आपली विजेची गरज ही वेगवेगळ्या स्वरूपाची असते. उदाहरणार्थ, आपल्या मनगटावरच्या घड्याळातली विजेची गरज ही अत्यल्प असते व ती छोट्याशा बटण-सेलने भागू शकते. याउलट एखाद्या शहराला वीजपुरवठा करायचा असेल तर त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वीज निर्माण करावी लागते. ही मोठ्या प्रमाणावरची विजेची निर्मिती मुख्यतः औष्णिक, जलविद्युत आणि अणुऊर्जा प्रकल्पांद्वारे केली जाते.
विद्युतनिर्मितीसाठी वापरली जाणारी मुख्य यंत्रणा ही या तीनही प्रकारच्या प्रकल्पांत जवळपास सारख्या पद्धतीची असते. या सर्व प्रकल्पांत जो मुख्य विद्युतनिर्मिती संच (म्हणजे जनित्र) बसवलेला असतो, त्यात वीजवाहक तारांचं वेटोळं वापरलं जातं. या वेटोळ्याभोवती चुंबक बसवून तिथे चुंबकीय क्षेत्र निर्माण केलं जातं. तारेचं वेटोळं हे एका दांड्याला जोडलेलं असून दांड्याच्या दुसऱ्या टोकाला पंख्यासारखी यंत्रणा जोडलेली असते. हा पंखा फिरला की दांडा फिरतो. दांडा फिरला की त्याच्या टोकाला जोडलेलं तारेचं वेटोळं फिरतं. हे तारेचं वेटोळं चुंबकीय क्षेत्रात वसलेलं असल्यामुळे त्यात वीजेचा प्रवाह निर्माण होऊन वीजेची निर्मिती होते.
वीज निर्माण करण्यासाठी जनित्राला जोडलेला हा जो पंखा फिरवावा लागतो, तो प्रत्येक पद्धतीनुसार वेगवेगळ्या प्रकारे फिरवला जातो. जलविद्युत प्रकल्पात हा पंखा फिरवण्यासाठी धरणात साठवलेलं पाणी वापरलं जातं. धरणाच्या दरवाजातून अतिशय वेगाने येणारं हे पाणी पंख्याच्या पात्याला जोरात ढकलतं व त्यामुळे तो पंखा फिरायला लागून वीजनिर्मिती होऊ लागते. औष्णिक प्रकल्पांत दगडी कोळसा व नैसर्गिक वायुसारखं एखादं इंधन जाळून पाण्याचं रुपांतर वाफेत केलं जातं. ही वाफ पंख्याच्या पात्यांना ढकलते व पंख्याला गती मिळून वीजेची निर्मिती होते. अणुऊर्जा प्रकल्पातली वीजनिर्मिती ही अशाच प्रकारे वाफेद्वारे पंखा फिरवून केली जाते. ही वाफ निर्माण करण्यासाठी लागणारी उष्णता केंद्रकीय क्रियांद्वारे निर्माण केली जाते.
Leave a Reply