नवीन लेखन...

कंट्रोलर

त्या वेळी मी नुकताच जपान दौर्‍याहून परतलो होतो. जपानमध्ये वावरताना तेथील महागाईचा विचार मनात असे अन् स्वाभाविककपणे सारे हिशोब रुपयांत होत असत. पुण्याला आल्यानंतर रस्ते, वाहतूक इथली आणि स्वच्छता, टापटीप, शिस्त या बाबी जपानच्या, अशी तुलना सतत होत असे. एका अर्थानं मी पुण्यात सरावत चाललो होतो.

‘हे असंच चालायचं’ हे वाक्य जवळचं वाटू लागलं होतं. त्या वेळी मी पुण्यापासून वीस किलोमीटरवर निगडी येथे राहत असे अन् रोज बसने प्रवास करीत असे. पुण्याच्या पालिका बस स्टॅन्डवरून पिंपरी-चिंचवड-निगडीसाठी बस निघत. तर, असाच एकदा निगडीला जाण्यासाठी म्हणून बस स्टॉपवर आलो. बरीच मोठी रांग होती, पण बस डबलडेकर होती, ती मिळण्याची शक्यता अधिक होती… पण तसे व्हायचे नव्हते. दहा-बारा प्रवाशांसह मला खालीच थांबावे लागले. आता किमान वीस मिनिटांची प्रतीक्षा होती. एकूणच बस स्टॅन्डही काहीसा आळसावलेला होता. हालचाली कमी होत्या; कारण एवढ्यातच सर्व बस मार्गस्थ झालेल्या होत्या. बस स्टॅन्डवरच्या दुसर्‍या रांगेत मी होतो. तोंडात पान चघळत होतो. अचानक माझ्या समोरच्या रांगेतल्या एका प्रवाशानं काही हालचाल केली अन् बस स्टॉपवर, जिथं बस उभी राहते तिथं एक लांबलचक लालभडक पिचकारी आकाराला आली. त्या प्रवाशानं त्याच्या रंगत जाणार्‍या पानाचा मुखरस स्वतःच्या कौशल्यानं रेखाटावा तसा बाहेर फेकला होता. काळ्याभोर डांबरी रस्त्यावर लालभडक पानाची पिचकारी आकाराला आली होती. दिसायला ते फारच विचित्र दिसत होते, पण त्या प्रवाशाला किवा इतरांना त्यात वेगळे असे काही वाटत नव्हते. स्टॅन्डवर जो कंट्रोलर असतो तो बहुधा या सार्‍या घटना त्याच्या छोट्याशा खोलीतून पाहत असावा. हे सारं झाल्यानंतर तो बाहेर आला. त्यानं त्या संभावित प्रवाशाकडे एक कटाक्ष टाकला अन् वळला. बाजूला गेला. तो प्रवासी क्षणभर हबकला, पण नंतर मनाच हसला. मी मात्र तोंडात पान असल्यानं उगाचच वरमलो. तो कंट्रोलर बाजूला गेला, जिथं बसमध्ये पाणी घालण्यासाठी झार्‍या ठेवलेल्या असतात तिथून त्यानं एक झारी घेतली. ती पाण्यानं भरून काढली अन् ती झारी घेऊन तो जिथं रंगारंग झालेलं होतं तिकडे चालू लागला. स्वच्छतेची आच असली की माणूस काय करू शकतो, असा भाव तोवर प्रतीक्षा करणार्‍या प्रवाशांच्या मनात आला असावा. पण, तो जवळ येऊन थांबला, त्यानं ती झारी तिथंच ठेवली, पुढे येऊन म्हणाला, ‘‘ओ, मिस्टर, या पुढं. घ्या ती झारी अन् साफ करा ते सारं.’’ हे त्या प्रवाशाला आणि आम्हालाही अपेक्षित नव्हतं; पण घडलं. मी पिचकारी मारली नाही, असं रेटून बोलण्याची संधीही त्या कंट्रोलरनं दिली नाही. तो प्रवासी निमूटपणे पुढे आला. हातात झारी घेऊन त्यानं स्वतःच्या मुखरसानं रंगलेला रस्ता स्वच्छ केला आणि आपल्या जागेवर येऊन बसला. अवघ्या दहा मिनिटातला हा सगळा प्रसंग, पण त्या प्रवाशाला त्याची चांगली अद्दल घडली होती. कधी काळी पान खाऊन तोंड रंगवणार्‍या मलाही ‘आपण किती पाण्यात’ याची जाणीव झाली होती. बस स्टॉपवरचा प्रत्येक माणूस त्या कंट्रोलरकडे अत्यंत आदरानं, विस्मयानं पाहत होता. तो प्रवासी मात्र आता बस लवकर येऊ देत, अशी प्रार्थना करीत असावा.

हे सारं आज आठवण्याचं कारणही तसंच आहे. आजच्या वृत्तपत्रात एक वाचकाचं पत्र वाचलं. एका वृद्धानं लिहिलंय ते. पत्रातच त्यांनी स्वतःचं वयही दिलंय. ते म्हणतात, ‘‘पुण्यात किवा महाराष्ट्रात हेल्मेटची सक्ती करण्याचा कायदा झाला. त्यावर आंदोलनं झाली, तरीही कायदा अस्तित्वात आला. काही दिवस कारवाईच्या बातम्या येत असत. आता त्याही बंद झाल्यात. पुण्यातील हेल्मेटसक्ती रद्द झाली आहे का, कृपया संबंधित खात्यानं खुलासा करावा.’’ हे पत्र वाचताना पुण्यात हे असं पत्र येणारच असं मनात येत होतं; पण हेल्मेटच्या सक्तीसाठीचं या वृद्धानं दिलेलं कारण आणखीही ज्ञानात भर टाकणारं होतं. पत्रात म्हटलं होतं, की हेल्मेट वापरणार्‍या व्यक्तीला दुचाकीवर बसून पान, तंबाखू किवा अशीच पिक मारता येत नाही. स्वाभाविकपणे माझ्यासारख्या वृद्धाचे कपडे रंगण्याचं प्रमाण कमी होण्याची शक्यताही आता हेल्मेट वापराचं प्रमाण संपल्यानं मावळली आहे. ते असंही म्हणतात, की मी मोपेड वापरतो. या वयात तेच सोईचं पडतं, पण अशात कोणी पिक मारली, तर वेगानं जाऊन त्याची गच्ची पकडण्याची क्षमताही आता नाही; तेव्हा हेल्मेटचा हाही एक लाभ होता.

या वृद्धानं व्यक्त केलेलं मत पुण्याशी संबंधित असलं तरी गावाचं नाव कोणतंही टाका, वास्तव तेच असेल, अशा प्रकारचं आहे. माझ्या जपान दौर्‍याला पंधरा-वीस वर्षे झाली. बदल खूप झाले, पण माणसं आणि त्यांचं हे असं वागणं कायम आहे. हे पत्र वाचताना ही जाणीव मला सातत्यानं होत होती खरंच, पीएमटीच्या त्या कंट्रोलरसारखे जागोजागी निर्माण झाले तर?तुम्हाला काय वाटतं?

— किशोर कुलकर्णी

Avatar
About किशोर कुलकर्णी 72 Articles
श्री. किशोर कुलकर्णी हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते लोकमतच्या ऑनलाईन आवृत्तीचे बराच काळ संपादक होते. सध्या ते पुणे येथे वास्तव्याला आहेत. अध्यात्म या विषयावर विपुल लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..