विल्यम कोलगेटचा जन्म २५ जानेवारी १७८३ रोजी झाला.
जगातील २०० देशात कारभार असलेली ही कंपनी केवळ अमेरिका व भारत या दोनच देशातील शेअर बाजारात सूचिबद्ध आहे. बाप्टीस्ट विल्यम कोलगेट किंवा त्यांचा मुलगा सॅम्युअल यांनी अगदी सहज हा व्यवसाय चालू ठेवला होता. तेव्हा यातून एवढय़ा मोठय़ा साम्राज्याची निर्मिती त्यातून होईल असा विचारसुद्धा केला नसेल. पण काही उत्पादनं ही नकळत एखाद्या व्यवसायाला जन्म देतात. घरच्याघरी दंतमंजन तयार करणाऱ्या समाजाला रेडिमेड टुथपेस्ट देताना एका मोठय़ा व्यवसायाचीच बीजं रोवली गेली.
घरगुती गोष्टीच्या वापराची सवय असणाऱ्या लोकांमधला ग्राहक शोधून त्याला त्या वस्तूच्या विक्रीसाठी वळवणं ही कला असते. काही विक्रेते अतिशय चाणाक्षपणे हा व्यवहार करतात तर काहींकडून ते अगदी सहजपणे होते.
घरच्याघरी दंतमंजन करणाऱ्या मोठ्या वर्गाला टूथपेस्टकडे वळवणे, ती विकत घ्यायला लावणे ही शतकभरापूर्वीची घटना. पण ती खूप सहजपणे घडली. विल्यम कोलगेटने १८०६ मध्ये साबण आणि मेणबत्त्या बनवणारी एक छोटीशी फॅक्टरी न्यूयॉर्कमध्ये सुरू केली. १८३५ च्या दरम्यान विल्यमला हृदयविकाराचा धक्का बसल्यावर वास्तविक पुन्हा हा उद्योग सुरू राहणे कठीण होते, पण त्याला बरे वाटल्यावर त्याने फॅक्टरी चालू ठेवली. १८५७ मध्ये विल्यम जग सोडून गेला. त्याचा मुलगा सॅम्युअल कोलगेट याला वास्तविक त्या व्यवसायात काडीचा रस नव्हता. पण अन्य काही करण्यापेक्षा आहे ते बरे आहे या हेतूने त्याने कोलगेट आणि कंपनी चालू ठेवली.
साबण आणि मेणबत्त्या विकता विकता फॅक्टरीने १८७३ मध्ये टुथपेस्ट बनवायला सुरुवात केली. काचेच्या बरण्यांतून ही टुथपेस्ट विकली जात असे. वॉशिंग्टन शेफील्ड या डेंटिस्टचा या टुथपेस्टच्या निर्मितीत मोठा वाटा होता. कोलगेट रिबन डेंटल क्रीम या नावाने ही टुथपेस्ट विकली जात असे. १८९६ मध्ये पहिल्यांदा कोलगेट आणि कंपनीने जगातील टय़ूब रूपातील टुथपेस्ट आणली. १९०८ पासून खूप मोठय़ा प्रमाणावर या टय़ूबरूपातील टुथपेस्टची विक्री सुरू झाली आणि कोलगेट टुथपेस्टने जगभरात आपली पावलं पसरली. फ्लोराईडयुक्त नवी टुथपेस्ट बाजारात येईपर्यंत कोलगेटला बाजारात कुणीच प्रतिस्पर्धी नव्हता. त्यामुळे आपला व्यवसाय वाढवणे कोलगेटला फारसे कठीण गेले नाही.
यादरम्यान कोलगेट कंपनीने पामोलिव्ह कंपनीशी केलेली हातमिळवणी खूप मोलाची होती. पाम आणि ऑलिव्ह या दोन तेलांपासून बनवलेली उत्पादने विकणारी पामोलिव्ह कंपनी आणि कोलगेट यांचे एकत्रित कोलगेट पामोलिव्ह नाव हे ब्रँडविश्वात खूपच वरचे आहे. १९२० पासून सिंगापूर आणि त्यानंतर भारत व नेपाळ अशा मार्गाने भारतात आलेली कोलगेट हा खूप जुना ब्रँड आहे.
कोलगेट पामोलिव्हने भारतात आपल्या व्यवसायास १९३७ मध्ये प्रारंभ केला. इतर उत्पादनं आल्यावरही कोलगेटने आपली मक्तेदारी नेहमीच कायम ठेवली आणि काळाप्रमाणे सतत नवनव्या टॅगलाइन्स, स्लोगन यातून लोकांशी संपर्क साधला. १९४० मध्ये कोलगेटचे ब्रीदवाक्य होते It cleans your breath while it cleans your teeth. तर १९६० मध्ये Colgate…ring of confidence हे ब्रीदवाक्य कोलगेटने वापरलं. आज कोलगेटचे असंख्य प्रकार आपण बाजारात पाहतो. विविध उत्पादनांची स्लोगन्स त्याच्या विविध उपयोगांनुसार वेगवेगळी आहेत. ‘क्या आपके टुथपेस्ट में नमक हैं?’ हा प्रश्न आणि ‘डेंटिस्टनी रेकमंड केलेला नंबर वन ब्रँड’ या दोन टॅगलाइन्स सध्या आपल्या मुखी आहेत. त्यांचाही कोलगेटच्या यशात मोठा वाटा आहे. आज पन्नाशीच्या आसपास असलेल्या लोकांना त्यांच्या लहानपणीची कोलगेटची छापील जाहिरात आठवत असेल – ‘सकाळी, सकाळी तुम्ही कोळशानं मंजन करता..?’ त्या काळात पश्चिम भारतात प्रचंड लोकप्रिय असलेल्या नाशिकच्या बिटको दंत मंजनावर हे सरळ, सरळ आक्रमण होतं. सत्तरच्या दशकात भारतात टूथपेस्टचं मार्केट अत्यल्प होतं. मोठ्या प्रमाणावर दंत मंजन वापरलं जायचं. ते ही काळे किंवा लाल रंगाचं. उत्तर भारतात डाबर लाल दंत मंजनचा बोलबाला होता. विको वज्रदंतीने नुकतंच पदार्पण केलं होतं.
अशा पार्श्वभूमीवर ‘तुम्ही मिठानं आणि कोळशानं दात घासता..? ते हिरड्यांना घातक असतात’ अशा आक्रमक जाहिराती करून कोलगेटने दंत मंजनाचं मार्केट हळू हळू त्यांच्या पांढऱ्या दंत मंजनाकडे वळवलं आणि पुढे झपाट्यानं ते टूथपेस्टकडे नेलं. कोलगेट ह्या क्षेत्रातली अनभिषिक्त कंपनी झाली आणि भारतातली अर्ध्यापेक्षाही जास्त माणसं कोलगेट वापरायला लागली..!नियतीचा न्याय कसा असतो बघा. आज तीच कोलगेट अत्यंत आक्रमकपणाने जाहिरात करतेय – ‘तुमच्या टूथपेस्ट मध्ये मीठ नाही..? तुमच्या पेस्टमध्ये चारकोल नाही..? मग बदला ती पेस्ट. कोलगेट वापरा..!! आज कोलगेट पामोलिव्ह कंपनीकडून मौखिक काळजीसाठी टुथपेस्ट, टूथब्रश, माऊथवॉश यांचे उत्पादन होते. मौखिक आरोग्यगटात कोलगेट या प्रमुख नाममुद्रेअंतर्गत, कोलगेट डेंटल क्रीम, कोलगेट जेल, कोलगेट टोटल, कोलगेट सेन्सेटिव्ह, कोलगेट सेन्सेटिव्ह प्रो, लहान मुलांसाठी कोलगेट स्माईल, कोलगेट प्रोव्हिडेंट ही औषधी टूथपेस्ट असे एकूण १४ उपप्रकार आहेत. वेगवेगळे टूथब्रश, कोलगेट प्लँक्स या नाममुद्रेने खाणे खाल्यानंतर चूळ भरण्यासाठीचे द्रावण या उत्पादनाचा समावेश होतो.
लहानपणापासून अनेक पिढय़ांनी पांढरा आणि लाल अशा टिनमधील टुथपेस्ट पावडर ते त्याच रंगाच्या टय़ूबमधील टुथपेस्ट असा प्रवास अनुभवलेला असतो. खूप सारे पर्याय उपलब्ध नसताना टुथपेस्ट म्हणजे कोलगेट हे गणित डोक्यात पक्कं होतं. जगाचा विचार करता जगभरातील टुथपेस्टमार्केटमध्ये कोलगेटचा ४५% वाटा आहे. म्हणजे जगभरातील जवळपास अर्धे ग्राहक कोलगेट खरेदी करतात. भारतात गेल्या काही वर्षांत कोलगेटला पतंजलीच्या उत्पादनांनी मोठी स्पर्धा निर्माण केली. कोलगेटला आयुर्वेदिक टुथपेस्टची निर्मिती करावी लागण्याइतकं हे आव्हान मोठं होतं.
जिच्या वस्तू आपण सर्रास घरी वापरतो, त्याच कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक असावी हा वॉरेन बफेट यांचा सल्ला असतो. १८५६ मध्ये कोलगेट अमेरिकेत स्थापन झाली व कोका कोलाप्रमाणेच कोलगेटमध्येही वॉरेन बफेट यांची गेली पन्नास वर्षे गुंतवणूक आहे. कोलगेट ही नाममुद्रा ग्राहकांच्या मनात इतकी ठसली आहे की ग्राहकांच्या मनातील ‘टूथपेस्ट म्हणजे कोलगेट’ हे समीकरण बदलू शकणार नाही.
विल्यम कोलगेट यांचे २५ मार्च १८५७ रोजी निधन झाले.
— विनोद गोरे.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply