मागील आठवड्यात मित्र डॉ माधव मुतालिक (आणि सौ मैत्रेयी ) यांनी एका क्लासिकल कॉन्सर्टचे निमंत्रण पाठविले आणि मी त्याला लपकलो (की लटकलो?) कारणे तीन –
१) माधव आणि मी १९८१ नंतर प्रत्यक्ष भेटणार होतो. तो माझा विविध स्पर्धांमधील प्रतिस्पर्धी मित्र – मिरज मेडिकल वाला ! २०१८ च्या एका दिवाळी अंकात त्याची कविता वाचली आणि त्याखाली चक्क त्याचा भ्रमण ध्वनी होता. तुटलेला संपर्क स्थापन झाला, पण —-
२) रविराज हॉटेलमध्ये १९८३ साली आमचे लग्नाचे रिसेप्शन, २००८ साली लग्नाची पंचविशी साजरी आणि त्यानंतर आता इतक्या वर्षांनी प्रथमच जायचे होते.
३) परिमल राजहंसची ही पहिलीच मैफिल – असा अनुभव मी कधीच घेतला नव्हता.
लाईट आणि माईकच्या लपंडावात मैफिलीला काहीसा उशीर झाला पण तयारी जबर – अजिबात नवशिकेपण जाणवलं नाही. आत्मविश्वास किंचित कमी पण तोही चढत्या सुरांबरोबर वाढत गेला. श्रोत्यांमध्ये निवडक ५० जण (कोरोना प्रतिबंध) – काही गायक,काही वादक,काही संगीत शिक्षक आणि काही आमच्यासारखे कानसेन !
साथीला दोन कुळकर्णी- त्यांचीही बहुधा पहिली मैफिल असावी. पण साथ तब्येतीत ! तबला किंचित उडता, लाटांची गाज वाला, तर संवादिनी संथ, पाठराखीण !
तिने “मियाँ की तोडी” असं जाहीर केलं आणि आमच्या समोरची टिपिकल पुणेकर अज्ञानमती शेजारणीला म्हणाली – ” संजीव अभ्यंकरांचा ऐकला आहेस कां मियाँ की तोडी ? ” तिचे ज्ञान लगेच उघडे पडले जेव्हा कबीराचे भजन तिला भैरवी वाटले.
एवढे मात्र खरे ते फकीर कबीराचे सबुरीचा संदेश वाले बोल डोळ्यात पाणी आणून गेले.
मल्टिप्लेक्सप्रमाणे किंवा नाट्यगृहांप्रमाणे इथेही भ्रमणध्वनी अधून-मधून तपासणारे श्रोते होते. काहीजण फोटोत छवी टिपण्यात किंवा व्हिडीओ काढण्यात दंग होते. समोरचे “ताजे ” सुरेल क्षण जपण्या ऐवजी त्यांना ते भविष्यासाठी कुपीत ठेवायचे असावेत. याचा काहीसा त्रास जरूर होतो पण सगळेच निमंत्रित ! त्यातल्या त्यात माझ्या शेजारी बसलेल्या रसिक स्त्रीने फक्त ऑडिओ रेकॉर्डिंग केले त्यामुळे कोणाचे लक्ष फारसे विचलित झाले नाही. हाईट म्हणजे एक-दोन श्रोते फारच दाद देत होते माना हलवून !
मला खटकलेली आणि अजूनही लक्षात राहिलेली एक आठवण आहे- वालचंदला असताना विनोद डिग्रजकर च्या गायनाचा कार्यक्रम आम्ही आर्टस सर्कल तर्फे ठेवला होता. (आता विनोद खूप मोठा शास्त्रीय गायक – पंडीत विनोद डिग्रजकर झाला आहे आणि असतो कोल्हापूरला) त्यावेळी माझा एक मित्र इतक्या जोरात कपाळावर टिचक्या मारून दाद देत होता की मैफिलीच्या शेवटी त्याचे कपाळ रक्तबंबाळ होते की काय अशी आम्हाला स्वाभाविक उत्सुकता होती. पण इथे तसे काही झाले नाही.
“मियाँ की तोडी ” साठी तिने निवडलेल्या रचनेत करीमुद्दीन/मैनुद्दीन असे शब्द होते. मी लगेच दचकून आसपास कोणी ” टिकली/इर्शाद ” पब्लिक तर नाही नं, याची खातरजमा करून घेतली.
शेवटी एक मैफिल सजायला , फुलायला काय हवे असते ? गाता गळा, साथीदारांची बोटे आणि ऐकणाऱ्यांचे कान व डोळे ! मग माहोल तैय्यार होतो.
गायिकेच्या चेहेऱ्यावर मध्येच उठणारे स्मित तिच्या प्रयत्नांची दाद होती, आमच्या टाळ्या,वावा महत्वाचे होतेच पण स्वतःचा आनंद तिला अधिक कृतार्थ करीत होता. भैरवीसाठी ब्रजला निघालेल्या राधेची निवड तिने केली आणि श्यामवरचा राधेचा अधिकार अधोरेखित केला.
कशासाठी हे संयोजन होते हे माधवने प्रास्ताविकात सोप्पं करून विशद केलं होतं –
“ निव्वळ आणि निखळ आनंदासाठी !”
तो आनंद आम्हांला घरी येईपर्यंत निःशब्द करून गेला एवढं नक्की !
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply