नवीन लेखन...

कम्पॅनियन गोमु (गोमुच्या गोष्टी- भाग १)

“गोमुच्या गोष्टी” ही वीस भागांची कथा मालिका “आम्ही साहित्यिक” मधे प्रसिध्द झाली. लेखक अरविंद खानोलकर यांच्या ह्या वेगवेगळ्या वीस कथा असल्या तरी त्या एकाच अवलिया गोमुच्या जीवनांत घडलेल्या आहेत. गोमु कोण हे तुम्हाला कळेलच. ह्या कथांचे स्वागत होईल अशी अपेक्षा आहे. आजच्या पहिल्या कथे बरोबर एक चित्र दिलय ते खानोलकर यांच्या बहिणीची अजून शाळेत जाणारी नात अर्पिता अमेय सामंत हीने काढले आहे.


गोमुच्या गोष्टी – क्रमांक १ – कम्पॅनियन गोमु

“गोमू संगतीन माझ्या तू येशील काय?” ह्या सुंदर गाण्यांतली सुंदर गोमू ही तरूणी आहे. तिच्या गोष्टी ऐकायला मिळणार म्हणून पुस्तक हातांत घेतलं असेल तर माफ करा. आता मी ज्या गोमुच्या गोष्टी तुम्हांला सांगणार आहे, तो गोमु एक तरूण आहे. गोमु हा गाण्यांतला गोमू नाही पण तरीही त्याच्या गोष्टी लिहून ठेवण्यासारख्या आहेत. म्हणूनच मित्र, त्याचा जवळचा मित्र, म्हणून मी हे महत्त्वाचं ऐतिहासिक काम हाती घेतलंय. त्याला शाळेपासूनच गोमु हे नांव मिळालं. खरं तर ती त्याच्या नांवाची आद्याक्षरे आहेत. त्याचं पूर्ण नांव आहे मुचकुंदराय गोविंदराय गोरेगावकर. मु. गो. ही खरी त्याची आद्याक्षरे. त्यांचा झाला गोमु. मग त्याला दुसरी तिसरीपासून सर्वच गोमु किंवा कोणी गोमाजी म्हणू लागले. त्यालाही त्याचे कांही वाटत नसावे. “नांवात काय आहे?” शेक्सपियर न वाचताही त्याच वयांत त्याला हे पटलं होतं. तो ही दुस-या मुलांना कोणत्या तरी अपभ्रंशित नांवानेच हांका मारीत असे. तर मी त्याच्या त्या शाळा-सोबत्यातला एक. सर्वांप्रमाणेच तो मला ‘पक्या’ म्हणत असे. प्रकाशचा ‘पक्या’ होणारच ना! गोमु लहानपणापासून कुठल्याही मुलांच्या टॉनिकच्या जाहिरातीतील ( डोंगरे बालामृतपासून ते बोर्नव्हीटापर्यंत सर्व) गुटगुटीत बाळासारखा दिसे. आताही तो तसाच होता. तसाच गोलमटोल चेहरा आणि चेह-यावर भोळे भाव. मनांत मात्र नाना कल्पना.

पांच वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. मी तेव्हां नुकताच नोकरीला लागलो होतो. मध्येच शाळा सोडलेला किंवा खरं सांगायचं तर शाळा सोडायला लागलेला गोमु कायम कामाच्या शोधात असे. तसा तो नंतर एसएसस्सी झाला होता. ती एका क्लासची खासियत आणि करामत होती. मध्येच शाळा सोडायला लागलेल्यांना ठराविक वर्षानंतर शाळेबाहेरून एसएसस्सी करतां यायचं. ते क्लासवाले काय करतात माहित नाही पण तो क्लास केलेला एसएसस्सी नक्की पास होत असे. गोमुने आपल्या कुणा दयाळू नातेवाईकाकडून क्लासच्या फी साठी पैसे मिळवले होते आणि तेवढं साधून घेतलं होतं. परंतु त्याला कांही कायम नोकरी मिळाली नव्हती. अर्थात कांहीही काम करायची तयारी असलेल्या गोमुला कायम नोकरी करायची तरी कुठे होती! त्याच्या डोक्यांत धंदा करण्याच्या नाना कल्पना घोळत होत्या. त्याला माहित होतं की आज मोठे उद्योगपती म्हणून मिरवणा-या ब-याच लोकांनी शून्यापासून सुरूवात केली होती. तोही शून्यांतून उद्योगपती होण्याची स्वप्ने मनाशी बाळगून होता. मध्यंतरात मात्र मिळेल ते काम स्वीकारत होता. भांडवलाची सोय होईपर्यंत.

