नवीन लेखन...

प्रतिक्रया : (१) सरस्वती-सिंधु संस्कृती; (२) सिकंदर व चंद्रगुप्त; (३) आर्य व द्रविड

Comments on the column in Loksatta - Je Aale Te Ramale

‘जे आले ते रमले’ या ‘लोकसत्तामधील सदरातील मजकुराबद्दल प्रतिक्रया :

(१) सरस्वती-सिंधु संस्कृती ;  (२) सिकंदर व चंद्रगुप्त ; (३) आर्य व द्रविड

  • नुकतेंच, लोकसत्ता, मुंबई आवृत्तीमध्ये, ‘जे आले ते रमले’ हें सुनीत पोतनीस यांचें सदर सुरूं झालें आहे. या सदरात वर्षभर बरेच उपयुक्त व इंटरेस्टिंग मटीरियल वाचायला मिळेल अशी आशा आहे.

परंतु, या सदरात आत्तांपर्यंत जो मजकूर आलेला आहे, त्याबद्दल कांहीं ‘जास्तीची’ (additional) माहिती पुढें ठेवणें मला आवश्यक वाटतें, म्हणून ही प्रतिक्रिया.

(१) सरस्वती-सिंधु संस्कृती :

  • मंगळवार २ जानेवारी २०१८ च्या लोकसत्तामधील या सदरात, पोतनीस यांनी र्वसमावेशक भारतीय संस्कृती’ या उप-शीर्षकाखाली ‘सिंधु-संस्कृती’ ( ‘हरप्पन संस्कृती’ ) बद्दल लिहिलें आहे. मात्र, इतका महत्वाचा विषय त्यांनी ‘चटावरचें श्राद्ध’ उरकतात, तसा हाताळलेला आहे.

[ कदाचित, सुरुवातीचा / चे लेख , हा / हे पुढे येणार्‍या माहितीची एक चुणूक म्हणून लिहिले असतील; आणि तसें असेल तर, कदाचित पोतनीस नंतर या विषयावर अधिक लिहितील अशी मी आशा करतो ] .

  • मात्र, कांहीं गोष्टींचा परामर्श त्यांनी या लेखांकात घ्यायला हवा होता.

[ वृत्तपत्रामधील या सदराला मिळालेल्या जागेच्या आकाराची (size) अडचण असल्यास, दोन-तीन लेखांकात हा विषय हाताळता आला असता ; पण महत्वाची माहिती देणें, हें आवश्यक आहे ].

खालील कांहीं महत्वाची माहिती पहा –

  • १९४७ नंतर भारतीत आर्कियॉलॉजिस्टांनी ‘सिंधु-संस्कृती’ची अनेक नवनवीन स्थळें शोधून काढलेली आहेत. त्यातील बरीच स्थळें ही लुप्त सरस्वती नदीच्या काठी वसलेली होती.
  • लुप्त सरस्वती नदीचें पात्रही आतां रिमोट-सेन्सिंगच्या सहाय्यानें शोधून काढण्यात आलेलें आहे.
  • या नवनवीन स्थळांच्या शोधामुळे, या संस्कृतीला आतां (भारतीय संशोघक तरी ) ‘सरस्वती-सिंधु संस्कृती’ असें म्हणायला लागले आहेत.
  • या संस्कृतीची सध्याच्या-भारतातील, कालिबंगन, धोलावीरा , लोथल वगैरे स्थळें राजस्थान-गुजरात या भागात आहेत.
  • लोथल येथें त्या काळची एक गोदी (डॉक्) सापडलेली आहे, जिचा आकार आजच्या विशाखपट्टम् वगैरे, येथील गोद्यांएवढा मोठा आहे. यावरून, ती संस्कृती पुढारलेली व किती अंशीं ‘मरीटाइम’ संस्कृती होती, याचा अंदाज येतो.
  • मध्य-पूर्वेकडील तत्कालीन संस्कृतीशी या संस्कृतीचा संबंध होता, याचा उल्लेख पोतनीस यांनी केला आहे. मात्र, हाही उल्लेख हवा होता की, तिकडे त्या काळीं या संस्कृतीला ‘मेलुहा’ ( Meluhha ) असें संबोधत असत.
  • हें खरें आहे की, पूर्वी या संस्कृतीचा आरंभ-काळ इ.स.पू. २५०० पासूनचा मानला जात असे. पण नवीन उत्खनांमुळे, तो काळ आतां बराच मागे गेलेला आहे.
  • मेहेरगढ़ येथें दिसून आलें आहे की प्री-हरप्पन संस्कृती बरीच जुनी आहे. हें स्थळ आतां जरी पाकिस्तानात असलें तरी पूर्वीच्या काळीं, भारतीय संस्कृतीची व्याप्ती आजचें पाकिस्तन व आजचें अफगाणिस्तान या भागात होती. त्यामुळे, या स्थळाचा उल्लेख करायला कांहींच हरकत नसावी.
  • हरियाणामधील राखीगढ़ी या स्थळीं महत्वाचें उत्खनन झालेलें आहे. तेथील नगराची व्याप्ती मिहेन-जो-दारो च्या तिप्पट होती.
  • राखीगढ़ी या महत्वाच्या स्थळावरून दिसून येतें की ‘सरस्वती-सिंधु’ संस्कृतीची स्थळें आतां अधिकाधिक पूर्वेला सापडत चाललेली आहेत.
  • राखीगढ़ी येथें आय्. आय्. टी. खरगपुर व बी. ए. आर्. सी. यांच्या संयुक्त संशोधनातून आतां हे सिद्ध झालेलें आहे की, ‘सरस्वती-सिंधु’ संस्कृतीचा कालारंभ हा इ.स.पू. २५०० असा नसून, तो इ.स.पू. ६००० असा मागे गेला आहे. त्याचबरोबर, राखीगढ़ी येथें आधीची आणखी १००० वर्षें, ‘प्री-हरप्पन संस्कृती’ सापडलेली आहे. म्हणजेच, तेथील संस्कृतीचा काल हा इ.स.पू. ७००० इतका मागे गेलेला आहे. 

