराठी चित्रपटांचा इतिहास’, ‘मराठी चित्रपटांचा १०० वर्षांचा आढावा’, ‘मीनाकुमारी’ इत्यादी अनेक पुस्तके त्यांच्या नावावर आहेत..
इसाक मुजावर यांच्या सिनेजगतावरील योगदानाबद्दल मराठी चित्रपट महामंडळाने त्यांचा ‘चित्रभूषण’ पुरस्कार देऊन गौरव केला.
जुन्या पिढीतील कलाकार व तंत्रज्ञांसोबतच्या मैत्रीपूर्ण संबंधांसारखेच नव्या पिढीतीलही कलाकार व तंत्रज्ञानांसोबत त्यांचे आपलेपणाचे संबंध होते. म्हणजेच भालजी पेंढारकरांपासून अश्विनी भावेपर्यंतच्या सर्वांविषयी त्यांनी विपुल लेखन केले.
त्यांना अस्थम्याचा त्रास होता. वार्धक्याने त्यांची तब्येत खालावत गेली. शेवटच्या दिवसांत त्यांची मुलगी व जावई देखभाल करीत होते. अखेर २६ फेब्रुवारी २०१५ रोजी एका सिनेबखरकाराची ‘लेखनसीमा’ पूर्ण झाली..
इसाक मुजावर यांचं लेखन वाचूनच मला सिनेसृष्टीविषयी लिहिण्याची प्रेरणा मिळाली.. व अकरावीत असताना मी राजबागेत ‘सत्यम् शिवमय सुंदरम्’ चित्रपटाच्या सेटवर भेटलेल्या कलाकारांविषयी, मासिकात पहिला लेख लिहिला..
ज्या पुस्तकाचं मुखपृष्ठ मी करणार होतो, त्या पुस्तकाचं नाव होतं.. ‘मधुबाला ते माधुरी’.. जे त्यांच्या जाण्यामुळं, नंतर कधीही प्रकाशित झालंच नाही.
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२-४-२२.
Leave a Reply