देवाची करणी अन् नारळात पाणी असे म्हणतात. नारळपाणी हे उत्कृष्ट नैसर्गिक पेय आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शहाळ्याचे पाणी गर्भवती महिलांसाठी पोषक मानले जाते. आता शहरांमधून शहाळीही फार स्वस्त मिळतात अशातला भाग नाही, पण त्यामुळे फायदा खूप असतो. साधारण १०० मि.ली. शहाळ्याच्या पाण्यात आपल्याला १०० मिलिग्रॅम प्रथिने, ४०० मिलिग्रॅम खनिज द्रव्ये, ४ ग्रॅम कार्बोहायड्रेट, २० मिलिग्रॅम कॅल्शियम, १० मिलिग्रॅम फॉस्फरस, ०.५ मिलिग्रॅम लोह, ०.०२ मिलिग्रॅम, बी १जीवनसत्त्व, ०.१० मिलिग्रॅम निकोटिनिक आम्ल, ०.०२ मिलिग्रॅम रिबोफ्लॅविन, २ मिलिग्रॅम क जीवनसत्त्व आढळते.
त्याचा उष्मांक म्हणजे कॅलरीज केवळ सतरा असतात. या पेयाचा फॉर्म्युला निसर्गाने बनवलेला असल्याने त्याची चव ही एकमेव आहे. शहाळे फ्रीजमध्ये ठेवावे लागत नाही. तरीही त्यातील पाणी ताजे राहते, ही निसर्गाची किमया आहे. शहाळ्यात साखरेचे प्रमाण अत्यल्प म्हणजे केवळ तीन टक्के आहे. हे पाणी काहीसे तुरट व मचूळ असले तरी ती चव खनिजांमुळे असते.
शहाळ्यावर बाहेरून हिरवे आवरण असते. आत काथ्या असतो व त्याच्याही आत करवंटी असते. म्हणजे तीन स्तरांचे हे नैसर्गिक पॅकेजिंग असते असे म्हणायला हरकत नाही. नारळाच्या फुलांचे फलधारणेत रूपांतर होताना काही पुष्पद्रवाचे पातळ खोबरे तयार होते व उरलेला पुष्पद्रव हा शिल्लक राहतो. तेच शहाळ्याचे पाणी असते. बाहेरच्या तीन स्तरांच्या आवरणामुळे ते पाणी आंबत नाही किंवा ते खराब होण्याचा प्रश्नच नसतो.
मद्रास, कोकण भागातून आपल्याकडे शहाळी विकायला येतात. त्यात नुसते पाणी असलेले व दुसरे कोवळे खोबरे, तसेच पाणी दोन्ही असलेले असे दोन प्रकार मिळतात. अनेकदा खोबरे न खाताच लोक ते टाकून देतात. त्यामुळे आपण पोषकद्रव्यांपासून वंचित राहतो. शहाळ्याच्या पाण्यातील लोह शरीरात जास्त शोषले जाते. माणसाच्या शरीरातील विविध क्रियांना जी एन्झाइम म्हणजे वितंचके लागतात त्यांना त्यांच्या कामात मॅग्नेशियम लागते ते यातून मिळते.
आजारी व्यक्तींच्या घामातून क्षार बाहेर जातात ते भरून येण्यासाठी शहाळ्यातील पोटॅशियम पूरक असते. कमी प्रमाणात का होईना, पण त्यात क जीवनसत्त्वही असते. शहाळ्याचे पाणी सलाईनसारखे काम करते. त्यामुळे लघवीला साफ होणे, उष्णता कमी होणे हे फायदे होतात. नारळाचे पाणी आता टिश्यू कल्चर म्हणजे वनस्पतींच्या जातींची वाढ करण्यासाठी वापरले जाते.
Leave a Reply