कायस्थ प्रभू समाजाच्या कायस्थ वैभव या मासिकात प्रकाशित झालेला हा लेख
शक्ती, युक्ती, बुद्धी आणि कणखर मनगटातील दमदार समशेरीबरोबरच या ज्ञातीच्या लेखन चातुर्याच्या अनेक बाबींबरोबरच समयसूचक योग्य व कमी लेखात खोचक, बोचक आणि भावनात्मक लिखाणशैलीचे वैशिष्ट्य म्हणजे सी. के. पी. ज्ञाती असे समीकरण इतिहास पूर्व काळापासून ऐकायला व वाचायला मिळते. परंतु आज आपला समाज नेमका कुठे आहे? राजकीय किंवा सामाजीक समीकरणात त्याचे नेमके स्थान काय?
आजही आपल्या ज्ञातीतील अनेक मंडळी चांगल्या हुद्यावर आहेत. ती आपल्या कोषातच गुरफटली आणि विस्कटली. त्यामुळे ज्ञातीचे फार मोठे नुकसान झाले याची जाणीव अलिकडे काही लोकांना प्रकर्षाने जाणवली. आतातरी समाज एकसंघ ठेवला पाहिजे ह्या जाणीवेने खडबडून जागे झालेले काही धुरीण समाजाने एकत्र यावे यासाठी अहोरात्र झटत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना समाजातून सर्वसामान्य ज्ञाती बांधवांनी तन-मन-धनाने सहकार्य करणे आवश्यक आहे. तसे झाले नाही तर भविष्यात तरुण पिढी आम्हाला कधी माफ करणार नाही. कारण नाही म्हटले तरी समाजात वावरत असताना कुठेतरी जातीचा उल्लेख येतोच. अगदी शाळेच्या दाखल्यावर प्रत्येकाची जात ठळक अक्षरात लिहावी लागते. नोकरी शोधतांना देखील जातीचा दाखला हातात असावा लागतो. मला देशातील इतर राज्यांचे माहीत नाही पण महाराष्ट्रात अठरापगड जाती आहेत. त्या प्रत्येक जातीला एक वेगळा इतिहास आहे. प्रत्येक जातीचा इतिहास हा सामाजिक अधिष्ठानावर आधारित आहे. चांद्रसेनिय कायस्थ प्रभू समाज नेमका कोठून आला? त्याच्या लेखणीत आणि वाणीत इतका धारदारपणा कसा? याचा थोडक्यात मागोवा घ्यायचा तर असे सांगता येईल की, ‘काया’ देशात राहणारे म्हणूनच ‘काया देशस्थ’ (कायस्थ) म्हणविले जातात हा काया देश म्हणजेच सध्याचा अयोध्या प्रांत होय. या प्रांतातील ‘हैहैय’ कुळांत जन्मलेला एक पराक्रमी राजा चांद्रसेन हा होवून गेला. त्याच्याच वंशातील सोन नावाच्या राजाच्या पोटी भानू या नावाचा पुत्र चित्रगुप्त नावाच्या राजकन्येपासून झाला. त्या वंशाला चित्रे अगर भानू वंश म्हणू लागले. चांद्रसेनाच्या वंशातील म्हणून चांद्रसेनिय असे या लोकांना ‘नामाभिधान’ लावले जाऊ लागले. (हा इतिहास मी इथे फारच थोडक्यात सांगितला आहे.) आजच्या पिढीने हा इतिहास जरुर वाचावा व आपल्या ज्ञातीचे मूळ व कुळ समजावून घ्यावे. वयोवृद्ध मंडळींना याबद्दल माहिती असेलच. ज्यांना ज्यांना असे इतिहासाचे ज्ञान आहे. त्यांनी ते लेख रुपाने ज्ञातीतील तरुण वर्गापुढे मांडले पाहिजेत.
