बारा महिने वर्षाचे
चोचले आमच्या जीभेचे
दोन हात गृहिणीचे
असतात अन्नपूर्णेचे
चैत्रामध्ये चैत्रगौरी,
चणे खिरापत घरोघरी
गुढी पाडव्याला पानामध्ये
हवी असते बासुंदीपुरी
वैशाख, ज्येष्ठ बेगमीचे,
वाल, पापड, सोड्याचे
बाजारात मिळती खूप,
घरच्या मसाल्याचे अप्रूप
आषाढ येतो पावसाचा,
मच्छी, भजी तळण्याचा
तिखटीला मटणवडे,
अमृत फिके त्याच्यापुढे
श्रावणराजा महिन्यांचा,
श्रीकृष्णाच्या जन्माचा
करतो आम्ही उपासतापास,
भरल्या केळ्याचा येतो वास
अश्विनात बसले घट,
कामे उरका पटापट
देवीच्या नैवेद्याला पानी
हवाच खीर कानोला
जमलच तर भरले घावन,
अष्टमीला समिष भोजन
कार्तिक-मार्गशीर्ष लग्नसराई,
पक्वानांना तोटा नाही
पौष म्हणजे संक्रांत आली,
गुळपोळीची तयारी झाली
तिळावरती आला काटा,
मेळाव्यात तिळगुळ वाटा
माघाच्या थंडीसाठी
गरम रस्स्याची लागते वाटी
फाल्गुनात होळी-रे-होळी,
घरोघरी तेलपोळी
नारळाचं दुध, तुपाची धार,
आमच्या जीभेचे चोचले फार
कोलंबी भात, शेवाळाची कणी,
मुगाचं बिरडं करतं का कोणी ?
भरलीचिंबोरी, मटणबिर्याणी,
वासानेच तोंडाला पाणी
किती, किती घेऊ नांव,
खाद्यसंस्कृतीचा हा गाव
उरलीच नाहीत काही नावे,
म्हणूनच केले ते निनावे..
सुधा मोकाशी – ठाणे
Leave a Reply