नवीन लेखन...

सीकेपी आणि सोडे – एक अतूट नातं

तुम्ही सीकेपी लोकांनी ‘सोडे’ या सुक्या बाजाराला थोडं जास्तच “ओव्हर हाईप” करून ठेवलंय असे बोलणारे काही मित्र व काही मोजकेच ओव्हर हेल्थकॉन्शस ज्ञातीबांधव मला ‘बोअर टाईप’ वाटतात. ओव्हर हाईप ?

अहो हे सोडे म्हणजे काय नुसता खायचा पदार्थ वाटला काय तुम्हाला? की टाकली जाळी, काढला समुद्रातून, वाळवला, शिजवला, खाल्ला आणि झालं. अहो सोडे म्हणजे आमचा जीव की प्राण, आमची अस्मिता – आमची शान, आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक वगैरे वगैरे. या सोड्यांच्या गप्पांवरपण आम्ही तास दोन तास घालवू शकतो. दिवाळीत भेट म्हणून आलेल्या प्रशांत कॉर्नर च्या चमकदार मिठाईच्या बॉक्सकडे जसं प्रेमाने बघतो ना त्या पेक्षा जास्त प्रेमाने टेबलावर आणून ठेवलेल्या सोड्याच्या पिशवीकडे पाहतो आम्ही. आपल्या सीकेपी फुड फेस्ट ला ग्लॅमरस सेलिब्रिटी गेस्ट रेशम टिपणीस भेट देते तेव्हा तिच्याकडे लोक जितक्या कौतुकाने पाहत बसतात त्यापेक्षा जास्त कौतुकाने रेशम स्टॉल वर मांडलेल्या सोड्यांकडे पाहत असल्याचं मी पाह्यलंय, पटत नसेल तर विचारा तिला. जूनपासून ऑगस्टपर्यंत आम्हा सीकेप्यांच्या जेवणाला आणि जीवनाला (दोन्ही एकच असतं)असलेला एकमात्र भक्कम आधार म्हणजेच हे सोडे..उभे सोडे…नुसतेच उभे सोडे नाहीत तर मुरुडचे – दिघीचे उभे सोडे. तसं पाहिलं तर समुद्र हा सगळीकडे सारखाच, पण कोणजाणे असं काय आहे त्या मुरुडच्या समुद्रात की आपल्या जीवावर उदार होत, लांबसडक सोडे बनून, स्वतःचा भाव कमालीचा वाढवत, सीकेपी घरात आणि ताटात पडू इच्छिणाऱ्या कोलंब्या फक्त तिथेच पोहायला जातात. असो.

तर आपले हे लाडके सोडे… हे सोडे बाजारातून आणायचे नसतात बरं का …ते घरी येतात. तुमच्या घरातले सोडे संपत आले की आपोआप ते येतात. साधारणपणे प्रत्येक सीकेपी घरामागे एक ओळखीचा सोडेवाला फिक्स असतो तो बरोबर वेळेवर ते आणून देतो. जणू एखादा पाहुणा यावा तशी याची उठबस केली जाते. म्हणजे खूप वर्षांपूर्वी आमच्या घरी मुलुंडचे रणदिवे सोडे देत असत, ठाण्यातल्या अनेक घरात प्रधान काका सोडे देत असत, अलीकडल्या काळात नव्या दमाचे ठाण्याचे साई, प्राजक्ता, कौशिक, पुण्याचे देशमुख ही मंडळी फेसबुक आणि फूड फेस्ट मध्ये सोडे विकताना दिसतात. याना नुसतं पाहूनदेखील आपल्याला किती हायसं वाटतं. आपलेच सोडे कसे सर्वात बेस्ट हे तर या सगळ्यांकडून तुम्ही एकदा तरी ऐकावच. इतर काही जण अगदी अतिरेक करत जणू काही त्या लाल गुलाबी कोलंब्याना अंगाखांद्यावर खेळवलंय आणि मगच त्यांचे सोडे करून तुम्हाला दिलेत अशा अविर्भावात, अहो १६०० रुपयाकडे काय बघता .. बाहेर २००० चा भाव सुरु आहे, थोडाच माल शिल्लक आहेत, चला पाव किलो तरी घेऊन टाका, अशा प्रकारे गळेपडू मार्केटिंगपण करतात.

