अमरावतीतील निमखेडच्या रौंदळे कुटुंबीयांनी शेती व्यवस्थापन योग्य पद्धतीने राबवत सामूहिक पद्धतीने शेती कशी करावी, याचा एक वस्तुपाठ इतरांसमोर ठेवला आहे. सुरुवातीला रौंदळे कटुंबियांकडे फक्त ३३ एकर शेती होती. शेतीत मिळणाऱ्या उत्पन्नातूनच त्यांनी टप्प्याटप्प्याने शेती जोडली. आता त्यांच्याकडे १३३ एकर शेती आहे.
पारंपरिक पीक पद्धतीत पाच भाऊ शेतात राबूनही कष्टाच्या तुलनेत पैसा कमी मिळत असल्याची जाणीव रौंदळे कुटुंबीयांना झाली. जास्त उत्पन्नासाठी पद्धतशीर शेती व्यवस्थापनाचे महत्त्व त्यांना पटले. पारंपरिक शेती करताना आलेल्या अनुभवाबरोबरच विविध कृषी चर्चासत्रांतून मिळालेल्या ज्ञानाचा वापर ते करतात. प्रसंगी कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतात.
विशेषतः रासायनिक कीडनाशके तसेच खत वापर यांसाठी तज्ज्ञांचा सल्ला ते घेतात. ठरावीक कालावधीनंतर कीडनाशकांची फवारणी न करता पिकाची परिस्थिती पाहून फवारणी करतात. खत व्यवस्थापनावरही ते विशेष लक्ष देतात. शेणखत, निंबोणी खत, सेंद्रीय खत यांबरोबरच डीएपी, युरिया इत्यादी खतांचा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार करतात.
पाण्याच्या व्यवस्थापनात ठिबक सिंचनाचा मार्ग ते अवलंबतात. त्यांच्या १३३ एकरांपैकी ८० एकरांवर ठिबक सिंचन केले जाते विशेषतः फुलधारणा व फळधारणेच्या वेळी पिकाला योग्य प्रमाणात पाणी मिळायला हवे, याकडे ते अधिक लक्ष देतात. शेती व्यवस्थापन योग्य पद्धतीने केल्यामुळे त्याचा आर्थिक फायदा रौंदळे कुटुंबीयांना होत आहे. किती एकर शेतात कोणते पीक घ्यायचे, कोणत्या पिकाची बाग व्यापाऱ्याला केव्हा द्यायची, कोणती आंतरपिके घ्यायची, कोणत्या जातीचे बियाणे घ्यायचे यांचे गणित करून त्यातून नफा मिळवला जातो. याशिवाय बाजारचा सातत्याने वेध घेऊन जादा दर देणाऱ्याला माल विकला जातो.
रौंदळे कुटुंबीय मजुरांवर अवलंबून न राहता आपल्या शेतात स्वतः राबतात. त्यांच्या दोन ट्रॅक्टर्सच्या मदतीने वेळेचे योग्य व्यवस्थापन करून बरीचशी कामे उरकली जातात. रौंदळे कुटुंबीयांनी एकजुटीने, सामूहिकरीत्या योग्य व्यवस्थापन करून शेती १३३ एकरापर्यंत वाढवली आणि शेतीतून नफा होतो, हे सप्रमाण दाखवून दिले.
— चारुशीला जुईकर
मराठी विज्ञान परिषद, मुंबई
Leave a Reply