![cinemaved-mollywood](https://www.marathisrushti.com/articles/wp-content/uploads/sites/3/2023/03/cinemaved-mollywood-600x381.jpg)
शंभर वर्षांच्या सिनेइतिहासात ‘शोले’ चित्रपटाचं स्थान अढळ आहे. या चित्रपटाने पूर्वीच्या लोकप्रियतेची सर्व रेकॉर्ड मोडीत काढली. या चित्रपटातील गाणी, संवाद यांच्या कॅसेटची विक्री लाखोंच्या संख्येत झाली.
याच चित्रपटापासून प्रेरणा घेऊन नाशिकमधील मालेगाव शहरातील काही उत्साही कलाकारांनी एकत्र येऊन ‘मालेगाव के शोले’ हा चित्रपट, व्हिडीओ शुटींग करुन तयार केला. त्याच कथेचे, त्याच संवादांचे,त्याच गाण्यांचे विडंबन करुन, तसंच आऊटडोअर शुटींग करुन चित्रपट पूर्ण झाला. त्याच्या व्हिडीओ कॅसेटच्या अनेक प्रती काढून तो शहरात वितरीत केला. आपल्याच शहरातील कलाकारांनी तयार केलेल्या या चित्रपटास स्थानिक रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. तेव्हापासून या हौशी निर्माते, दिग्दर्शक, कलाकार व तंत्रज्ञांचा उत्साह वाढला व त्यांनी गाजलेल्या हिंदी, इंग्रजी चित्रपटांचे विडंबन असणारे ‘माॅलीवुड’चे अनेक चित्रपट तयार केले.
‘शोले’ नंतर त्यांनी ‘डाॅन’, ‘करण अर्जुन’, ‘गजनी’, ‘शान’, ‘लगान’, ‘सुपरमॅन’ असे धम्माल चित्रपट काढले. ही कल्पना सुचली, नासीर शेख नावाच्या युवकाला. तो एक स्वतःचं व्हिडीओ पार्लर चालवत होता. साहजिकच त्याने व्यवसायाच्या निमित्ताने अनेक हिंदी, इंग्रजी चित्रपट पाहिले. ते पाहून त्याला चित्रपट निर्मितीचे डोहाळे लागले. त्याने हौशी कलाकार गोळा केले. जे कुठेना कुठे हातमाग किंवा यंत्रमागावर रोजीरोटीसाठी काम करीत होते. नायिकेच्या भूमिकेसाठी मालेगावात कोणीही स्त्री मिळेना म्हणून शेजारच्या गावातील स्त्रीला आणावे लागले.
क्रेन शाॅट घेण्यासाठी यांच्याकडे क्रेन नव्हती, त्यावर त्यांनी बैलगाडीच्या जू वर कॅमेरामनला बसवून मागून गाडी खाली जमिनीकडे ओढली, त्यामुळे कॅमेरा हळूहळू वरती जाऊन क्रेन शाॅटचा ‘इफेक्ट’ मिळाला. झूम शाॅटसाठी कॅमेरामनला सायकलवर बसवून दोघांनी सायकल वेगात नायिकेपर्यंत नेली व पडद्यावर झूम शाॅटचा परफेक्ट ‘रिझल्ट’ मिळाला.
कमी भांडवलात नासीरची हौस भागत होती. निर्मितीचा आनंद मिळत होता. स्थानिक कलाकारांना पडद्यावर चमकण्याची संधी मिळत होती. दहा पंधरा वर्षांनंतर पायरसी मुळे त्याला चित्रपट काढणं परवडेनासं झालं. त्याने हा व्यवसाय बंद केला व ‘प्रिन्स’ नावाचे हाॅटेल उघडून तो आता गल्ल्यावर बसलेला असतो…
ही आठवण सांगण्याचं कारण असं की, आजच्या ‘लोकमत’मध्ये समीर मराठे यांचा मालेगावच्या सिने शौकीनांवरचा एक लेख प्रसिद्ध झाला आहे. कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशात गेले दहा महिने सिनेमा थिएटर पूर्णपणे बंद होती. ती आता नुकतीच सुरू झाली. शहरातील ‘सेंट्रल’ सिनेमागृहात शाहरूख, सलमानचा ‘करण अर्जुन’ हा गाजलेला चित्रपट सुरू झाल्यानंतर रसिकांनी शिट्या, टाळ्यांनी थिएटर डोक्यावर घेतले. काहींनी थिएटरमध्ये जल्लोषात फटाकेही उडवले. हे धाडस करणाऱ्यांविरुद्ध पोलीसांनी आता गुन्हे दाखल केले आहेत.
हे वाचून इतरांना धक्का बसेल, मात्र मालेगाववाले आहेतच ‘पिक्चर वेडे’! त्यांना चित्रपट पहाणे, हेच एक ‘वेड’ आहे. त्यासाठी अजूनही ते पंचवीस वर्षांपूर्वीसारखंच वागतात. ‘फर्स्ट डे, फर्स्ट शो’ साठी ब्लॅकने तिकीटं काढतात. तिथं थिएटर मालकसुद्धा आधी काळ्या बाजारासाठी तिकीट ठराविक लोकांना देतात. आता मालेगाव सोडून भारतात सर्वत्र चित्रपटाची, थिएटरची परिभाषा बदलली आहे, अत्याधुनिक मल्टिप्लेक्स थिएटर्स, काॅम्प्युटराईज तिकीट, डाॅल्बी साऊंड सिस्टीम, इ. सोयी झालेल्या आहेत. मालेगाव मात्र सिनैशौकीनांसाठी अजूनही पन्नास वर्षांपूर्वीचं जुन्या जमान्यातीलच राहिलं आहे.
अमेरिकेत कुठेतरी एका ठिकाणी शंभर दिडशे वर्षांपूर्वीचं जनजीवन कसं होतं हे दाखवणारं प्रेक्षणीय स्थळ आहे असं मी वाचलं होतं. तिथं त्या काळातील वेशभूषेतील माणसं हिंडत असतात. त्या काळच्या इमारती, दुकानं, घोडागाडी प्रेक्षकांना पहायला मिळते. अगदी तसंच जुन्या काळातील चित्रपट प्रेमी आणि थिएटर पहायचे असतील तर आपल्याला ‘माॅलीवुड’च्या मालेगावलाच भेट द्यावी लागेल…
© – सुरेश नावडकर
मोबाईल ९७३००३४२८४
या रचनेचे सर्वाधिकार रचयिता © सुरेश नावडकर यांच्याकडेच आहेत
Leave a Reply