स्वातंत्र्यानंतरचा काळ हा फार मागे गेलेला नाही. त्या काळात डॉ. चिंतामणराव देशमुख हे भारताच्या मंत्रीमंडळात अर्थमंत्री होते. संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावरुन त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देऊन आपल्या करारीपणाच्या स्वभावाचे दर्शन साऱ्या देशाला घडविले. त्यांच्या या करारी आणि निश्चयी नजरेला नजर देण्याची हिंमत दस्तूरखुद्द पंडित जवाहरलाल नेहरुंमध्येही नव्हती. इतके तेजपुंज व्यक्तिमत्व आपल्या ज्ञातीमध्ये होऊन गेले. हा समस्त चांद्रसेनियांचा बहुमानच म्हणावा लागेल. असे अनेक बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्या ज्ञातीने या देशाला दिले असून त्यांची यादी खुप मोठी आहे. त्यांनी आपापल्या क्षेत्रात जी उत्तुंग कामगिरी केली ती आजही सर्वांना मार्गदर्शक ठरत आहे. त्या काळात त्यांनी ज्ञातीसाठी काय केले? किंवा ज्ञातीने त्यांच्याप्रती किती आणि कसा आदरभाव दाखवला हा मुद्दा वादाचा ठरेल. त्यामुळे आता खोलात न शिरता आतामात्र आपण निश्चित सावध व ज्ञातीबद्दल जागृत राहणे आवश्यक आहे. मला एक आठवण सांगणे महत्वाचे वाटते, ज्येष्ठ साहित्यिक कै. ग. प्र. प्रधान हे समाजवादी विचारसरणीचे आपल्या ज्ञातीतील मान्यवर. वाईच्या वसंत व्याख्यानमालेत त्यांचे व्याख्यान होते. कार्यक्रम संपल्यावर मी त्यांना भेटून मला आपले विचार मार्गदर्शक वाटले असे म्हणून त्यांना विनम्रपणे नमस्कार केला. ते गाडीत बसता बसता थांबले व त्यांनी नाव विचारले. नाव सांगताच अगदी सहजपणे सी. के. पी. का? असा प्रश्न करुन मायेने माझ्या पाठीवर हात फिरवला. ही त्यांची लकब व बोलण्यातला मधाळपणा आपल्या ज्ञातीबांधवांबद्दलचा आदरभाव दाखवणारा वाटला.
हा सर्व काल-परवाचा प्रसंग असला तरी माझ्या नंतरच्या पिढीला मात्र ग. प्र. प्रधान, सी. डी. देशमुख, दत्ताजी ताम्हाणे, अरुणकुमार वैद्य, लता राजे, र. ग. कर्णिक, सुरभानाना टिपणीस, र. वा. दिघे अशी ज्ञातीमधील असंख्य व्यक्तिमत्व माहित नाहीत याची खंत वाटते. आपल्या ज्ञातीबद्दल आजच्या तरुण-तरुणींना जाज्वल्य अभिमान हवा. नव्हे तो असायलाच पाहिजे. कारण समाजात डोळसपणे वावरत असताना प्रत्येक जण आपल्या ज्ञातीचा झेंडा खांद्यावर मिरवताना दिसतो. तो जाज्वल्य पणा आमच्यात का नाही?
मनुष्याच्या आरोग्याला जसे रक्ताभिसरणाची गरज भासते तसेच समाजाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी समाजामध्ये विचारांचे अभिसरण होणे अत्यंत आवश्यक आहे. ज्ञातीमधील तरुण तरुणी नव्हे तर जाणत्यांनीही आपला इगो बाजूला ठेवून खेड्यापाड्यात विखुरलेल्या आपल्या ज्ञाती बांधवांना आपलेसे करणे आणि खेड्यातील वातावरणाशी जुळवून घेणे याला आता पर्याय नाही. कारण प्रत्येक जातीचा नेता आपल्या जातीला एकत्र आणून राजकीय स्वार्थ साधताना आपण फक्त उघड्या डोळ्यांनीच पाहणार आहोत का?
आपल्यातले बौद्धिक कौशल्य, लेखणीचा वार आणि वाणीची धार याचे फक्त कामापुरते कौतुक आपण किती दिवस ऐकत राहणार? याचा विचार होणे माझ्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. ज्ञातीमधील मान्यवर याचा गांभीर्याने विचार करतील. असे आजचे चित्र पाहिल्यावर अशी आशा बाळगायला हरकत नाही.
शेवटी एवढेच सांगावेसे वाटते की, ज्ञातीचे खऱ्या अर्थाने भले व्हावे असे वाटत असेल तर तीन प्रकारच्या गोष्टीचे भान असणे आवश्यक आहे. पहिले म्हणजे गरीबी पाहून श्रीमंतांच्या डोळ्यात पाणी आले पाहिजे. दुसरे म्हणजे माणसाच्या अंगात पाणी पाहिजे. तिसरे म्हणजे धारदार वाणीबरोबरच स्वभावात तितकीच मृदुलता हवी. तीन गोष्टींमुळेच समाजातील गरीब आणि श्रीमंत यांचेमधील दरी निश्चित कमी होईल.
संजय भास्कर चिटणीस (इनामदार)
वडगांव, (हवेली) ता कऱ्हाड, जि. सातारा
Leave a Reply