नवीन लेखन...

टिप्पणी – ८ : ‘ये मेरा प्रेमपत्र पढ़कर’

बातमी : ‘संगम’ सिनेमातील गीत , ‘ये मेरा प्रेमपत्र पढ़कर’
संदर्भ : लोकसत्ता, मुंबई आवृत्ती, लोकरंग पुरवणी, दि. ०७.०८.१६ मधील, ‘पडसाद’.

• वर उल्लेखलेल्या ‘पडसाद’ मध्ये वसंत खेडेकर यांची, ‘आधी कोंबडी की .. ?’ या शीर्षकाची प्रतिक्रिया आलेली आहे. त्यात उल्लेखलेल्या , ‘संगम’ सिनेमातील गीतावर ही टिप्पणी.
• पुढे जाण्यापूर्वी एक लहानशी चूक आपण सुधारूया. खेडेकर म्हणतात की, ‘संगम’ हा सिनेना १९७० च्या दशकात आला होता. पण, माझ्या आठवणीप्रमाणें तो १९६५-६६ च्या सुमाराला प्रदर्शित झाला होता. ( हें मला आठवण्याचें कारण असें की, मे १९६७ ला मी आय्. आय्. टी. खरगपुर येथील बी. टेक्. चा कोर्स पूर्ण केला ; आणि मला आठवतें आहे त्याप्रमाणें, ’संगम’ त्याआधी आलेला आहे ) .
अर्थात्, या चुकीमुळे, मूळ चर्चा-विषयात फरक पडत नाहीं.
• खेडेकर यांनी ‘रसरंग’ या नियतकालिकामधील चर्चेचा संदर्भ दिलेला आहे. त्यातील ‘आधी गीताचे शब्द की आधी गीताची चाल’ या वादाचाही त्यांनी उल्लेख केलेला आहे. त्याबद्दल थोडेसें नंतर पाहूं या.
• मात्र, रणजीत बुधकर यांनी ‘आधी आंगडें, मग अपत्य’ या शीर्षकाखाली संगममधील गीताबद्दल जें लिहिलें आहे, त्याबद्दल मला मुख्यत्वें टिप्पणी करायची आहे.
• बुधकरांचा मूळ लेख मी ‘रसरंग’मध्ये वाचलेला नाहीं. मुंबईत ‘रसरंग’ सहजासहजी मिळत नाहीं, मग जुन्या आवृत्या मिळायची गोष्टच नको. ‘वेब’वर बरेंच शोधूनही मला ‘रसरंग’ची ई-आवृत्ती गवसली नाहीं. त्यामुळे, खेडेकर यांच्या प्रतिक्रियेवरून मला मूळ लेखाबद्दल जें उमगलें, त्यावरून ही टिप्पणी.

