‘या मुलाचे आता शिक्षणाचे वय झाले आहे. शाळेत घाला त्याला’, असे पहिली सहा वर्ष घरात काढल्यावर पूर्वी म्हटले जायचे. आताची मुले दुसर्या वर्षापासून शाळेत अडकतात ते सोडा. पण कोरोनाच्या या संकटाने सर्वांनाच शाळेत ऍडमिशन दिली आहे. शाळेतही न गेलेल्यांपासून ‘आपल्याला सर्व ज्ञान प्राप्त झाले आहे’ व ‘मला आता शिकण्यासारखे काही राहिले नाही’ असे मत असणार्या डझनावारी डिग्र्या घेतलेल्या विद्वानांपर्यंत सर्वांना; दोन वर्षापासून 102 वर्षे वय असणार्या सर्वांना; दारिद्र्यात वाढलेल्यांपासून ऐश्वर्यात लोळणार्या सर्वांना; नोकरदारांपासून उद्योगपतींपर्यंत सर्वांना; थोडक्यात या भुतलावर असलेल्या सर्व मानवांना एकाच वर्गात बसविण्याची किमया केली ‘कोरोना’ या अशिक्षिताने. ‘माझ्या कोरोना स्कूलच्या क्लासरूमध्ये तुमचे स्वागत आहे.’ अशी सुरुवात करून या टीचरने थोडक्यात वर्गाची नियमावली सांगितली. त्यातील महत्वाचे नियम असे.
-
- तुमच्याकडून कोणतीही फी घेतली जाणार नाही.
- तुम्ही जेथे आहात तेथून तुमच्या आवडीचा अभ्यासक्रम शिकणार आहात.
- तुमच्या अडचणी तुम्हीच सोडवायच्या व मार्ग तुम्हीच काढायचा.
- घराबाहेर न पडता इतर संपर्क साधने तुम्ही वापरू शकता.
- घराबाहेर बेसावध राहणे जिवाशी खेळ कराणारे ठरेल व त्याला तुम्हीच जबाबदार असाल.
- या पाठशाळेत तुमचे मानसिक परिवर्तन होणे अपेक्षित आहे.
- अंतिम परीक्षा, निकाल व निरोप समारंभ यातलं काहीही असणार नाही.
- कोणालाही, कोणत्याही निकषावर कसलीही सवलत मिळणार नाही.
- शाळा सर्वांना बंधनकारक आहे.
- शाळा सुरू झाली आहे, पण शाळा संपल्याची घंटा होणार नाही.
सर्वांना शुभेच्छा देऊन टीचरने रजा घेतली.
मला शाळेतल्या पहिल्या दिवसाचे नाविन्य जसे वाटायला हवे तसे वाटले. दुसर्या दिवशी वाटले आपण बाहेर पडलो नाही, फिरायला गेलो नाही तर कसे होणार आपले? तिसर्या दिवशी वाटले किती दिवसात मित्र-परिचित-आप्त यांची भेट नाही. चौथ्या दिवशी वाटले स्वकीयांची फोनवर चौकशी करावी. पाचव्या दिवशी समजले की काही सामान आणावे लागेल. वीकएन्डला वाटले सिनेमागृहवाले, हॉटेलवाले, मॉलवाले आपली वाट बघत असतील. सातव्या दिवशी वाटले आपण दमलोच नाही तर आराम कशाला करायचा?
घरातल्या सर्व कामांची वाटणी एव्हाना झाली होती. प्रथमच समजले की अशीही काही कामे असतात. कंटाळा येऊन चालणार नव्हते. अपरिहार्यता आणि आवश्यकता मानून वावरण्याचे मनाला बजावले. हळुहळू सोपे झाले दैनंदिन जीवन. वर्गात काही आपण ‘ढ’ नाही हे पटले.
जिथे नियम नजरेखालून घालत पळवाटा शोधण्याची सवय असणारे रथी-महारथी थकले, तिथे बाकीच्यांचा काय पाड? आपल्याला ‘मानसिक बदल’ करता येतो हे पटले. आता पळवाटांची गरज संपली. फार ‘बिझी’ राहू लागलो आम्ही घरातले सर्वजण. कोणताही अभ्यासक्रम शिकवणार नाही असे शिक्षण मिळते आहे सध्या. त्याचा खूप फायदा करून घेतो आहे मी. याला हवं तर लूट म्हणा, गैरफायदा म्हणा. पण कोणालाही न दुखावता जर आपले हित होत असेल तर ते चांगले नाही का?
पूर्वीच्या काळाची आठवण झाली. एक शिक्षक अनेक वर्गांना शिकवीत असत. या शाळेत मुळात एकच शिक्षक आहे. जगातले हे विलक्षण ज्ञानपीठ आहे. इथे मी काय शिकलो याची चाचणी देणे बंधनकारक नाही. मी जर एक चांगला माणूस बनू शकलो व निसर्गाचा आदर केला तर शाळा सोडल्याचा दाखला मला नक्की मिळेल.
तुमच्या सारखा एक विद्यार्थी,
— रवि गांगल
Leave a Reply