(२) सिकंदर व चंद्रगुप्त  :

  • याच सदरात, ०४.०१.२०१८ च्या अंकात. ‘परकीयांचा भारत-प्रवेश’ या उपशीर्षकाखाली पोतनीस यांनी अलेक्झँडर ( सिकंदर / शिकंदर / इस्कंदर ) याच्या आक्रमणाबद्दल लिहिलें आहे.
  • सिकंदर यानें भारताच्या केवळ वायव्य ( North-West) भागालाच स्पर्श केला होता. त्याच्याशी संबंध आलेला अंभी हा तक्षशीलेचा राजा होता. तत्कालीन तक्षशीला हें, आजच्या पाकिस्तानच्या पश्चिम सीमेजवळ आहे. तसेंच, सिकंदरच लढाई (Battle) ही झेलम-भागातील पुरु याच्याशी झाली होती. ( याला पुरुलाच ग्रीक ‘पोरस’ असें म्हणतात. संस्कृतमधील अंतिम विसर्गाच्या जागीं ते ‘सिग्.मा’ हें ग्रीक अक्षर लिहितात, ज्याचा लॅटिन लिपीत ‘एस्’ (s) होतो. म्हणजेंच, पोरस = पोरो: = पुरु: ).

त्या युद्धानंतर सिकंदराला आणखी पुढे जायचें होतें , पण ‘समुद्राप्रमाणें’ असलेल्या मगधाच्या सैन्याची माहिती मिळाल्यानें, त्याच्या सैनिकांनी पुढे जायला नकार दिला.

म्हणून  तो तिथूनच परतला. परततांना, त्याच्या, भारताच्या वायव्य भागातील मालवगण व इतर गणराज्यांशी लढाया झाल्या.

थोडक्यात काय, तर सिकंदराचा संबंध भारताच्या एका ( वायव्य) कोपर्‍याशीच आला, व त्यामुळे साहजिकच त्याचा उल्लेख भारतीय पुराणांमध्ये आलेला नाहीं.

  • पोतनीस यांनी सिकंदराच्या संदर्भात ‘चंद्रगुप्त मौर्य’ याचा उल्लेख केलेला आहे, तो पारंपरिक विचारानें बरोबर आहे. मात्र, मूलत:, तो निष्कर्ष कितपत बरोबर आहे, की तेथें कांहीं संशयाला जागा आहे, हें तपासून पाहिलें पाहिजे.
  • भारतीय साहित्यात जर सिकंदराचा उल्लेखच नाहीं, तर मग हा सिकंदर-चंद्रगुप्त_मौर्य-संबंध कसा जोडला गेला ? तर, याचें कारण असें की, सिकंदराचा सेनापती सेल्युकस निकोटार हा सिकंदराच्या अकाली मृत्यूनंतर बॅक्ट्रियाचा (अफगाणिस्तान भूभाग) राजा बनला. त्याचें भारतीय सम्राट ‘चंद्रगुप्त’ याच्याशी युद्ध झालें, ज्यात सेल्युकसची हार झाली. त्यानंतर सेल्युकसचा वकील मेगॅस्थानिस हा ‘चंद्रगुप्ता’च्या दरबारात होता. त्यानें भारताबद्दल ‘इंडिका’ (Indica) या नांवाचा ग्रंथ लिहिला. आज मूळ ‘इंडिका’ उपलब्ध नाहीं. मात्र, त्याच्यातील उतारे, जे नंतरच्या काळातील ग्रीक इतिहासकारांनी वापरलेले होते, ते उपलब्ध आहेत. त्या ग्रंथात, ज्या सम्राटाच्या दरबारात मेगास्थानिस हा वकील होता, त्याचें नांव त्यानें ‘Sandrakottas’ असें दिलेलें आहे. ( हें नांव म्हणजे, ग्रीकवरून कन्व्हर्ट केलेल्या रोमन लिपीतील शब्द आहे. या नांवाची कांहीं व्हेरिएशन्सही ग्रीक साहित्यात सापडतात). या शब्दावरून संस्कृतमधील ‘चंद्रगुप्त’ हें भारतीय नांव सिद्ध होतें.