(१)
• रणजीत बुधकर यांनी त्यांच्या लेखात मांडलेल्या मुद्द्यावरून, त्यांना हिंदी भाषेची केवळ जुजबी जाण आहे, हें स्पष्ट आहे. त्यामुळे, बुधकरांचा मूळ मुद्दा बरोबर असो वा नसो, मात्र या गीतातला त्यांनी दिलेला reference चुकीचा आहे. ( बुधकर याचा अधिक्षेप करायचा हेतू नाहीं. मात्र, परिस्थिती काय दिसते, हें सांगणे आवश्यक आहे) .
 ( माझें हायस्कूलचें शिक्षण हिंदीभाषी प्रदेशात झालेले आहे . हिंदी-हिंदुस्तानी साहित्य मी बर्‍यापैकी वाचलेलें आहे. शेरोशायरी आणि गझला यांची आवड असल्यामुळे, माझा हिंदी-हिंदुस्तानी, व कांहीं अंशीं उर्दू , यांच्याशी आयुष्यभर संपर्क राहिलेला आहे . मी स्वत:ही हिंदी-हिंदुस्तानीमध्ये लिहीत आलेलो आहे, त्यातील कांहीं प्रकाशितही झालेलें आहे, आणि त्यातील कांहीं लेख गझल-गीतांच्या रसास्वादाचे आहेत. हें सर्व सांगण्याचें कारण स्वस्तुती नव्हे ; तर तें असें आहे की, त्याकाळीं सिनेमागीतें हिंदी-हिंदुस्तानी-उर्दूमध्ये लिहिली जात, आणि त्या भाषेबद्दल मला आवश्यक तेवढी माहिती आहे ; ही गोष्ट वाचकांपुढे स्पष्ट व्हावी. )
• बुधकरांनी मुख्यत्वें मुखड्याचा संदर्भ देऊन असा मुद्दा मांडला आहे की, ‘कांहींही कारण आणि अर्थ नसतांना , केवळ संगीताची जागा भरण्यासाठी यात ‘की’ हा शब्द टाकला आहे.
 By the way, हा शब्द ‘की’ असा नसून, ‘कि’ असा असायला हवा, किंवा ‘के’ असा असायला हवा होता. मराठीत ‘की’ असा दीर्घ शब्द होतो, तर हिंदीत तो ‘कि’ असा र्‍हस्व होतो, आणि उर्दूत ‘के’ होतो. हिंदी सिनेगीताबद्दल लिहितांना, त्या गीतातले शब्द हिंदी-उर्दूप्रमाणें लिहायला नको कां ?
 आतां, हें ‘के’ चें दीर्घ ‘की’ कोणी केलें ? बुधकरांनी, की खेडेकरांनी , की ‘रसरंग’मधील, अथवा ‘लोकसत्ता’मधील, DTP करणार्‍यानें ?

• ‘संगम’ हा सिनेमा राज कपूरचा होता, संगीत होतें शंकर-जयकिशन यांचें. अर्थातच, गीतलेखन शैलेन्द्र व हसरत जयपुरी यांचें. हिंदी सिनेगीतांमधे कोणीच भरतीचे शब्द घालत नाहीं असें माझें म्हणणें नाहीं. मात्र शैलेन्द्र व हसरत हे लोक भरताड शब्द वापरणारे कवी नव्हेत. आपण चर्चा करत आहोत, तें गीत, त्याची style व शब्द पाहतां, बहुधा हसरत यांचें आहे. ( सिनेगीतांचें पुस्तक पाहून, त्याचा कवी कोण तें varify करतां येईल. पण , तूर्तास, तशी आवश्यकता नाहीं ) . हें गीत गाइलेलें आहे मोहम्मद रफी यांनी.
• या गीताच्या मुखड्याच्या २ ओळींमधील शब्द असे आहेत : ते ज्याप्रमाणें आपल्याला ऐकूं येतात, तसेच खाली लिहिले आहेत. त्यांत कांहीं सुधारणा करायची कां , व काय, तें आपण मागाहून पाहूं या. –
ये मेरा प्रेमपत्र पढ़कर
के तुम नाराज़ न होना ।
के तुम मेरी ज़िंदगी हो,
के तुम मेरी बंदगी हो ।

• आपण आधी पहिली पंक्ती पाहूं या. इथें ध्यानात घ्या की, या ओळीतील ‘के’ हा उर्दूमधील ‘कि’ च्या ऐवजी येणारा शब्द नाहीं. ‘पढ़कर के’ (पढ़करके) असा तो शब्द आहे. मराठीत प्रत्यत शब्दाला जोडून लिहितात, मात्र हिंदी-हिंदुस्तानीत, प्रत्यय बहुतांशी शब्दाला न जोडतां लिहिला जातो.
मात्र, इथें चालीमुळे यतिभंग झालेला आहे , आणि त्यामुळे या ओळीचे दोन अर्ध-भाग असे झालेले आहेत :
‘ये मेरा प्रेमपत्र पढ़कर’ ।
‘के तुम नाराज़ ना होना’ ।

