भर उन्हामध्ये, ग्रीष्माच्या कडक ज्वालांमध्ये विशाखातील तीक्ष्ण जंजाळातील, दूर दूर दिसणाऱ्या भकासपणा मधील आणि एखाद्या प्रचंड वालुकालयामध्ये लक्ष लक्ष अंतरावर नुसतीच दिसणारी वालुका, निर्मनुष्य भयान आणि एकटेपणाची भीषण जाणीव करून देणाऱ्या एखाद्या कटुसत्यासारखे दृश्य एकंदर मुंबईच्या वीरान पडलेल्या रस्त्यांकडे, वस्तीकडे ,गल्ली मोहल्ल्यात, सोसायटिंकडे ,समुद्रकिनार्यावर, बागांमध्ये, मैदानांवर पहायला मिळत आहे.
या सर्वांच्या डोक्यावर पाय देऊन काळजाचा ठोका चुकवणाऱ्या ओसाड अशा लोकल रेल्वेच्या प्लॅटफॉर्मकडे.. स्थानकाकडे पाहिल्या वर कोणीतरी काळजावरच घाव करून ते छीन्नवीछीन्न करून टाकलंय असाच भास होतो. ते भयान निर्मनुष्य वीरान दृश्य पाहून तेथेच बसून खूप खूप रडावंसं वाटतं अगदी अश्रू आटेपर्यंत…
आजपर्यंत भयंकर संकट आली.. पण निश्चल असणाऱ्या मुंबईने आपली जीवन रेखा असणारी… ‘लाईफ लाईन’ नावाने परिचित असणारी ही रक्ताची शिर कधीच बंद झाल्याचे पाहिले नव्हते. अविरतपणे चालणारी, मृत्युशी झुंज देणारी, संकटाशी भिडणारी लाइफलाइन दहशतवादी हल्ला, महापुरात सुद्धा बंद झाली नव्हती… आणि आज कित्येकांची पोटं भरण्यासाठी त्यांना तारण्यासाठी निरंतर धावणारी ‘ती’आज शांत पहुडली आहे.
24 तास गजबजून असणारी मुंबई आज ओसाड पडली आहे. आलेल्या भयंकर नैसर्गिक आपत्तीचा सामना करताना अनेकांचे रोजगार आज बंद पडले. एक वेळच्या जेवणाची भ्रांत असणार्या आणि रोज कष्ट करून कुटुंबाची गुजराण करणाऱ्या मजुरांवर आज काय संकट ओढावले असेल हे आठवूणच डोळ्यांमध्ये पाणी तरळून जाते.
दिवस-रात्र रक्ताचा घाम सांडणार्या पोलीस, डॉक्टर्स ,नर्सेस, इतर सुरक्षारक्षक यांना देवांच्या बरोबरीत बसवावे लागेल. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीमध्ये अविरतपणे त्यांना आपलं कर्तव्य निभवाव लागत आहे. कित्येक लोक ट्रान्सपोर्ट बंद झाल्याने दूरदूरवर अडकून पडलेत.. त्यांच्या गुजराणिचा प्रश्न भीषण आहे. कित्येक विद्यार्थ्यांना अनेक खानावळी बंद झाल्यामुळे उपासमारीला सामोरं जावं लागत आहे. यापेक्षा कितीतरी बिकट अवस्था रस्त्यावर राहणारे, रस्त्यालाच आपले घर आणि जग मानणारे, कसेबसे जीवन जगू पाहणार्या लोकांची हृदयद्रावक अवस्था झाली असेल याचा फक्त आपण विचारच करू शकतो मात्र त्याची अनुभूती कधी घेऊ शकत नाही.
संपूर्ण मानव जातच हतबल झाली आहे. सर्व जनतेच्या आत्मिक विनंतीला … आवाहनाला मान देऊन परमेश्वराने कृपा करून ह्या संकटाला नामोहरण करावं हीच त्याच्या चरणी प्रार्थना.
अंत:करणातून…D.D.
— दयानंद धुरी
Leave a Reply