एक दिवस तो माझ्याकडे आला, तो नाचतच. मला हातांना धरून एक गिरकीही घेतली आणि मला घ्यायला लावली.

मी विचारले, “गोमु, लॉटरी लागली की काय?”

गोमु म्हणाला, “लागलेली नाही. पण लौकरच लागणार.”

मी म्हणालो, “लॉटरी लागणार हे तुला आधीच कसं कळलं?”

“ही लॉटरी वेगळी आहे रे!” गोमु.

“म्हणजे लॉटरीच तिकीट सुध्दा न घेतां मोबाईलवरून लॉटरीत पैसे घातलेस की काय?” मी.

गोमु म्हणाला, “नाही रे! असं कांही नाही. उलट मीच पैसे घेतोय आणि तरी लॉटरी मलाच मिळणार.”

त्याला कसली लॉटरी लागणार, हे जाणून घ्यायला मी उत्सुक होतो आणि ती त्याला लागावी अशीही माझी प्रामाणिक इच्छा होती. कारण त्याला लॉटरी लागल्यावर त्याच्यावर खर्च होणारे अथवा त्याला द्यायला लागणारे माझे महिना पांच-सहाशे रूपये वाचणार होते. तेवढ्या पैशांत मला अनेक गोष्टी करतां येण्यासारख्या होत्या. पण तो माझी उत्सुकता ताणून धरु पाहत होता.

बराच वेळ असा गेल्यावर तो म्हणाला, “चल आपण जवळच्या कॅफेमध्ये बसूया. तिथे मी तुला सर्व सांगतो.” कॅफेचा भुर्दंड मलाच भरायला लागणार होता, हा आमच्यांतला अलिखित करारच होता. कॅफेमध्ये आम्ही स्थानापन्न झाल्यावर त्याने सांगायला सुरूवात केली.

“पक्या, तुला तो आपल्यापुढे दोन वर्षे असलेला चंदू कोरडे आठवतोय काय रे?” मला कांही चंदू आठवला नाही.

माझा मख्ख चेहरा पाहून गोमु म्हणाला,

“तो रे! त्याला आपण चंदू बोर्डे म्हणायचो. काय क्रिकेट भारी खेळायचा रे! आतां साला एका कंपनीचा आणि मोठ्या पोटाचा मालक झालाय.”

“हातात पैसा आला की पोटाची ढेरी होतेच. पण त्याचा आणि तुझ्या लॉटरीचा काय संबंध?” इति मी.

“पक्या त्याची प्लेसमेंट कंपनी आहे. साला जिनियस आहे. बेकार लोकांकडून रजिस्ट्रेशनचेच पांच पांच हजार घेतो.”

“तुला पांच हजार भरायचेत कां? माझ्याकडून कांही सोय होणार नाही. स्पष्ट सांगतो.” मी येऊ घातलेलं संकट परतवून लावण्यासाठी म्हणालो.

“बस काय पक्या? हीच माझी परीक्षा केलीस? अरे, त्या चंद्याने माझ्याकडून एक रूपया पण मागितला नाही.” गोमु म्हणाला. हे मला पटलं. गोमुला ओळखणा-या चंदूला पक्के ठाऊक असणार की गोमुचा खिसा कायम रिकामा असतो.