ती ओळ खरें तर अशी तोडली जायला हवी :
‘ये मेरा प्रेमपत्र पढ़कर के’ ।
‘तुम नाराज़ ना होना’ ।

हिंदी सिनेगीतांमध्ये यतिभंग हा विशेष दोष मानला जात नाहीं, अन् त्यामुळे अनेकदा आपल्याला असे यतिभंग दिसून येतात.
 त्यावरून आठवण येते की, सुधीर फडके उपाख्य बाबूजी हे, यतिभंग होऊं नये, किंवा शब्दाचा / शब्दसमुच्चयाचा अयोग्य/ चुकीचा अर्थ निघूं नये म्हणून , चाल बनवतांना व गातांना, अतिशय जागृत असत. (तें मी स्वत: अनुभवलें आहे. मगर, ‘वो कहानी फिर कभी’ ).
 मोहम्मद रफी हे श्रेष्ठ गायक होते. पण त्यांची tendency अथवा त्यांची policy अशी होती, की ते संगीतकारानें दिलेल्या चालीप्रमाणेंच गात असत , मग, त्यात यतिभंग झाला तरी ठीक आहे. त्यामुळे, रफी यांच्या गीतांमधे कांहीं वेळा आपल्याला यतिभंग दिसून येतो.
 लताबाईसुद्धा चालीचें पालनच करीत ; मात्र यतिभंग होत असल्यास, त्या, आधीच्या शब्दाच्या अंतिम अक्षराला लांब ओढून (ऽ ), पुढील भागाशी जोडून घेत. त्यामुळे, चाल कायम राहूनही यतिभंग टळत असे.
• कदाचित कोणाला असें वाटण्याची शक्यता आहे की , ‘पढ़कर के’ यांत कांहीं पुनरोक्ती झालेली आहे काय ? ( कारण, ‘कर’ या हिंदी प्रत्ययाऐवजी उर्दूत ‘के’ वापरतात, जसें की ‘जाकर’ , ‘जाके’).
 पण कांहीं ठिकाणी असें duplication होत नाहीं. उदा. शिवसेनेनची हल्लीची एक स्लोगन होती : ‘करून दाखवलें’. त्याचें हिंदी-उर्दू असें होईल : ‘कर के दिखाया’. इथें डुप्लिकेशन नाहीं.
 हें कसें ? तर, जेव्हां ‘करना’ (करणें) हें क्रियापद वापरलें जातें, त्यावेळी, ‘करून’ या अर्थानें, ‘कर के’ असा शब्द वापरला जातो ( ‘कर कर’ च्या ऐवजी ). ध्यानात घ्या, आपण भाषेच्या रोजमर्राच्या वापराबद्दल बोलत आहोत.
 तेब्हां, गीताच्या या ओळीत, ‘पढ़कर’ किंवा ‘पढ़ के’ , अथवा सध्या आहे तसें ‘पढ़कर के’ असें सगळें चालण्यासारखें आहे. ‘पढ़कर’ किंवा ‘पढ़ के’ म्हणजे ‘वाचून’ ; आणि ‘पढ़कर के’ म्हणजे ‘वाचन करून’.
 कवीला या ओळीत ‘पढ़कर के’ असा शब्द वापरणें योग्य वाटलें. That is his prerogative as a poet.
• वरील विवेचनाचा अर्थ थोडक्यात असा की, या ओळीत भरताड शब्द नाहीं.
• आतां आपण मुखड्याची दुसरी ओळ पाहूं या. या ओळीत दोनदा ‘के’ आलेला आहे,पण तो योग्यच आहे, भरताड नाहीं. या विशिष्ट ‘के‘ चा मराठीत अर्थ आहे – ‘कारण की’. तें ध्यानांत घेऊन, आतां आपण या मुखड्याचा अर्थ पाहूं या –
‘हे माझें प्रेमपत्र वाचून तूं नाराज होऊं नकोस, कारण की, (म्हणजे, हें पत्र लिहिण्याचें कारण की), तूं माझें जीवन आहेस, (कारण की) तूं माझी ‘उपासना’ (बंदगी) आहेस.
 ‘बंदगी’ हा शब्द मुख्यत: ईश्वराच्या उपासनेसाठी वापरला जातो. तेव्हां, प्रेमाच्या संदर्भात ‘बंदगी’ हा शब्द वापरून कवि प्रेमाला किती उंचीवर नेऊन ठेवतो, पहा.
