१९७१ मध्ये ‘मेरे अपने’चं शुटींग चालू असताना, दिग्दर्शकानं कॅमेरा, साऊंड व क्लॅपची ऑर्डर दिली.. मात्र क्लॅप देणाराच जागेवर नव्हता, तो कॅन्टीनमध्ये मैत्रीणीबरोबर गप्पा मारत बसला होता.. गुलजारजी जाम भडकले, त्यांनी त्या क्लॅपरबाॅयला हाकलून दिले.. व त्या जागेवर चंद्रशेखर नार्वेकर उर्फ एन. चंद्राची नेमणूक झाली.. याच एन. चंद्राने, त्यानंतर ‘परिचय’ पासून ‘आंधी’ पर्यंतचे गुलजार यांच्या सर्व चित्रपटांसाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले.. एका सशक्त दिग्दर्शकाच्या परिसस्पर्शाने एन. चंद्रा नावाचा मराठी, यशस्वी निर्माता-दिग्दर्शक घडला..
एन. चंद्रा मुळचे गोव्याचे. वडील नोकरीच्या शोधात मुंबईला आले. फेमस लॅबमध्ये ते उच्च पदावर होते. आई महानगरपालिकेत नोकरीला होती. काॅलेज झाल्यानंतर चंद्रा यांनी ताडदेव येथील फिल्म सेंटर मध्ये ज्येष्ठ संकलक, वामन भोसले यांना सहायक म्हणून काम करु लागले. तेथे गुलजार साहेब आणि त्याची ओळख झाली..
गुलजार यांच्या हाताखाली प्रचंड अनुभव घेतल्यानंतर त्यांनी ‘अंकुश’ चित्रपटाची निर्मिती करण्याचे ठरविले. या वास्तववादी चित्रपटासाठी नवीन चेहरे घेतले.. त्यामध्ये नाना पाटेकर, सुहास पळशीकर अशी मंडळी होती. हा चित्रपट तयार करताना चंद्रा यांना आपले घर, पत्नीचे व बहिणीचे दागिने तारण ठेवून पैसे उभे करावे लागले. चित्रपट तयार झाला. वितरणासाठी ते प्रत्येक शहरात फिरले. चित्रपट प्रदर्शित झाला व अभूतपूर्व यशस्वी ठरला.. १२ लाखांत तयार झालेल्या चित्रपटाने, ९५ लाखांचा व्यवसाय केला..
एन. चंद्रा यांचं हिंदी चित्रपट सृष्टीत नाव झालं.. त्यांनी दुसऱ्या चित्रपटाची निर्मिती केली.. ‘प्रतिघात’.. हा एका तेलुगू ‘प्रतिघटना’ नावाच्या चित्रपटाचा रिमेक होता. सुजाता मेहता या अभिनेत्रीला या चित्रपटामुळे नाव मिळाले.. चित्रपट सर्वत्र यशस्वी झाला. तिसरा चित्रपट होता.. ‘तेजाब’ !! या चित्रपटाने देशभर रौप्यमहोत्सव साजरे केले.. अनिल कपूर व माधुरी दीक्षित या दोघांच्या कारकिर्दीतील हा चित्रपट ‘माईलस्टोन’ होता!
१९९१ साली ‘नरसिंम्हा’ प्रदर्शित झाला. यामध्ये सनी देओल प्रमुख भूमिकेत होता. उर्मिला मातोंडकरचा नायिका म्हणून हा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटाच्या शुटींगचे वेळी कमलिस्तान स्टुडिओमध्ये मोठा सेट लावला होता. मी ‘सूडचक्र’ चित्रपटाच्या स्थिरचित्रणासाठी कमलिस्तान गेलो होतो, तेव्हा त्या सेटची भव्यता पाहिली.. हा चित्रपटही सुपरडुपर हिट झाला..
या चित्रपटानंतर एन. चंद्रा यांचे चित्रपट फारसे यशस्वी झाले नाहीत.. २००१ साली आलेला ‘स्टाईल’ हा विनोदी चित्रपट तरुणाईने डोक्यावर घेतला.. त्यांच्या नंतरचा ‘एस्क्युज मी’ देखील गाजला.. नंतर ‘कगार’ व ‘ये मेरा इंडिया’ या चित्रपटांची निर्मिती करुन एन. चंद्रा यांनी निवृत्ती घेतली..
१९९३ साली त्यांनी ‘घायाळ’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. याचं दिग्दर्शन पुरुषोत्तम बेर्डे यांनी केलं होतं. जाॅनी लिव्हर यामध्ये पाहुणा कलाकार होता..
असा एक मराठी माणूस, की जो संकलक म्हणून सिनेसृष्टीत आला व यशस्वी निर्माता, दिग्दर्शक व संकलक म्हणून नावारूपाला आला.. आज त्यांच्या चित्रपटांतून काम केलेले कलाकार सुपरस्टार झालेले आहेत.. म्हणूनच अभिमानाने म्हणावसं वाटतं.. ‘मराठी पाऊल पडते पुढे…’
पुण्यातील अरविंद सामंत यांच्या नवचित्र फिल्म्स संस्थेकडून ‘अंकुश’ चित्रपटाचे वितरण झाले. त्यावेळी मी एन. चंद्रा यांना त्यांच्या ऑफिसमध्ये बसलेले पाहिले होते मात्र आदरयुक्त भीती वाटल्याने, त्यांच्याशी बोलण्याचं माझं धाडस झालं नाही..
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
४-४-२२.
Leave a Reply