कर्नल सँडर्स यांचा जन्म ९ सप्टेंबर १८९० रोजी झाला.
कर्नल सँडर्स यांचा जीवनप्रवास तसा खडतरच. आयुष्यात बरेच चढउतार त्यांनी पाहिले; परंतु कधीही त्यांनी हार मानली नाही. सँडर्स यांचा जन्म अमेरिकेतील एका गरीब कुटुंबात झाला. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्या डोक्यावरून पितृछत्र हरपलं. आईला घरकामात मदत करत असताना लहानपणीच ते उत्तम स्वयंपाकी झाले. हलाखीच्या काळात आईने दुसरा विवाह केला आणि सावत्र वडिलांशी मनाचे धागे न जुळल्याने वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी घर सोडले व ते स्वतंत्रपणे जगू लागले. त्यांच्या आयुष्यातला घटनाक्रम पाहिला तर ती त्यांच्या समोर येणार्याे संकटांची सुरुवातच होती. लहान वयातच शाळा सुटली. सतराव्या वर्षापर्यंत चार नोकर्याय सुटल्या. अठराव्या वर्षी लग्न केले. पुढे काही काळ कंडक्टर म्हणून काम केले. एकोणिसाव्या वर्षी बाप झाले. पुढे बायकोही सोडून गेली. त्यांनी आर्मीतही स्वत:साठी प्रयत्न केले; परंतु तेथूनही काढले गेले. एका हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून नोकरी पत्करली. काही काळाने रिटायरमेंटच्या वेळी सरकारकडून त्यांना चेक मिळाला तो फक्त १०५ डॉलर्सचा. त्यापूर्वी अनेक वेळा आत्महत्येचा विचारही त्यांच्या मनात येऊन गेला.
जागतिक मंदीच्या काळात सँडर्स रस्त्यावरच एक रेस्टॉरंट चालवत असत. त्या वेळी त्यांचा हा व्यवसाय काही चालत नव्हता. पैशांची तंगी होती. हताश सँडर्स यांच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार येऊ लागला. त्यावेळी त्यांचे वय होते पासष्ट. एक दिवस भूतकाळाचा विचार करत असताना आपण आयुष्यात काय केले, असा एक सहजच विचार त्यांच्या मनात आला आणि आपल्याला अजून बरंच काही आयुष्यात करायचं आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्याच क्षणी त्यांनी पुन्हा उभारी घेतली. सँडर्स यांना स्वयंपाकाची आवड होती. ते त्यात रमत असत. त्यातही त्यांचे मसाले आणि फ्राइड चिकन ही खासियत आणि वेगळेपण होते. तेव्हाच त्यांनी आपल्या या आवडीचे यशस्वी उद्योगात रूपांतर करायचे नक्की केले.
रिटायरमेंटच्या वेळी त्यांना सरकारकडून १०५ डॉलर्स मिळाले होते. सँडर्स यांनी ८७ डॉलर्स खर्च करून उद्योगासाठी लागणाऱ्या सामानाची खरेदी केले आणि कामाचा श्रीगणेशा केला. त्यांची खासियत असलेले फ्राइड चिकन ते दारोदारी जाऊन विकू लागले. सँडर्स आपल्या फ्राइड चिकनची रेसिपी अनेकांसोबत शेअर करत असत. लोकांकडूनही त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असते. त्यातून त्यांना ताकद मिळे. ते घरोघरी, विविध रेस्टॉरंट्समध्ये जाऊन आपली रेसिपी दाखवू लागले. त्यासाठी ते स्वत: गाडी चालवत अनेक मैल प्रवास करत होते. कारण त्यांना ही रेसिपी विकण्यासाठी चांगला भागीदार हवा होता. त्यांचे हे प्रयत्न अविरत चालू होते. विविध रेस्टॉरंट्सना ते भेटी देऊ लागले. लगेच तिथल्या तिथे ते रेसिपी बनवून दाखवू लागले आणि जर रेस्टॉरंटच्या मालकांना रेसिपी आवडली तर लगेचच ते विकण्याचा करार करण्यासाठी हातमिळवणी करू लागले; परंतु असा करार होण्यासाठी म्हणजे त्यांचा पहिला करार करण्यासाठी मिळालेला ‘होकार’ त्यांना एक, दोन, तीन, चार, पाच……. नव्हे तर तब्बल १००९ वेळा नकार घेतल्यानंतर मिळाला होता.
रेस्टॉरंटशी करार करताना त्यांचा करार असा असे की, कर्नल सँडर्स त्यांच्या रेसिपीत वापरल्या जाणाऱ्या सिक्रेट वनस्पती व मसाल्यांची माहिती त्या रेस्टॉरंटच्या मालकांना देत असत. १९६४ पर्यंत सँडर्स यांच्या ‘फ्राइड चिकन’ विक्रेत्यांच्या 600 फ्रँचायझीज होत्या. त्या वेळी त्यांनी आपली कंपनी ही 2 मिलियन डॉलर्सना विकली. जरी त्यांनी आपली कंपनी विकली तरी ते त्या कंपनीचे नेहमीच चेहरा राहिले. म्हणूनच KFC म्हटलं की डोळ्यासमोर येते ते म्हणजे चष्मा घातलेले, पांढराशुभ्र सूट घालून त्यावर काळा टाय बांधलेला व हातात काठी घेतलेल्या व्यक्तीचा पुतळा असलेले प्रवेशद्वार.
१९७६ साली कर्नल सँडर्स हे जगप्रसिद्ध व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर होते. वयाच्या ६५ व्या वर्षी बहुतेक लोकं निवृत्त होऊन घरात बसण्याची तयारी करत असतात. त्यावेळी सँडर्स यांनी जिद्दीनं नवी झेप घेतली. कधीही हार न मानण्याची वृत्ती ठेवून कोणतंही काम केलं तर यश नक्की मिळवता येतं हे कर्नल सँडर्स यांनी जगाला दाखवून दिले होते.
कर्नल सँडर्स यांचे निधन १६ डिसेंबर १९८० साली झाले.
Leave a Reply