• या ‘के’ ची चर्चा करत असतांना आपण या गीतातील, अगदी सुरुवातीला, म्हणजे मुखड्याच्या आधी आलेल्या, दोन ओळी पाहूं या. या गाइलेल्या माहींत, तर ‘तरन्नुम में’ म्हटलेल्या आहेत. त्या अशा आहेत :
‘मेहरबाँ लिखूँ, हसीना लिखूँ, या दिलरुबा लिखूँ ?
हैरान हूँ के, आप को इस ख़त में क्या लिखूँ ?’
 हिंदी सिनेमातील तत्कालीन गीतलेखक उर्दूतील मोठे कवी होते. त्यामुळे, ही गीतें अनेकदा गझलप्रमाणें लिहिली जात. मात्र, गझलमधील प्रत्येक कडवें हा दोन पंक्तींचा शेर असतो, तर गीताचें प्रत्येक कडवें दोनपेक्षा-अधिक ओळींचें असते.
 गझलमध्ये अनेकदा ‘मत्ल्या’च्या आधी (पहिल्या शेराआधी) अशा ओळी लिहायची पद्धत आहे. ती पद्धत या गीतात शायरनें वापरली आहे.
 या, ‘मेहेरबाँ …’ वाल्या, द्विपदीमधेसुद्धा ‘के’ आलेला आहे. त्याचा अर्थ आहे मराठीतील ‘की’. या दोन ओळींचा अर्थ असा आहे –
‘मी संभ्रमात, दुविधेत, आहे, की, मी या पत्रात तुला काय म्हणूं, तुला कसें कसें address करूं, संबोधू ? मेहरबाँ म्हणूं, (की) हसीना म्हणूं, (की)) दिलरुबा असें म्हणूं (की आणखी कांहीं म्हणूं ) ?’
 हा ‘के’ सुद्धा unwanted नाहीं. आणि, इथें तर, ओळी फक्त ‘तरन्नुम में’ म्हटलेल्या आहेत, म्हणजे संगीतकाराच्या चालीचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे , हा ‘के’ भरताड असण्याचा सवालच पैदा होत नाहीं. तरीही तो वापरला गेलेला आहे, व योग्य तर्‍हेनें त्याचा वापर झालेला आहे.
• तरीही कुणाचें समाधान झालें नसल्यास, आपण हिंदी सिनेगीतांमधील कांहीं अन्य उदाहरणें पाहूं या, जिथें हा ‘के’ वापरलेला आहे –
 ‘अनाड़ी’ सिनेमातील एका गीताचे कांहीं बोल पहा –
‘सबकुछ सीखा हम ने, ना सीखी होशियारी
सच है दुनियावालो, के हम हैं अनाड़ी’ ।
 आणखी एक उदाहरण पाहूं या. सिनेमा आहे, ‘हम दोनों’. शायर आहेत, साहिर लुधियानवी. कांहीं शब्द पहा –
‘अभी न जाओ छोड़कर,
के दिल अभी भरा नहीं’ ।
• आपला मुद्दा स्पष्ट झालेला आहे.
• मात्र , यानंतर कुणाच्या मनात असा प्रश्न उठूं शकेल की, ‘पढ़कर के’ मधील ‘के’ , व ‘के तुम मेरी ज़िंदगी हो’ मधील ‘के’ एकच नाहींत कशावरून ; किंवा दोन्हीत फरक काय ?
 त्यासाठी आपल्याला उच्चारणात जायला हवें. ‘पढ़कर के’ मधील ‘के’ हा दीर्घोच्चार आहे. ( अर्थात्, हिंदी-उर्दूत दीर्घोच्चार हा मराठीइतका लांबवला जात नाहीं. ) तुम्ही, गाइलेलें गीत ऐकून पहा. (आपण यतिभंगाबद्दल आधी बोललोच आहोत, तेव्हां तूर्तास त्याचा विचार आपल्या चर्चेसाठी आवश्यक नाहीं.)
ते शब्द असे ऐकू येतील :
‘ये मेरा प्रेमपत्र पढ़कर
केऽ तुम नाराज़ ना होना ।’
 या तुलनेत, ‘के तुम मेरी ज़िंदगी हो’ मधील ‘के’ पहा. हा उच्चार short आहे, हिंदी ‘कि’ सारखा.
आपण गाणें ऐकलें तर, शेवटी लताबाईंच्या आवाजात हळुवारपणें म्हटलेली हीच ओळ पहा. तिथें, लताबाईंचा उच्चार हा, जवळजवळ ‘कि’ कडेच पोचतो.
 आतां हा ‘के’ चा प्रश्न पूर्णपणें उलगडला आहे, असें म्हणायला हरकत नसावी.

