
हा सुवेझ कालवा, थक्क करिल मानवा.
दो बाजूस वाळवंट, नील गगन वर अफाट
भोवळ दृष्टीस येत, उष्ण वाहते हवा.
नवसंस्कॄती नवविचार, शास्त्रशोध जे अपार,
करित त्यांस मुक्तद्वार, हाच काय कालवा ?
— प्र. के.अत्रे.
युरोप आणि दक्षिण आशियाला समुद्रमार्गे सुलभरित्या जोडणाऱ्या ऐतिहासिक सुवेझ कालव्याच्या बांधकामाला २५ एप्रिल १८५९ साली सुरूवात झाली व दहा वर्षे अहोरात्र काम केल्यानंतर १७ नोव्हेंबर १८६९ रोजी हा कालवा वाहतुकीस खुला करण्यात आला. इजिप्तमधून जाणाऱ्या या मानवनिर्मित समुद्र मार्गामुळे युरोपातील बोटींना दक्षिण आशियात पोहोचण्यासाठी आफ्रिका खंडाला वळसा घालण्याची आवश्यकता उरली नाही. त्यामुळे युरोप व आशियातील दळणवळण, विशेषत: व्यापार कित्येक पटींनी वाढला. सुवेझचा कालवा हा मानवाने निसर्गाच्या रचनेत केलेला पहिला महत्त्वाचा बदल. सैद बंदर ते सुवेझ येथील तेवफिक बंदर यांना जोडणाऱ्या या कालव्याची लांबी तब्बल १९३.३० कि.मी. म्हणजे जवळपास मुंबई ते पुणे इतकी आहे. पण त्यामुळे बोटींचा सुमारे सात हजार कि.मी.चा आफ्रिकेचा वळसा वाचतो. अर्थात सुवेझच्या बांधकामाला सुरुवात करण्याचा उद्देश केवळ सागरी प्रवासातील वेळेची बचत व त्यामुळे युरोप व आशियातील व्यापारत वाढ व्हावी, इतकाच नव्हता. अरब राष्ट्रे व अन्य जग यांच्यातील विकोपाला जाणारे संबंध आणि त्याचा तेल व्यापारावर होणारा परिणाम, त्यामुळे पाश्चिमात्य देशांचे अरब राष्ट्रांवर वाढत चाललेले आर्थिक अवलंबन यांची किनारही सुवेझ कालवा तयार करण्यामागे होती. सुवेझ बांधण्याच्या कामासाठी अर्थातच इजिप्तने पुढाकार घेतला. पण तो तयार झाल्यावर या केवळ एक पदरी जलमार्गावर कोणाचे नियंत्रण राहणार, यावर वारंवार वाद पेटत राहिले. त्यामुळे दोन्ही महायुद्धे व नंतर अरब इस्त्रायल यांच्यातील वितुष्ट यांचे परिणाम सुवेझच्या वाहतुकीवरही होत राहिले. अनेकदा हा कालवा जलवाहतुकीसाठी बंदही झाला. या कालव्यातून वाहतूक अधिक सुलभ व जलद व्हावी, म्हणून २०१४ मध्ये या कालव्याची रुंदी व खोली वाढवण्याच्या कामाला वेगाने सुरुवात झाली. फेब्रुवारी २०१६ मध्येच हे काम पूर्णही झाले व तो वाहतुकीला मोकळ झाला. युद्धासारख्या परिस्थितीतही या कालव्यातून कोणत्याही देशाची व्यापारी वाहतूक करणारी जहाजे सुवेझमधून प्रवास करू शकतील, असा आंतरराष्ट्रीय करार आता संमत झाला आहे. पाश्चिूमात्य देशांना तेल, नैसर्गिक वायू आणि इतर मालाचा या कालव्यातून पुरवठा होता. जगातील एकूण सागरी व्यापारापैकी १० व्यापार याच कालव्यातून होतो. इजिप्तला सर्वाधिक परकी चलन सुएझ कालव्यामार्फत मिळते. २०१५ मध्ये इजिप्त सरकारने कालव्याचा विस्तार केल्याने मोठी जहाजेही यातून जाऊ लागली.
नुकतेच मार्च २०२१ मध्ये जगातील सर्वांत मोठ्या मालवाहतूक जहाजांपैकी एक असलेले ‘एम व्ही एव्हरग्रीन’ हे जहाज जगप्रसिद्ध सुवेझ कालव्यात सरकून तिरके झाल्याने या कालव्यातून होणारी वाहतूक ठप्प झाली होती.
‘एव्हरग्रीन’ हे पनामा देशाचे मालवाहतूक जहाज असून या जहाजातून आशिया आणि युरोप दरम्यान सामानाची ने-आण केली जाते. हे जहाज तिरके होऊन अत्यंत अरुंद असलेल्या कालव्याच्या किनाऱ्यावर फसून बसले. या जहाजाने लाल समुद्रातून सुएझ कालव्यात प्रवेश करताच जोरदार वाऱ्यांमुळे ते सरकले. जहाजातून एकही कंटेनर खाली पडला नसला तरी जहाज रुतून बसले असल्याचे या जहाजाचे संचालन करणाऱ्या एव्हरग्रीन मरीन या तैवानमधील कंपनीने सांगितले. जहाज कालव्यात शिरले त्यावेळी ५० किमी प्रतितास या वेगाने वहात होते. जहाजाचे अथवा त्यावरील कर्मचाऱ्यांनाही काही त्रास झाला नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.
हा कालवा अत्यंत अरुंद असल्याने पूर्ण मार्ग अडवून फसलेल्या या जहाजामुळे इतर अनेक जहाजे अडकून पडली होती. एव्हर ग्रीन हे जहाज ४०० मीटर लांब असून ५९ मीटर रुंद आहे. या जहाजावर सध्या २० हजार कंटेनर होते. जहाजाचे वजन दोन लाख २० हजार टन होते. जहाज रुतल्याच्या ठिकाणी वेगाने वाळू उपसा करून मार्ग मोठा करुन जहाज थोडे बाजूला करण्यात यश आले व वाहतूक सुरु झाली.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply