संगणक विषाणू म्हणजे कॉम्प्युटर व्हायरस हा आपल्या शरीरात घुसून रोगराई निर्माण करणाऱ्या विषाणूसारखा नसतो. संगणक विषाणू म्हणजे एक प्रोग्रॅम असतो, पण तो काही चांगले काम करण्याऐवजी घातक कामे करतो.
संगणकात व्हायरस शिरल्यानंतर तो त्यात असलेल्या फाइल्समधील माहिती विकृत करून टाकतो, शिवाय तो तुमच्या संगणकात जे चांगले काम करणारे प्रोग्रॅम असतात त्यांनाही विकृत करतो. त्यामुळे तुमचा संगणक काम करू शकत नाही.
इंटरनेटच्या वापरामुळे, त्याचबरोबर सीडीच्या वापरामुळे संगणक विषाणू तुमच्या संगणकात येऊ शकतात. मानवी शरीरातील विषाणू व संगणक विषाणू यात फक्त एकच साम्य असते. ते म्हणजे दोघेही आपल्या अनेक प्रतिकृती निर्माण करून घातक परिणाम खूपच वाढवतात.
अमेरिकाच नव्हे तर इतरही अनेक देशांत संगणक प्रणाली या एकमेकांना जोडलेल्या असतात. त्यामुळे एकदा का विषाणू यात प्रविष्ट झाला की, सर्वच संगणक काम करेनासे होतात.
संगणक विषाणूचे पॅरासाईट व बूट असे दोन प्रकार असतात. यातील पॅरासाईट विषाणू हे तुमच्या संगणकातील प्रोग्रॅममध्ये घुसतात व काम करू देत नाहीत. बूट विषाणू हा हार्ड डिस्कमध्ये शिरून आपल्या प्रतिकृती तयार करतो. त्यामुळे तो अधिक घातक ठरत असतो. संगणकात घुसणारे विषाणू हे दुसऱ्या एखाद्या प्रोग्रामच्या पाठंगुळीवर बसून येतात. त्यामुळे ते सहज कळत नाहीत. जेव्हा कळते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. मालवेअर, अॅडवेअर व स्पायवेअर हे घातक प्रोग्राम हे विषाणूच्या व्याख्येत बसत नाहीत. कारण त्यांच्या प्रतिकृती तयार होत नाहीत. असे असले तरी ते तीनही घातक असतात.
१९४९ मध्ये संगणक विषाणूची सैद्धांतिक कल्पना ही जॉन व्हॉन न्यूमन यांनी मांडली होती. मायकेल क्रिश्टन यांच्या ‘द टर्मिनल मॅन’ या कादंबरीत संगणक विषाणूचा उल्लेख सापडतो. तरी प्रत्यक्षात कॉम्प्युटर व्हायरस हा शब्द डेव्हिड गेरॉल्ड यांच्या ‘व्हेन हार्ली वॉज वन’ या कादंबरीत वापरला गेला. इमेल व्हायरस व वर्म असे संगणक विषाणूचे आणखी काही प्रकार आहेत.
अगदी सुरुवातीला अर्पानेटमध्ये असा विषाणू सापडला होता. नंतर अॅपल वन टू थ्री असे तीन विषाणू आले. माय डूम (२००४), मेलिसा (१९९९), आय लव्ह यू (२०००) या विषाणूंनी आतापर्यंत अनेक संगणक प्रणालींना अडचणीत आणले होते. मेलिसा विषाणूचा प्रोग्राम लिहिणाऱ्या डेव्हिड स्मिथ याला अमेरिकेत वीस महिन्यांची शिक्षा झाली होती.
फ्रेड कोहेन यांनी संगणक विषाणूची व्याख्या केली. संगणक विषाणू हा प्रोग्राम किंवा आज्ञावली लिहिणारे काही माणसेच असतात व ती गुन्हेगारी मानसिकतेची असतात व त्यांना दुसऱ्यांना त्रास देण्यात असुरी आनंद असतो. कॉमवॉरियर नावाचा विषाणू तर मोबाईलमध्ये घुसला होता.
Leave a Reply