(२)
• आपण चर्चा करत असलेल्या ‘संगम’ सिनेमातील संपूर्ण गीताचे शब्द द्यायची आवश्यकता नाहीं. पण, आस्वाद घेण्यापुरत्या, आपण अंतर्‍यातील कांहीं ओळी पाहूं या .
 या दोन ओळी पहा –
‘तुझे मैं चाँद कहता था । मगर उस में भी दाग़ है ।
तुझे सूरज मैं कहता था । मगर उस में भी आग है ।’
अर्थ स्पष्ट आहे. पण आपण एक खास गोष्ट ध्यानात घेऊं या –
प्रियेला ‘चंद्र’ किंवा ‘सूर्या’ची उपमा अनेक कवी देतात. मात्र प्रस्तुतचा हा कवी तशा उपमांच्या कितीतरी पुढे निघून जातो. तो सांगतो की, त्यानेंही प्रियेला जरी चंद्र-सूर्यांची उपमा दिली असली, तरी ते (चंद्र-सूर्य) कवीच्या प्रियेपेक्षा गुणांनी कमीच आहेत. तें कां, तेंही कवीनें सांगितलें आहे ( दाग़ है ; आग है ) .
अशा तर्‍हेची कल्पना किती अन्य कवींनी मांडलेली आहे, सांगा .
 आणखी एक ओळ पहा :
‘अगर मर जाऊँ, रूह भटकेगी तेरे इंतज़ार में ।’
म्हणजे, हें आपलें प्रेम माझ्या मृत्यूनंतरही संपणार नाहीं. जर मी (प्रेमात) मरण पावलो, तर त्यानंतरही माझा आत्मा (रूह) तुझी वाट बघत थांबून राहील, भटकत राहील.
– या शब्दांमधे दडलेला अर्थ समजण्यासाठी इस्लामधील एक कल्पना आधी जाणून घ्यायला हवी. ती म्हणजे, ‘क़यामत’ची कल्पना. क़यामत म्हणजे महाप्रलय, जगाचा अंत. अशी समजूत आहे की, क़यामतच्या दिवशी, सारे मृतात्मे पापपुण्याचा हिशेबासाठी ईश्वराच्या समोर येतात. ( म्हणजे, अर्थातच, भिन्नभिन्न मृतात्म्यांची तिथें भेट होते) . उर्दू काव्यात क़यामतच्या कल्पनेचा बरेचदा वापर केला जातो.
– आतां , वरील शब्दांचा संपूर्ण अर्थ लक्षात येईल :
तूं मला भेटली नाहींस आणि माझा जरी मृत्यू झाला तरी मी क़यामतची वाट पाहात राहीन (इंतज़ार में) , म्हणजेच क़यामतच्या दिवशीं तुझी भेट होण्याची वाट बघत राहीन . (कारण,अंतत:, त्या दिवशी तर आपली भेट होणारच होणार). त्या दिवसापर्यंत, माझी ‘रूह’ तुला शोधण्यासाठी भटकतच राहीत.
– म्हणजे बघा, किती कमी शब्दांमधे किती अधिक अर्थ भरलेला आहे. ‘गागर में सागर’ म्हणा अथवा ‘कूजे में समंदर’ .