सोडे म्हणजे सीकेपी घरातली एक जीवनावश्यक वस्तूच म्हणा. तूरडाळ एकशे चाळीसची दोनशे झाली तर महाग महाग म्हणून ओरडणारे आम्ही दोन हजारावर गेलेल्या सोड्याच्या भावाची काळजी नाही हो करत कधी. एकवेळ सणासूदीला घ्यायच्या साड्यांची खरेदी पुढे ढकलू पण मुरुडच्या सोड्यांच्या खरेदीत हयगय नाही. अमेरिकेला मुलाकडे जाताना एक जोड कपडे कमी नेतील पण मुलासाठी २ किलो सोडे वेगळे आणि पाव किलोच्या चार पाच पुड्या तिथल्या मित्रपरिवाराला वाटण्यासाठी वेगळ्या अशी जय्यत तयारी करून आपली मंडळी प्रवासाला निघतात.

सकाळच्या नाश्त्याला सोडे घालून पोहे (असं ऐकण्यापेक्षा पोहे घालून सोडे) केलेत अस ऐकायला मिळालं तर त्या दिवसाचं सोनं झालं म्हणून समजा. सोड्याची खिचडी, सोड्याचं लीप्त, सोड्याची चटणी,नुसतेच कुरकुरीत तळलेले सोडे, न खपणाऱ्या भाजीची मागणी चारपट वाढवणारी सोडे घालून केलेली वांग्याची भाजी आणि भातावर ओतण्याआधी वाटीतल्या लालबूंद कालवणावर तरंगणाऱ्या तेलाच्या हलक्याश्या तवंगातून डोकावणाऱ्या गरम बटाट्याचा चटका लाऊन घेत घेत डोळे मिटून मनसोक्त प्यायल जाणारं सोड्याचं झणझणीत कालवण असे अनेक खाद्यपदार्थ आठवड्यातून एकदा तरी सीकेपी घरात बनतातच बनतात. तुम्ही घरी आलेल्या एखाद्या नातेवाईकाला ‘सोड्याची खिचडी चालेल का जेवायला?’ असं विचारून पहा..कधी एकदा टुणकन उडी मारून पानावर बसतोय असा भाव त्याच्या चेहेऱ्यावर येतो कि नाही बघा. एखाद्या कायस्थ भगिनी मंडळानी कधी ”सोडे घालून केलेले नाविन्यपूर्ण पदार्थ ” अशा संकल्पनेवर आधारित पाककला स्पर्धा जरी आयोजित केली तर त्याला देखील उत्तम प्रतिसाद मिळेल…प्रयत्न करून बघा.. परीक्षक म्हणून मी आहेच की.

छे छे… उभ्या सोड्याचा फेस्टिवल वगैरे नाही करायचा मला. पण आडव्या हाताने ताव मारत मटकावायच्या उभ्या सोड्यांशिवाय आपल्या याआयुष्याच्या फूड फेस्ट ला मजा नाही. ओव्हर हाईप्ड तर ओव्हर हाईप्ड पण पानात चार सोडे असलेलं साधसं जेवण सुद्धा माझ्यासाठी एकशेएक टक्के ”सुपर लाइक्ड” अशी मेजवानी असते. शाकाहारी जेवण कितीही रुचकर आणि चांगलं असलं तरी त्यातल्या एखाद्या भाजीत थोडेतरी सोडे घालायला पाहिजे होते असं नकळत मनात येणं हे माझ्या जिभेचं आणि सोड्यांचं अतूट नातं सांगतं. तुमचं काय सांगा बरं ?

— समीर गुप्ते
सीकेपी फूड फेस्ट
sameer6949@gmail.com

Avatar
About Guest Author 525 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..