थोडक्यांत सांगायचं तर चंदूने गोमुला एका श्रीमंत पारसी म्हाताऱ्याकडे, जमशेद गोवाडीयाकडे, कम्पॅनियनची नोकरी मिळवून दिली होती. गोवाडीयाचा सेक्टर आठमध्ये एक मजली बंगला होता. पण त्यांत तो एकटाच होता. त्याचा मुलगा अमेरिकेत गेला. तो तिथेच राहिला होता. त्याच्या खडूसपणामुळे गोवाडीयाची बायकोही त्याच्यापासून फारकत घेऊन मुलाकडेच निघून गेली होती. म्हातारा अद्यापही खडूसच होता. तरूणपणी अधिकारपदावर असतांना खूपच ताठ्यांत असावा. त्यामुळे एकुलता एक मुलगा आणि बायको केव्हांच त्याच्यापासून दूर गेली होती. त्याचे इतरही फारसे नातेवाईक नव्हते. बरोबरीच्या ज्येष्ठांबरोबरही त्याचे पटायचे नाही. त्यांत आता तो व्हील चेअरवर अडकला होता. ८४व्या वर्षी बाथरूममध्ये पडल्यानंतर मोडलेले पाय नीट जोडले गेले नव्हते. बाकी म्हातारा शंभरीपर्यंत ठणठणित राहिल अशी प्रकृती होती. नातेवाईक, मित्र, शेजारी-पाजारी नसल्यामुळे तो एकटाच राही. एक ‘महाराज’, राजस्थानी स्वैपाकी त्याला जेवण करून द्यायला येई. वरकामाला बाई येऊन जाई. चंदूनेच त्याच्या डोक्यांत कम्पॅनीयनची कल्पना भरवली आणि मग ते काम गोमुला दिलं.

गोमुला दोन वेळचं जेवण, नास्ता, चहा सगळं त्याच्याकडेच मिळे. काम म्हणजे पेपर वाचून दाखवणे, एखादं पुस्तक वाचणे आणि गप्पा मारणे. वयपरत्वे कांही औषधी गोळ्या घ्याव्या लागत, त्या वेळेवर देणे आणि सकाळी, तसेंच संध्याकाळी एक एक तास म्हाताऱ्याला खुर्चीवरूनच फिरवून आणणे. सकाळी आठ ते आठ बारा तास जात. दुपारी दोन तीन तास विश्रांती मिळे पण तिथेच रहावे लागे. अर्थात पारसी बाबा आणि खडूस म्हटल्यावर तो शिव्या देणारच. मला हे सर्व ऐकून आश्चर्यच वाटलं. कारण गोमुला असं दिवसभर एका फ्लॅटमध्ये म्हाताऱ्याबरोबर कोंडून घालणारी नोकरी त्याने स्वीकारली, हेच आश्चर्य होतं. गोमु म्हणजे आतां इथे, तर दोन तासांनी, मुंबईच्या दुसऱ्या टोकाला असणारा, अस्सल भटक्या होता. त्याला फिरतीच्या नोकऱ्या आवडत. मग तो ह्या म्हाताऱ्याकडे महिनाभर टिकलाच कसा? म्हणजे अजून महिना झाला नव्हता पण तीन आठवडे झाले होते. पण वाक्यागणिक शिव्या देणाऱ्याकडे गोमुने एवढे दिवस रहाणं म्हणजे हॉलीवुडच्या नटीने एकही डायव्होर्स न घेण्यासारखंच होतं.

मी गोमुला विचारल्यावर तो म्हणाला, ” पक्या, मला जे स्पष्ट दिसतं, ते तुला दिसत नाही हाच तर तुझा “ड्रॉबॅक” आहे. अधूनमधून तो माझ्या तोंडावर इंग्रजी शब्द फेकत असे.

मी म्हटलं, “मला काय दिसत नाही?”

गोमु म्हणाला, “अरे, हा आसामी..”

“आसामचा आहे हा म्हातारा?” माझा भोळा प्रश्न.