(३)
• आतां थोडेसें , ‘आधी चाल मग शब्द, की, आधी शब्द नंतर चाल’, याबद्दल. हा विषय मोठा आहे. त्यावर एक वेगळा लेख लिहिणें आवश्यक आहे. मात्र, आपण या मुद्द्यात फक्त थोडेसें डोकावून पाहूं या.
 मी स्वत: एक ( कसा कां होईना, पण ) कवी आहे. संगीतकार तर नाहींच. त्यामुळे माझा झुकाव, ‘आधी शब्द, नंतर त्यांना चाल’ असा असल्यास नवल नव्हे. तरीही, मी objectively या बाबीवर विचार करण्याचा इथें प्रयत्न करत आहे.
 श्रेष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे कधीच आधी चाली बांधत नसत. शब्द समोर आल्यावर, ते मुखड्याच्या एकापेक्षा अधिक चाली बांधत, आणि त्यातून एक निवडून मग सबंध गीताची चाल व संगीत तयार करत असत.
खळे यांच्याकडे एक हिंदी सिनेमा येत होता. प्रोड्यूसर म्हणाला, ‘तुम्ही तुमच्या कांहीं ट्यून मला दाखवा’. खळे उत्तरले, ‘ट्यून-बीन ( ट्यून वून ) में नहीं जानता. आप शब्द दीजिये, में संगीत बना दूँगा ’.
 दुसरीकडे असेंही आहे की, खर्‍या शब्दप्रभूला चालीवर शब्द लिहायला अडचण येत नाहीं. हिंदी सिनेमातील कितीतरी सुंदर गीतें चाल बांधून झाल्यावर तिच्यावरून लिहिली गेलेली आहेत. उदाहरण म्हणून, ‘काला बाज़ार’ या सिनेमातील ‘खोया खोया चाँद’ हें गीत घ्या.
अन्नू कपूर यांनी त्यांचा प्रोग्राम ‘गोल्डन ईरा …’ यात, या गीताच्या जन्माबद्दल सांगितलें आहे :
एस्. डी. बर्मन यांनी आधी धुन बांधली होती. गीतलेखनाचें काम होतें शैलेन्द्र यांच्याकडे. राहुल देव बर्मन हा शैलेन्द्र यांच्याकडे शब्द मागायला गेला. ते बसले होते समुद्रकिनार्‍यावर सिगारेट ओढत. राहुलनें त्यांना ट्यून ऐकवली. ऐकतांना ते समोर आकाशाकडे टक लावून पहात होते. त्यांनी लगेचच त्या चालीवर मुखडा रचला व सिगारेटच्या पाकीटावरच बोल लिहून
दिले –
‘खोया खोया चाँद, खुला आसमाँ,
आँखों में सारी रात जाएगी
तुम को भी कैसे नींद आएगी ?’
जेव्हां अनेक वर्षांपूर्व हा सिनेमा रिलीज् झाला तेव्हां मी हें गीत त्यात पाहिलें-ऐकलें होतें, व नंतरही अनेकदा. आणि, त्याच्या शब्दांनी मला मोहित केलें होते. मात्र, अन्नू कपूरनें सांगेपर्यंत, हें शब्द, आधीच रचलेलल्या चालीवरून लिहिलेलें आहेत, हें मला माहीत नव्हतें.
चालीवर शब्द लिहून कांहीं फरक पडला कां ?
 मराठी भावगीतांमधेंही अशी उदाहरणें मिळतात.