( पण, कांहीं संशोधक, हें भारतीय नांव ‘चंद्रकेतु’ आहे, असें म्हणतात, जो काशीचा नृप होता. मात्र, तेथें, पाटलिपुत्र — Polibothra —- या, राजधानीच्या नगराचा संदर्भ जोडणें कठीण होतें ).

  • हा ‘सँड्राकोट्टस’ म्हणजे ‘चंद्रगुप्त मौर्य’ असा सिध्दान्त १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्लंडमध्ये कार्यरत असलेल्या मॅक्सम्यूलर या, जन्मानें जर्मन असलेल्या, संस्कृत पंडितानें मांडला. त्यानें याला भारतीय इतिहासाचा ‘शीट्-अँकर’  (Sheet-Anchor) असें नांव दिलें.
  • इथें हें ध्यानात घेणें गरजेचें आहे की त्याकाळीच मॅक्सम्यूलरच्या सिद्धान्ताला कांहीं पाश्चिमात्य व पौर्वात्य संशोशकांनी व पंडितांनी विरोध केलेला होता. तरीही ‘चंद्रगुप्त मौर्या’बद्दलची थिअरीच पुढें चालूं राहिली.
  • असे प्रति-सिद्धान्त मांडले गेलेले आहेत की –
  • सँड्राकोट्टस म्हणजे ‘गुप्तवंशीय सम्राट चंद्रगुप्त दुसरा’, म्हणजेच

‘चंद्रगुप्त- विक्रमादित्य’.

  • सँड्राकोट्टस म्हणजे, ‘गुप्तवंशीय सम्राट समुद्रगुप्त’ हा होय.
  • या बाबीचा किमान उल्लेख तरी पोतनिसांनी करायला हवा होता.

(३) आर्य-द्रविड :

  • ०१ जानेवारी २०१८ च्या लोकसत्तामधील सदरातील उपशीर्षक आहे, ‘स्वकीय आणि परकीय’.
  • या लेखांकात पोतनीस सांगतात की, ‘आर्य व द्रविड’ हे सुद्धा दुसरीकडूनच या प्रदेशात आले. यापैकी, ‘आर्य व द्रविड’ या संकल्पनेबद्दल आपण पुढे पहाणारच आहोत.
  • आजवर झालेल्या संशोधनावरून हा समज रूढ आहे की, मानवाचा उगम प्रथमत: आफ्रिकेत झाला, व तेथून तो सर्व जगभर पसरला. ( यात Homo Erectus , Neanderthal , Homo Sapiens Sapiens या सर्वांचा समावेश आहे ).
  • मात्र, आतां नवनवीन उत्खननांमधून नवनवी नाहिती पुढे येत आहे, व मानवाचा उगम केवळ आफ्रिका खंडात झाला, या सिद्धान्ताला आव्हान देणारे नवीन सिद्धान्त मांडले जात आहेत. असो.
  • सगळेंच भारतात दुसरीकडून आले, हें जरी मानलें तरी, ‘केंव्हां’ हा प्रश्न महत्वाचा ठरतो.
  • आपण महाराष्ट्राचेंच उदाहरण घेऊं या. येथें राष्ट्रिक (रट्टिक), माहाराष्ट्रिक (‘माहा..’ , ‘महा..’ नव्हे), आणि वैराष्ट्रिक , अशा त्रिरट्टिकांचें आगमन जवळजवळ दोन-अडीच हजार वर्षांपूर्वी आलेलें आहे. तत्पूर्वी, महाभारतकालीं ‘नागवंशीय’ इथें आले. रामायणकालांत, याच भूभागात, शबर, वानर असे वन्य जनजातींचे उल्लेख आहेतच. ( पुरातनकालीन भारतातील इतर भागांमध्येही इतर ‘ऑस्ट्रो-एशियाटिक’ वन्य जनजातींचे उल्लेख आहेत) .

