नवीन लेखन...

कॅाफी पुराण

मी आणि आमच्या घरचे सर्वच चहावाले!

घरी कॅाफी व्हायची ती फक्त भजनी ग्रूप घरी येणार असेल तेव्हा!किंवा अजिबात कधीही चहा न प्यायलेले, “फक्त कॅाफीच” पिणारे पाहुणे घरी येणार असतील, तेव्हा! तेव्हाही शेजारच्या वाण्याकडून कॅाफी पावडर आणायची आणि साधी कॅाफि बनवायची!

भजनी मंडळाच्या वेळी मात्र छान दाट, ताजी वेलची , जायफळ पावडर घालून, खास कॅाफी बनवली जायची! मला ती गोड कॅाफी आवडायची, आणि जास्ती ती उकळत असतांनाचा वास आवडायचा!.. इतकंच माझं कॅाफी बद्दल प्रेम आणि ज्ञान !

जेव्हा कॅाफी बाटल्यातून, छोट्या साशा तून मिळायला लागली तेव्हा ब्रू,टाटा,नेस कॅफी अशी त्यांची नांवे कळायला लागली.

कधीतरी बाहेर गेल्यावर माटुंगाच्या मद्रास कॅफे मध्ये जाऊन त्यांची कॅाफी प्यायचा योग आला. घरात, घरगुती समारंभात, गाण्याच्या किंवा काही इतर समारंभात कॅाफी साठी तेव्हा कपबशीच वापरली जायची. पण मद्रास कॅफे मध्ये अशा मोठ्या वाटी(की पेला?)मधून प्यायला मिळाली.. कटींग पाहिजे तर दोघांना पिता येईल अशी…

कॅाफीचे नखरे वाढले ,जेव्हा CCD आले.. साधारण ९६/९७ साली..

Cafe coffee day…मुंबईत ccd मध्ये जाऊन महागडी कॅाफी पितं , तासनतास गप्पा मारत बसायचं ,कामाच्या मिटींग्ज करायच्या, ही फॅशन आली तरूण पिढीत!

एकदाचं धीर करून मी कोणाबरोबर तरी गेले ccd त…पण १५०/२०० रूपयाची एक कॅाफी , म्हणजे काय वेगळं असेल ?असा विचार ,ती टेबलावर येईपर्यंत करत होते..

समोर आला एक मोठा कप .. मग सारखाच.. बशी नसलेला .. आणि त्या कपात एक सुंदर डिझाईन.. ते न मोडतां कसे बरे कॅाफी प्यायले असे वाटले..पण तिथली कॅाफीही डिझाईन सोडले तर आपल्या जवळच्या चवीची वाटली.

लंडनला गेले तेव्हा ,मुलगी विमानतळावर कॅाफीचा मोठा प्लॅस्टीकचा ,झाकण वाला ,स्ट्रॅा असलेला ग्लास घेऊन उभी होती.. १ लिटरचा असेल तो ग्लास.. म्हणाली “प्रवासानी दमली असशील, कॅाफी पी, बरे वाटेल!”.. मलाही आवश्यकता होती.. प्यायले मात्र!.. तोंड इतके कडू झाले! बीन साखरेची, बीन दुधाची अशी कॅाफी मी कधीच प्यायली नव्हती… मला काही ती पिता आली नाही. पण इथे असे मोठाले ग्लास घेऊन प्रवास करायला, ॲाफिसमध्ये काम करायला लोकांना आवडते. दिवसभर तो ग्लास त्यांच्या जवळ असतो. आधीची गरम कॅाफी , नंतर थंडगार झाली तरी , त्याच आवडीने घोट घोट कॅाफी पिण्यातला आनंद मी कधीच घेतला नाही.

अमेरिकेत आले तर सियाटलला Starbucks कॅाफीचे मोठे प्रस्थ.. आणि सून तिथे नोकरी करायची.. मग तर अगदी त्यांच्या किचन मध्ये जाऊन कॅाफी ज्ञान मिळाले.. घरी पण वेगवेगळ्या स्वादाच्या कॅाफी प्यायला मिळाल्या .

तिथल्या प्रसिध्द , मोठ्या Roastery shop मध्ये जाऊन मशिनरी, कॅाफिच्या बियापासून, कॅाफी टेबलावर येई पर्यंतची प्रोसेस पहायला मिळाली.,

कॅाफीचे मुख्य ४ प्रकार असले तरी वेगवेगळ्या स्वादाच्या अनेक कॅाफीचे प्रकार पहायला मिळाले. तरी या कॅाफींची नांव आणि फरक माझ्या काही लक्षांत रहायचा नाही.शेवटी गुग्गल गुरूंची मदत घेतली. मग जरा प्रकाश पडला. आता मलाही शॅापमध्ये किंवा एअरपोर्ट वर गेल्यावर कुठली कॅाफी मागवायची ते कळायला लागले. घरातही कधीतरी कॅाफी आता आवडायला लागली.. घरात हळूहळू कॅाफीमेकर आणि इतर साधनं जमा झाली..

सिझन प्रमाणे कॅाफीचे येणारे प्रकार ,जसे Iced Pumpkin Cream Chai Tea Latte and the Iced Apple Crisp Oatmilk Shaken Espresso.,पिस्ता, कॅरेमल , पेपरमिंट latte ची चव घेऊन पहाण्या इतपत ,कॅाफी आवडायला लागली आहे.

कॅाफीचा अगदीच वेगळा उपयोग करून पाहिला .. कॅाफि पेंटीग.. गणपती काढला.. पण कदाचित परत नाही करणार.. कॅाफी प्यायलाच बरी!

तर असे हे माझे कॅाफी दिनानिमित्त कॅाफी पुराण..

आजचा दिवस मुद्दाम कॅाफी पिऊन सुरू केला, पण मधे वेळ न मिळाल्यामुळे, हे कॅाफीपुराण रात्री लिहूनच , दिवस संपतोय!

… चित्रा मेहेंदळे.

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 374 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..