– ‘जिवलगा, राहिलें रे दूर घर माझें’ या गीताचें असेंच आहे. आणि, त्याचें वर्णन हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वत: एका प्रोग्रॅममध्ये केलेलें आहे. त्यांना आवडलेल्या व अभिप्रेत चालीवर त्यांना गीत हवें होते. त्या चालीवर शांताबाई शेळके यांनी तें लिहून दिलें. अत्युत्कृष्ट शब्द, सुंदर चाल, व अतिश्रेष्ठ गायन. हृदयनाथांनी सांगेपर्यंत, मला तरी माहीत नव्हतें की हें गीत एका आधीच ठरलेल्या चालीवर लिहिलेलें आहे. पण , चालीवर लिहिल्यानें, शब्दांच्या गुणवत्तेत कांहीं फरक पडला कां ?
– ‘घुंगरू तुटले रे’ या, सुधीर मोघे यांनी लिहिलेल्या गीताचेंही असेंच आहे. तिथें तर, नुसती चालच नव्हे, तर गीतात मुख्य अर्थही काय असायला हवा, हें आधीच ठरलेलें होतें. पण त्यामुळे, मोघे यांना चपखल शब्दरचना करायला कांहींच अडचण आली नाहीं.
 कवी आधी शब्द लिहितो, तेव्हांही, सुरुवातीचे कांहीं शब्द लिहिल्यावर, त्या कवितेची/ गीताची साधारण चाल ( / लय) त्याच्या मनात तयार होते (म्हणजेच, ’वज़न’ ), आणि त्यानुसार तो पुढे लिहीत जातो.
खास करून, गझलमधे तर असेंच होतें , कारण एकदा वज़न (वज़्न) ठरलें , की संपूर्ण गझल त्याच वज़नावर लिहावी लागते.
 चाल ही कवीच्या मनांत असतेच, याचें एक मजेदार उदाहरण :
‘अजुनी रुसुनी आहे’ व ‘आज अचानक गाठ पडे’ ही काव्यें अनिल यांची. अनिल यांनी ती कुमार- गंधर्व यांना दिली (चाल लावून, संगीत तयार करून, म्हणण्यासाठी). कुमार गंधर्वांनी अशी आठवण सांगितलेली आहे की, अनिल त्यांना म्हणाले, की या (अमुक एका) कवितेची चाल मी लावलेली आहे, व ती मी तुम्हाला ऐकवतो. आणि, कुमार ‘नको नको’ म्हणत असतांना अनिल यांनी ती चाल ऐकवली. कुमारांनी म्हटलें आहे, की, ‘मला त्यानंतर त्या गीताला चाल लावायला फार त्रास झाला, कारण, चालीचा विचार केला की अनिलांचीच चाल आठवत असे’. महद्प्रयत्नानें कुमारांनी ती अनिलांची चाल मनातून पुसून टाकली, तेव्हांच ते स्वत:ची वेगळी चाल बांधूं शकले.

निष्कर्ष : तेव्हां , मी तरी एक गोष्ट निश्चितच म्हणूं शकतो. गीतकार श्रेष्ठ असला (/ली), तर, आधी बनवलेल्या चालीवर तो / ती उत्कृष्ट शब्द लिहील. तसेंच, संगीतकार श्रेष्ठ असला, तर, आधी लिहिलेल्या शब्दांना न्याय देणारी चाल व संगीत तो नक्कीच देईल. आणि, कवि किंवा संगीतकार ‘सुमार’ असला, तर ‘सोन्याचें मोनें’ होऊं शकेल, व अंतत: गीत हिणकसच होईल.

• ‘संगम’मधील गीताच्या निमित्तानें एवढी चर्चा पुरेशी आहे , बराबर है के नहीं ?

– – –
– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..