बातमी : क्रिकेट कोच : ‘I am disappointed’ – Ravi Shastri
संदर्भ : टाइम्स् ऑफ इंडिया व इतर वृत्तपत्रें
भारतीय टीमचा क्रिकेट कोच म्हणून सिलेक्शन झालें नाहीं म्हणून रवी शास्त्री डिसअपॉइंट झाला.
हा हन्त हन्त ! संदीप पाटीलनें तर कांहींच प्रतिक्रिया दिली नाहीं. अनिल कुंबळे कोच म्हणून सिलेक्ट झाला त्यावद्दल त्याचें अभिनंदन . कुंबळे हा कोच म्हणून इतरांपेक्षा जास्त चांगला असेल किंवा कसें, याबद्दल ही टिप्पणी नाहीं . एक तर, तो विषय क्रिकेटमधील एक्सपर्ट लोकांचा आहे ; आणि दुसरें म्हणजे, त्याचा परफॉर्मन्स कसा आहे तें काळच दाखवेल . पण , इथें आपण पहाणार आहोत तें म्हणजे , हा ,
‘कोच सिलेक्शनचा प्रोसेस’.
एकतर , जुन्या एस्टॅब्लिश्ड प्लेअर्सना कोचच्या जागेसाठी अॅप्लाय् करायला लावणें , हें कितपत योग्य आहे ? हा कांहीं सरकारी नोकरीसाठी किंवा म्हाडाच्या जागांसाठी करायचा अर्ज नव्हे. कोच म्हणून अॅप्लाय् करणें हें जुन्या-जाणित्या लोकांना खचितच ऑकवर्ड वाटलें असणार. तरीही त्यांनी अर्ज केलें. खरें म्हणजे, BCCI नेंच योग्य लोकांची शॉर्ट-लिस्ट करून मग त्या लोकांना प्रेझेंटेशन द्यायला बोलवायला हवें ; आणि त्या प्रझेंटेशनच्या वेळी सीनियर लोक , तसेच अॅडमिनिस्ट्रेशनमधील कांहीं लोक हजर असायला हवेत. पण BCCI मधील अॅडमिनिस्ट्रेटर्स हे ‘at an arm’s distance’ अशी पॉलिसी मानतात. म्हणजे, आपण नामानिराळें रहायचें व टीका झाल्यास, सिलेक्शन कमिटीकडे बोट दाखवायचें !
दुसरें म्हणजे, सचिन, सौरभ व लक्ष्मण हे जरी श्रेष्ठ खेळाडू असले, आणि आजच्या टीममधील प्लेअर्सपेक्षा जरी ज्येष्ठ असले , तरी, कोच म्हणून अॅप्लाय् करणार्या शास्त्री, संदीप पाटील, कुंबळे यांच्यापेक्षा ते ज्येष्ठ आहेत काय, ही बाब महत्वाची आहे. त्यांच्यापुढे इंटरव्यू द्यायचा, ही तर, त्यांच्याहून सीनियर प्लेअर्ससाठी नक्कीच ह्युमिलिएटिंग वाटणारी गोष्ट आहे. त्यातून, कुठल्याही कारणानें कां असेना, (अगदी कितीही जस्टिफाइड कारण असलें, तरीही) , पण शास्त्रीच्या ‘इंडरव्हू’ला सौरव नें हजर नसणें ही शास्त्रीला अधिकच ह्युमिलिएट करणारी गोष्ट आहे, हें नक्की.
असें इतर क्षेत्रांमध्ये होतें की ! कंपनीच्या मूळ चेअरमनचा मुलगा ( म्हणजे मालकाचा मुलगा) नंतर चेचअरमन किंवा एम्. डी. होतो, तेव्हां जुन्या सीनियर मॅनेजर्सना त्याचें ऐकावेंच लागतें, कारण तो त्यांचा बॉस झालेला असतो. आधीच्या राजाचा पुत्र राजा बनतो, तेव्हांही असेंच होतें. एक उदाहरण म्हणून आपण शिवाजी व संभाजी यांच्याकडे पाहूं या. ( त्यांचा एकेरी उल्लेख , हा केवळ लेखनसोयीसाठीच आहे, याची नोंद घ्यावी ). शिवाजीच्या मृत्यूनंतर संभाजी राजा व्हावा किंवा नाहीं याबद्दल अष्टप्रधानांमध्ये एकमत नव्हतें. पुढे संभाजी राजा झाला. त्यानंतरही अण्णाजी दत्तो वगैरे मंत्र्यांना आणि हिरोजी फर्जंद याच्यासारख्या ज्येष्ठांना संभाजीबरोबर काम करणें पटलें नाहीं, व त्यांनी संभाजीविरुद्ध बंड करायचा प्रयत्न केला. ( हें आपण विसरतां कामा नये की, आग्याहून शिवाजी पळाला, तेव्हां त्याच्या जागी हिरोजी झोपला होता. केवठी मोठी रिस्क ही ! ). एक ज्येष्ठ लेखक (बहुधा कुरुंदकर) म्हणतात की, या सीनियर लोकांच्या वर्तनावरून, शिवाजीच्या ‘माणसें पारखण्याबद्दल’च प्रश्नचिन्ह निर्माण होतें. पण, मला तसें वाटत नाहीं, हा पिढ्यांचा फरक आहे. शिवाजीच्या काळी विश्वासानें महत्वाच्या जबाबदार्या अंगावर घेणार्यांना, संभाजीसारख्या तरुण, आणि स्वत:पेक्षा वय व अनुभवानें ज्युनियर अशा माणसाबरोबर काम करणें कठीणच गेलें असणार !
बी.सी. सी. आय्. च्या कोच-सिलेक्शनबद्दलही, ज्येष्ठ प्लेअर्स व नवे लोक यांचा असाच विचार करणें प्राप्त आहे. गावसकर, कपिल देव, मोहिंदर अमरनाथ वगैरे मंडळी सिलेक्शन कमिटीत असती तर गोष्ड वेगळी, ती सीनियर मंडळी आहेत. पण, मग, शिर्के यांनी आजच्या सिलेक्शन कमिटीला जी ‘समज’ दिली की, ‘तुमचें काम फक्त , मुख्य कोच सिलेक्ट करणे, एवढेंच आहे ; बॅटिंगचा कोच सिलेक्ट किंवा रेकमेंड करणें, हें नाहीं’ , (संदर्भ : वृत्तपत्रीय बातमी) ; तसें ते सीनियर्सचा समावेश असलेल्या कमिटीसमोर करूं शकले असते काय ? ( ध्यानात असूं द्या की, आपण शिर्के यांच्या बोलण्याच्या योग्यायोग्यतेची चर्चा करत नाहीं आहोत ; तर, फक्त प्रोसेसबद्दल बोलत आहोत).
असो. आपण काय करायचें तर, रवी शास्त्रीची संयत प्रतिक्रिया, संदीप पाटीलची चुप्पी, यातून बोध एवढाच घ्यायचा की, ‘सत्तेपुढे शहाणपण चालत नाहीं’.
– सुभाष स. नाईक.
Leave a Reply