काही वर्षापूर्वीपर्यंत मुंबईतल्या रेल्वे स्टेशनवर वेळ काढण्यासाठी डिस्को लाईटसने नटलेली मशीन असायची. बघितलीच असतील ना? या मशीनवर कधी ऊभे राहिलायत का? नव्या पिढीतल्यांनी ही मशीन कदाचित दुर्लक्षित केली असतील पण एक काळ असा होता की लहान मुलंच काय, तर मोठी माणसंही या मशीन्सच्या प्रेमात पडायची.
काय होतं या मशीनमध्ये? आणि कुठे गेली ती आता?
ही होती चक्क वजन करायची मशीन्स. पण यात फक्त वजनच करता यायचं असं नाही. या मशीनवर उभं राहून त्यात नाणं टाकलं की एक चक्र फिरायचं.. ते फिरताना डिस्को लाईटस लागायचे आणि चक्र थाबलं की एक टिकिट बाहेर यायचं. या तिकिटावर तुमचं वजन छापलेलं असायचं, सोबत तुमचं भविष्यही असायचं आणि शिवाय एखाद्या फिल्मस्टारचा फोटोपण असायचा. कधीकधी आपल्या आवडीच्या फिल्मस्टारचा फोटो मिळावा म्हणून लोक पुन्हा पुन्हा मशीनमध्ये नाणं टाकायचे.
मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर नॉर्थन स्केल या भारतीय कंपनीने ८० आणि इंग्रजांच्या इस्टर्न स्केल कंपनीने १२० यंत्रे कार्यान्वित केली होती.
ही यंत्रे लावण्याच्या मोबदल्यात रेल्वेला भाडे मिळत नसे. वजनापोटी यंत्रात जमा झालेल्या रकमेतून ४० टक्के कमिशन रेल्वेला तर ६० टक्के रक्कम या कंपन्यांना मिळत असे. सुरुवातीला यंत्रात १ आणा टाकल्यानंतर प्रवाशाला मशिनमधून बाहेर पडणार्या छापील तिकिटावर आपले वजन कळत असे. कालांतराने रेल्वेने आपल्या कमिशनमध्ये वाढ केल्यामुळे या कंपन्यांनी टप्प्या-टप्प्याने ५० पैसे, १ रुपया आणि नंतर २ रुपये इतकी वाढ केली. या माध्यमातून या दोन्ही कंपन्यांना दरमहा सुमारे चार ते पाच लाख रुपये मिळत होते.
गेल्या काही वर्षांमध्ये या कंपन्याच्या उत्पन्नामध्ये घट झाली. काही वर्षांपुर्वी मुंबईत गर्दी नव्हती. दोन लोकलमध्ये किमान पंधरा ते वीस मिनीटे अंतर असे. त्यामुळे विरंगुळ्यासाठी प्रवाशी आपले वजन करून घेत होते. आता लोकलची फ्रिक्वेन्सी वाढल्यामुळे लोकांना या मशीनकडे बघायलाही वेळ मिळत नाही. याचा फटका नॉर्थन स्केल कंपनीला बसला. यामुळेच नॉर्थन स्केल कंपनीचे मालक एन. के. शर्मा यांनी सहा-सात वर्षांपूर्वी आपला गाशा गुंडाळला.
गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेच्या जडणघडणीच्या साक्षीदार असलेली ही यंत्रे कालबाह्य झाली आहेत. इंग्रज अनेक वर्षांपूर्वी देश सोडून गेले असले तरी काही रेल्वे स्थानकांवर अजूनही त्यांचे ‘वजन’ दिसत होते.
या वजन यंत्रांच्या माध्यमातून ईस्टर्न स्केल प्रा. लिमिटेड या ब्रिटीश कंपनीला गेल्या अनेक वर्षांपासून काहीही नफा मिळत नव्हता. पण इंग्रजी राजवटीच्या खुणा जपण्याचा निर्धार केलेली ही कंपनी भारतात आपला मालकी हक्क कायम ठेवण्यासाठी धडपडत होती.
आता मात्र रेल्वेच्या आधुनिकिकरणामध्ये आणि रेल्वे स्थानके स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्याच्या प्रयत्नांमुळे या मशिन्सची रवानगी गोदामांमध्ये झाली आहे.
— निनाद अरविंद प्रधान
जुन्या आठवणीना उजाळा दिलात.मी मात्र ही लांबूनच पाहत असे.ती कार्ड जमविण्याचा काहींचा छंद होता.