” पक्या साल्या, फालतू विनोद करू नकोस. पारसी गुजरातचे. अरे, हा बावाजी कोट्याधीश आहे. रहात्या बंगल्याशिवाय दोन फ्लॅटसचा मालक आहे. कमीत कमी आठ-दहा कोटींचे शेअर आणि तेवढीच रोकड त्याच्याकडे आहे. बॅंकेतले पैसे वेगळे. त्याने सध्या एक मृत्यूपत्र केलयं त्याप्रमाणे कुणातरी दूरच्या भाच्याला सगळी संपत्ती तो देणार आहे. मी त्याला असा कांही खूश केलाय की तो आपलं मृत्यूपत्र नक्की बदलणार. मला एक कोटी नाही तरी निदान पंचवीस लाखांहून कमी कांही तो ठेवणार नाही. बघशीलच तू. एवढं भांडवल एकदा माझ्या हातात आलं की माझं उद्योगपती बनण्याचं स्वप्न पूर्ण झालंच समज.” गोमुचा आत्मविश्वास मध्यमवर्गाला न साजेसा होता.

पण मी मध्यमवर्गीय प्रश्न विचारलाचं, ” अरे, पण तो शंभरी गांठेल असा आहे ना!”

“ती बोलायची पध्दत झाली. ह्या वयांत काय भरोसा? एखाद वर्ष सुध्दा मोठ्ठ असतं. तेवढा वेळ वाट पहायची तयारी आहे माझी.” गोमु म्हणाला

“पण मग आताचं कां मागत नाही त्याच्याकडून?” परत माझा मध्यमवर्गीय प्रश्न.

“तो ही प्रयत्न केला. तेव्हांच तो म्हणाला, ‘तू तुझा काम कर नी. मी विलमंदी तुला काय तरी देईल.’ आता थोडी वाट पहायला काय हरकत आहे? खूश झाला तर सगळी संपत्ती सुध्दा माझ्या नांवावर करून जाईल. बावाजीचा कांही भरोसा नाही. बघच तू.”

ह्यानंतरच्या शनिवारी म्हणजे दोनच दिवसांनी गोमुने मला येऊन आनंदाची बातमी दिली की म्हाताऱ्याने सोमवारी मृत्यूपत्र बदलायचं ठरवलंय. “एक दिवस त्याला थोडा ताप होता. तेव्हां मी खूप धांवपळ केली. तो खुश होऊन परत म्हणाला देखील, ‘माझ्या विलमध्ये तुला मी मालामाल करून टाकेन.’ मी कांही त्यांत रस आहे असं दाखवलं नाही पण एखाद्या नर्सप्रमाणे त्याची काळजी घेतली. आता सोमवारीच माझ्या लॉटरीच ठरेल. मग फक्त वाट बघत सेवा करायची.” नेहमी धंद्याच्या गोष्टी करणाऱ्या गोमुच्या तोंडी “सेवा” शब्द ऐकून मला मात्र थोडं चमत्कारिक वाटलं. बाकी विलबद्दल मी फक्त पेपरांत आणि कथा- कादंबऱ्यांतच वाचलं होतं. आमच्या कुळांत कर्ज मागे ठेऊन जग सोडण्याचाच रिवाज असल्यामुळे विल कधी पाहिलं नव्हतं.

सोमवारी संध्याकाळी कामावरून परत येतांना मला गोमुची आठवण झाली. मनातल्या मनांत देवाला विनंतीसुध्दा केली की गोमु लखपती होउ दे. खोलीवर परत आलो तर दाराशी ठीय्या मारून बसलेला, खचलेला गोमु दिसला. शनिवारचा गोमु आणि सोमवारचा गोमु ह्यांत निवडणुकीत जिंकलेल्या आणि हरलेल्या उमेदवाराइतका किंवा शतक काढलेल्या आणि शून्यावर आऊट झालेल्या फलंदाजाएवढा फरक होता. मी म्हटलं, ” गोमाजीशेठ, काय, आज काय झालं? बावाजीने मृत्यूपत्र बदललं की नाही?” गोमु रागाने म्हणाला, “मरो, तो म्हातारा आणि त्याच मृत्यूपत्र. माझ्या पोटांत कावळे कोकलताहेत. आज कुठेतरी मोतीमहल नाहीतर कामतमध्ये जेवायला तरी घाल.”

