मकरसंक्रांतीला पूर्वी अनेकजण शुभेच्छा पत्रे पाठवीत असत.त्याला “भेटकार्ड” म्हटले जाई. वर एखादे फुलाचे चित्र, आत हलव्याचे ८ / १० दाणे असलेले कागदी पाकीट आणि ” तिळगुळ घ्या, गोड बोला. मकरसंक्रांतीचे अभिष्टचिंतन !” असा मोजकाच मजकूर असे. आता ते जवळपास बंदच झाले आहे.
एकमेकांना तिळगुळ देणे, संक्रांतीच्या हळदीकुंकवाला वस्तू लुटणे, दसऱ्याला सोने ( आपट्याची पाने) देणे, अशा पूर्वीच्या कित्येक धार्मिक गोष्टी आता कालानुरूप नवीन रूपे घेऊन पुन्हा अवतरतांना दिसतात. हे अपरिहार्य आहे आणि स्वागतार्ह देखील आहे. हलवा किंवा तिळगुळ हातावर देतांना त्याला एक वेगळे घरगुती परिमाण लाभते. पण जर उच्चभ्रू माणसांना / कुटुंबांना, पहिल्यांदाच व्याह्यांना, अधिक औपचारिकपणे किंवा कॉर्पोरेट स्टाईलने द्यायचा असेल तर त्यासाठी अनेक कलात्मक प्रकार करता येतात. असेच मी केलेल्या अनेक प्रकारांपैकी काही प्रकार देत आहे.
पतंगाच्या आकाराचा ( काळ्या रंगाचा) खोका, पतंगाच्या आकाराचे पाकीट, पाकिटावर छापलेल्या हत्तीच्या पाठीवर हलव्याची पिशवी ( हलवा हत्तीच्या पाठीवर घालून जावयाला देण्याची पद्धत आहे ) , खोक्यावर चिकटवलेला पतंग आणि फिरकी, काळ्या कागदाचे बटव्यासारखे गाठोडे आणि त्याला सोनेरी दोरी, चारही बाजूंनी मोती आणि मध्ये पतंग चिकटविले काळे पाकीट अशा काही मी बनविलेल्या / सुधारून वाढविलेल्या वस्तूंची छायाचित्रे सोबत देत आहे. आतला तिळगुळ संपला तरी लोकं अशी पाकीटे जपून ठेवतात ही आनंदाची गोष्ट आहे.
आपल्यालाही अशा अनेक वस्तू सुचल्या असतीलच !
( हा लेख शेअर केल्यास कृपया माझ्या नावासह शेअर करावा )
— मकरंद करंदीकर.
Leave a Reply