लहानपणी प्रत्येक मुलाचे काही ना काही स्वप्न असते. कोणाला डॉक्टर, इंजिनियर, सी.ए. वकील, आर्किटेक तर कोणाला शास्त्रज्ञ व्हायचं असत. स्वप्न नक्कीच चांगलीच आहेत पण तरीही कोणाला देशाचा चांगला नागरिक, चांगले आई-बाबा, पालक व्हावेसे वाटतेच ना? प्रत्येकाने स्वत:च्या आंतरमनात शिरून विचार करावा की मग असे लक्षात येईल की या सगळ्या स्वप्नांतून मी नक्की काय प्राप्त केले? मला जे हवे होते ते मिळाले का? मी जे शिक्षण किंवा डिग्री घेतली याने मी चांगला आदर्श मुलगा/मुलगी, पालक, आई-बाबा नक्की झालो असेन पण देशाचा चांगला नागरिक झालो का? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात सतत रुंजी घालत असतो. आणि मग समाजात भ्रष्टाचार, खून, मारामाऱ्या, लबाडी, व्यसनासाठी खोट बोलणारी मूल/मुली बघितली, कोवळ्या जीवांची हे जग बघण्या अगोदर भ्रूणहत्या करणारे नराधम बघितले की वाटते शिक्षण घेऊन सुद्धा माणूस सुधारत नसेल तर त्या शिक्षणाला, संस्कारांना काय अर्थ आहे. मोठमोठया डिग्र्या काय कामाच्या? हे सगळे वैभव काय कामाचे? जगातील शाश्त्रज्ञांनी एवढे कष्ट घेऊन शोध लावले पण काही माणसे त्याचा उपयोग मानवाच्या हितासाठी न करता विध्वसंक कामासाठी करतात ! संतांच्या शिकवणी/बोल तोकडे पडतात का? माणसाला आपल्याच माणसांशी सत्याने, प्रेमाने, नीती धर्माने व माणुसकीने वागता येत नसेल तर या सगळ्याचा काय उपयोग? त्याला माणूस म्हणून तरी जगायचा अधिकार आहे का? अर्थात ही गोष्ट किंवा नियम किंवा स्वभाव सर्वांना सारखा लागू होईल असे नाही तरीही, पण आणि परंतू राहतातच…..असो.
सध्याच्या शालेय आणि कॉलेजीय स्तरावरील अभ्यासक्रमात भाषा, गणित, भौतिक, रसायन, अर्थशास्त्र, अकौंटन्सी, तंत्रशिक्षणासारख्या विषयांच्या आकर्षणात शाळा, विद्यापीठे आणि विद्यार्थ्यांकडून इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र ह्या विषयांना कमी महत्व दिले जाते असे वाटते. कारण ४०-५० दशकापूर्वी इतिहास-भूगोल-नागरिकशास्त्र असा एक १०० मार्कांचा पेपर असे किंवा इतिहास, भूगोल आणि ना.शास्त्र असे १०० मार्कांचे वेगवेगळे स्पे.विषय निवडण्यास मिळत असत. आत्ता ही असतील? एखाद्या गावातून शहरात येणाऱ्या मुलाची जी अवस्था होते तशी सध्या नागरिकशास्त्राची, इतिहास-भूगोलामध्ये सँडविच झाल्यासारखी वाटते. प्रश्नपत्रिकेतही या विषयावर एखादाच प्रश्न व तोही क्लिष्ट व्याख्या व मुद्दे पाठ करून लिहावा लागत असल्याने मुले शक्यतो हा विषय ऑप्शनला टाकतात. साहजिकच सध्याच्या युगात आवश्यक असणाऱ्या वरील विषयांत म्हणजे “इभूना” हे विषय सोडून इतर विषयात प्राविण्यासह प्रगती करूनसुद्धा दैनदिन जीवनात आणि नोकरी धंद्यात त्यांचा किती उपयोग होतो हा प्रश्न सर्वच पालक आणि विद्यार्थ्यांसमोर आहेच. मग काहीजण देशाचे कर्तव्यदक्ष नागरिक बनण्याचे शिक्षण न घेताच शालेय आणि कॉलेजीय शिक्षण पूर्ण करतात असे नाईलाजाने म्हणावेसे वाटते.
देशाची राज्यघटना, लोकशाहीचा राज्य घटनेला अभिप्रेत असलेला अर्थ, देशातील नागरिकांची कर्तव्ये याबाबतीत काही नागरिक उदासीन आहेत असे वाटते आणि त्यांच्या रोजच्या कृतीतून हे दिसून येते याला नागरिकशास्त्रासारख्या महत्वाच्या विषयाकडॆ केलेले अक्षम्य दुर्लक्षच कारणीभूत आहे असे आपल्याला वाटत नाही का? काहीजण नागरिकशास्त्राचा चांगला अभ्यास करतात परंतू त्यांच्या वागण्या बोलण्यातून किंवा कृतीतून ते दिसून येत नाही. परिसर आणि पर्यावरणाचे रक्षण कसे करावे ह्याचे शिक्षण नागरिकशास्त्र विषयातून अगदी शालेयस्तरावर दिले जाते परंतू मोठेपणी त्याचा विसर पडून “गिरवावे धडे नागरिकशास्त्राचे, ऐकावे मनाचे” असे होऊन जाते. याला कारण अमर्याद वागणे, स्वैराचार आणि इच्छाशक्तीचा अभाव.
आपल्या देशात शासन आणि व्यक्तिगत पातळीवर नागरिकशास्त्र या विषयाला महत्व दिले जाते ते फक्त प्रशासकीय (आय.ए.एस. आणि आय.पी.एस) अश्या उच्च पदासाठी असणार्या स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करितांना. परंतू ज्यांना प्रशासकीय सेवेत नोकरी करून आपले भविष्य घडवायचे असते किंवा देशातील नागरिकांची सेवा करायची असते अश्या परीक्षेस बसणाऱ्यांची संख्या फारच कमी असते. नागरिकशास्त्र ह्या विषयाचे ज्ञान सर्व जनतेसाठी असावयास हवे व ते लहानपणीच, संस्कारक्षम वयात म्हणजे शालेय आणि कॉलेजीय स्तरावर दिले गेले पाहिजे. त्याची जाण प्रत्येकाने ठेवावी एवढीच अल्प अपेक्षा शासन आणि शिक्षण संस्थानची आहे. एकंदरीतच केंद्र आणि राज्य स्थरावर सध्याच्या काळात जी काही राजकीय व सामाजिक उलथापालथ होत आहे त्यावरून असे वाटते की राजकीय व सामाजिक क्षेत्रासाठीदेखील नागरिकशास्त्राची पदवी परिक्षा अनिवार्य ठेवली तर राजकारण व सहकार यात निश्चित सुधारणा होईल.
वरील उल्लेखलेले सर्व विषय व्यक्तीमत्व विकास व व्यवसायांसाठी आवश्यक असल्याने त्यांचे महत्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना समजते. मात्र नागरिकशास्त्रासारखा विषयाने देशाच्या जडणघडणीत आणि व्यक्तिगत उन्नतीत बरेच महत्व आहे. परंतू समाजाच्या व देशाच्या एकंदरीतच मर्यादशील शिस्तीच्या दृष्टीने याला अनन्यसाधारण महत्व आहे. हा विषय सर्व पक्षांचे पदाधिकारी, संसंद सदस्य, सामान्य नागरिक, विद्यार्थी आणि गावखेड्यातील गोरगरिबांना विविध माध्यमांच्या साह्याने जसे इलेट्रॉनिक आणि प्रिंट मिडिया, स्पर्धा, पथनाट्य स्वरुपात आणि मातृभाषेत समजावून सांगितला तर नक्की स्वभावात आणि वागणुकीत फरक पडेल. तसेच कार्यशाळेतून त्याचे येणाऱ्या काळात काय महत्व आहे ते सांगून आणि त्याला कृतीशील उपक्रमांची जोड देऊन लोकशाही, समाजवाद व राष्ट्रीयत्व यांचे महत्व मनावर बिंबवले तर नागरिकांकडून भ्रष्टाचार, विध्वंसक कृत्ये घडणार नाहीत. जातीय, धार्मिक वा प्रांतीय भेदांच्याऐवजी राष्ट्रीयत्वाची भावना त्यांच्या मनात जागृत होईल व शांतता, विकास व सहजीवन या दिशेने भविष्यात आपल्या देशाची वाटचाल अधिक चांगल्या दिशेने होईल असे वाटते !
जगदीश पटवर्धन, दादर
Leave a Reply