नवीन लेखन...

कॉमन मॅन

तशा त्याच्या फारकाही अपेक्षा नाहीत कुणाकडून. पण ज्या आहेत त्या देखील पुर्ण होत नाहीत. साधी साधी स्वप्न असतात त्याच्या डोळ्यात पण त्यांना देखील नजर लागते. काहीवेळा असही होतं स्वप्न त्याच्या मुठीजवळ आलेलं असतं, अन क्षणात निसटुन जातं त्याच्या हातून. त्याला वाटतं सगळं सुरळीत चालावं, शांततेत चालावं पण खरंच तस चालतं का हो. आणखी एक गंमत आहे त्याच्याबाबत, तो असतो, साधा-भोळा, शांत, सारेकाही निमूटपणे सहन करणारा. पण… पण त्याच्यावाचून सगळेच अडते. तसे पाहिले तर त्याच्यावाचून कुणाचे काही फारसे अडतही नाही. म्हणजे आहेपण आणि नाहीपण. दोन्ही.

रेशनच्या रांगेत उभा राहिला तर त्याला दिवाळीसाठी साधी साखरही मिळत नाही. त्याच्या मुलांना चांगल्या शाळेत लवकर प्रवेश मिळत नाही. त्याला वेळेवर औषधी आणि उपचारही मिळत नाही. दोन दिवस बील भरलं नाही तर लगेच त्याचं घर अंधारात बुडून जातं. त्याच्या नळाला कधीच पुरेसं पाणी येत नाही. त्याला मंदिरात कधीच व्हीआयपी दर्शन मिळत नाही. कुठे दंगल झाली, कुठे नैसर्गिक आपत्ती आली किंवा आणखी काही झालं तर पहिला झटका त्यालाच बसतो. तो सगळं सहन करतो, निमूटपणे, मुकाटपणे, काहीही न बोलता, आवाज न काढता. त्याच्या ठायी सोसण्याचं अचाट बळ असतं. हे बळ कुठुन आलेय ते माहिती नाही. मात्र तो सहन करतो फार… कोण आहे हा इतकं सारं सहन करणारा… बाहुबली. नाही.. तो आहे, आपल्या साऱ्यांच्या आत दडलेला, साऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणारा कॉमन मॅन…! सामान्य माणुस…!

हा कॉमन मॅनच आहे, ज्याच्या जिवावर उभे राहतात इमलेच्या इमले. ज्याच्या जिवावर चालतोय गाडा व्यवस्थेचा, लोकशाहीचा, विश्वासाचा, परंपरेचा अन संस्कृतीचा. तोच सगळं सांभाळतोय हे सारं. सगळे अन्याय अत्याचार सहन करूनही तो मात्र फार आशावादी. त्याला निश्चितपणे वाटतंय हे सारं बदलणार आहे. आज ना उद्या परिस्थिती बदलेल. सारं काही चांगल होईल असे चित्र तो मनाशी रंगवत असतो. त्याच्या चिल्या-पिल्यांना तो हेच सांगत असतो. त्याला चिंता असते अनेक गोष्टींची. त्याला वाटते पाऊस चांगला पडेल की नाही, त्याला वाटते सत्तेत चांगले सरकार येईल की नाही, त्याला वाटते महागाई नियंत्रणात राहील की नाही. अशा एक ना अनेक चिंता त्याच्या मनात घर करून असतात.

सगळीकडे निराशेचं वातावरण असतानाही हा कॉमन मॅन जगण्यातली गंमत विसरत नाही. होळीच्या रंगात तोच रंगतो. पावसाचे गाणे तोच गातो. गणपतीला डोक्यावर घेऊन तोच फेर धरतो. निवडणूकीच्या वेळी मतदानासाठी तोच रांगेत उभा असतो. तोच असतो सर्वांच्या पुढे पर्यावरणाचे रक्षण करायला. तोच असतो भ्रष्ट व्यवस्थेच्या विरुद्ध आवाज उठवायला. तोच असतो कुणाचाही मुलाहीजा न बाळगता आवाज उठवणारा… तोच असतो जागल्या आपल्या देशाचा, परिसराचा… अशा कितीतरी ठिकाणी हा कॉमन मॅन पुढे असतो. छातीचा किडकिडीत पिंजरा घेऊन.. उभा.. त्याच्या या छातीत बारा हत्तीचं बळ येवो ही सदिच्छा आपण व्यक्त करु या…

दिनेश दीक्षित, जळगाव.

Avatar
About दिनेश रामप्रसाद दीक्षित 46 Articles
मी जळगाव येथे वास्तव्यास असतो. जळगाव येथे गेल्या २५ वर्षापासून मी पत्रकारितेत कार्य करत आहे. दहा वर्ष मु. जे. महाविद्यालयाच्या जर्नालिझम डिपार्टमेंटमध्ये गेस्ट लेक्चर घेतले आहेत. मला सामाजिक कार्यात भाग घेण्याची आवड आहे. तसेच तरुण मुलांशी संवाद साधुन त्यांना चांगल्या गोेष्टी सांगण्याचा प्रयत्न करणे आवडते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..