नंतरच्या काळात, महाराष्ट्रात, चित्पावन, कर्‍हाडे, लाड ब्राह्मण, अहीर, आदिवासी ठाकर, असे अनेक जन उत्तरेकडून आले.

  • नुसतें ‘त्रिरट्टिकां’चेंच उदाहरण घेऊं या. ते केवळ २००० वर्षांपूर्वी महाराष्ट्र-भूभागात आले असें तूर्तास धरूं या. या सर्व कालात, एक पिढी २० वर्षांची मानली जाई. म्हणजे, २००० वर्षांमध्ये १०० ( हो, शंभर ) पिढ्या झाल्या ! या शंभर पिढ्यांपूर्वीच्या लोकांनी केलेल्या स्थलांतरामुळे (migration) आपण महाराष्ट्रीयांना ‘बाहेरील’ असें म्हणायचें काय ? याचें उत्तर सरळ आहे.
  • आतां आपण ‘आर्य व द्रविड’ ही चर्चा करूं या.
  • खरें म्हणजे, ‘आर्य’ नांवाची कुठलीही जमात नव्हती, आणि नाहीँ. पुरातन संस्कृत साहित्यात ‘आर्य’ असा उल्लेख वाचून १८व्या-१९व्या शतकातील पाश्चिमात्य संशोधकांनी ‘आर्य’ नामक जनजाति असल्याचा निष्कर्ष काढला (जो, अर्थातच, चुकीचा होता). पुरातनकालीन साहित्यातील ‘आर्य’ याचा अर्थ आहे ‘सुधारलेला, सुशिक्षित, सभ्य’. रामायणातील सीता रामाला ‘आर्यपुत्र’ असें संबोधते. अवेस्ता, बौद्ध साहित्य, जैन परंपरा यांतही आर्यचा उल्लेख येतो ; आणि कुठेही ती जनजाति असल्यचा उल्लेख नाहीं.
  • ‘आर्य-आक्रमणा’चा सिद्दांत ही १९व्या शतकातील युरोपीयांची आपल्याला मिळालेली ‘देणगी’ (!) आहे. १९व्या शतकात, युरोपीय राष्ट्रांनी जगभरातील अनेक देशांमध्ये आपल्या ‘कॉलनीज्’ स्थापन केलेल्या होत्या, व यांतील अनेक, त्यांनी लढाया करून, तेथील ‘नेटिव्हांना’ परास्त करून स्थापलेल्या होत्या. त्यामुळे, त्यांना ‘ आर्य-आक्रमणा‘ची‘ थिअरी योग्य वाटली, चांगली वाटली ; एवढेंच नव्हे तर, सोयीचीही वाटली. ( म्हणजे असें की, पुरातन काळीं, ‘आर्यां’नीही तत्कालीन ‘द्रविडां’वर आक्रमण करूनच स्वत:चें स्थान भारतात पक्के केलें होतें ; तर मग आतां १९व्या शतकात युरोपीय तेंच करत आहेत, तें गैर नाहींच ; असें तें एक प्रकारचें जस्टिफिकेशन होतें).
  • यामुळे निर्माण झालेल्या ‘आर्य-द्रविड डिव्हाइड’ वे परिणाम आपण आजही पाहूं शकतो !
  • आज ही ‘आर्य-आक्रमण थिअरी’ कालबाह्य झालेली आहे. मात्र, कांहीं पाश्चिमात्य, आणि भारतीयही, संशोधक, आतां ‘आर्यन मायग्रेशन थिअरी’ मांडूं लागले आहेत.
  • मात्र, ‘आर्य’ ही जशी संस्कृतिक संकल्पना आहे, त्याचप्रमाणें ‘द्रविड’ ही भौगोलिक संकल्पना आहे. बर्‍याच लोकांना माहीत नसेल की, दोनएक हजार वर्षांपूर्वी ‘पंचद्रविडां’मध्ये महाराष्ट्राचाही समावेश होता ! ( आतां बोला ! ) .
  • म्हणजेच, पोतनिसांनी ‘आर्य-द्रविड’ असा उल्लेख करतांना वरील स्पष्टीकरण देणें आवश्यक होतें.

थोडक्यात काय की, पोतनिसांनी लिहिलेलें सर्व बरोबर आहे ; मात्र ती माहिती कांहीं अंशीं अपुरी आहे , आणि त्यांनी, आपण वर पाहिलेल्या माहितीचा समावेश थोडक्यात तरी करायला हवा होता.

नंतरच्या त्याच्या लेखांकांमध्ये पोतनीस या बाबीचा विचार करतील अशी आपण आशा करूं या.

 

— सुभाष स. नाईक , मुंबई.
Subhash S. Naik , Mumbai

M – 9869002126
eMail : vidstainfin@yahoo.co.in

 

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 294 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..