माझा त्याच दिवशी पगार झाला होता म्हणून जास्त आढेवेढे न घेतां मी त्याला म्हणालो, “चल जाऊया.”

दोन चार घांस पोटांत गेल्यावर गोमु म्हणाला, “ह्या खडुस म्हाताऱ्यांवर, मग तो पारसी असो की सिंधी, शहाण्याने विश्वास ठेऊ नये. ज्येष्ठ नागरिक म्हणे.” मी नुसता हुंकार भरला. मला फक्त माझ्या वडीलांचा अनुभव होता आणि ना ते एवढे म्हातारे होते ना श्रीमंत. मग झाला प्रकार गोमुने मला सांगितला. रविवारी गोमु बावाजीला खुर्चीवरून बागेंत म्हणजे सीबीडीच्या मॅंगो गार्डनमध्ये घेऊन गेला होता. तो अगदी काळजीपूर्वक खुर्ची ढकलत होता. अचानक बागेंत त्याला शकु दिसली. ती “अभ्यंकरांची शकु” अशी ओळख गोमुने मला दिली पण त्याआधीच मला ती आठवली होती. आधी आमच्या शाळेत आणि मग माझ्या कॉलेजमध्ये ब्यूटी क्वीन होती. मी आणि गोमु बालपणापासून तिला ओळखायचो. ती दिसल्यावर गोमुचं भान हरपणं साहाजिक होतं. तिच्याशी बोलतां बोलतां तो बावाजीलाच काय पण खुर्चीलाही विसरला. त्याचा खुर्चीवरचा हात केव्हांच सुटला होता. त्या बागेतले रस्ते उंचसखल, उतरते आहेत. जेव्हा गोमुचा हात सुटला तेव्हां लांबलचक उतारावर असलेली त्या बावाजीची चाकांची खुर्ची वेगाने घसरायला लागली. बावाजी ओरडू लागला, “अरे मरी गssयो, मने पकडो, पकडो.” पण शकुवर डोळे खिळवलेल्या गोमुला त्याचा ओरडा कांही ऐकू आला नाही. खुर्ची घसरत टोकाला असलेल्या छोट्या झुडुपांवर जाऊन उलथली. बावाजी आंत आणि वर खुर्ची असा अडकला. तिथेच चार पाच बायका बसल्या होत्या. त्यांच्यातच चार घरी स्वैंपाकाचं काम करणाऱ्या पन्नाशीतल्या राधाबाईही तिघींबरोबर बसल्या होत्या. राधाबाई धांवल्या. त्यांनी म्हाताऱ्याला उचललं. त्याची खुर्ची सरळ करून बसवलं. बावाजीला फक्त थोडंस खरचटलं होतं. राधाबाईच त्याची खुर्ची ढकलत त्याला त्याच्या घरी घेऊन गेल्या. शकु गेल्यावर भानावर आलेल्या गोमुला तिथे बसलेल्या बाकीच्या बायांनीच ती माहिती दिली. सोमवारी सकाळी गोमु कामासाठी बंगल्यावर हजर झाला. तर दरवाजा राधाबाईंनीच उघडला. झालेल्या महिन्याचा पगारही न देतां बावाजीने गोमुला कामावरून कामावरून काढून टाकल्याचंही राधाबाईंनीच सांगितलं. ‘गोमुने पगार मागितला तर पोलिस केस करीन’ असं बावाजी म्हणत होता, हेही त्याच म्हणाल्या. बावाजी आणि राधाबाई दोघांनी “लिव्ह इन रिलेशनशिप”मधे रहायचं ठरवल्याचं सांगताना राधाबाई लाजत होत्या की त्यांचे डोळे चमकत होते, हा प्रश्न गोमुला पडला होता. पण त्याला एवढं समजलं की आपली कम्पॅनियनशिप संपली.

©अरविंद खानोलकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..