भारतात असताना, शाळा कॉलेजच्या लॅब्जमधे गाणी ऐकण्यासाठी रेडिओ, टेपरेकॉर्डर वगैरे गोष्टी स्वप्नात देखील येणं शक्य नव्हतं. पुढे NDDB च्या गुजराथमधील फार्मवर, गायींमधे भृणप्रत्यारोपण (Embryo Transfer) च्या लॅबमधे काम करताना आम्ही “साब” झालो होतो. त्यामुळे सायबासारखं वागणं भाग होतं. “साब” लोक बिहारपासून राजस्थानपर्यंत आणि पंजाबपासून केरळापर्यंत वेगवेगळ्या राज्यातले होते. त्यामुळे गाण्याची आवड निवड जुळणं अवघड होतं. नवरात्रीच्या दोन तीन आठवडे आधीपासून, फार्मच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर, चहाच्या टपरीवर, गरब्याची गाणी तारस्वरात ऐकू येऊ लागत, ती पार नवरात्र संपेपर्यंत चालू राहत. तेवढाच काय तो लॅबचा आणि संगीताचा ओढून ताणून संबंध.
कनेक्टिकटला UCONN (युनिव्हर्सिटी ऑफ कनेक्टिकट) च्या लॅबमधे आलो तो जणू बीजींग किंवा शांघायला गेल्यासारखं वाटायला लागलं. माझे Ph. D. चे गाईड डॉ. यॅंग हे स्वत: चायनीज. त्यांची चायनीज पत्नी आमच्याच डिपार्टमेंटमधे असोसिएट प्रोफेसर. डॉ. यॅंगच्या लॅबमधे M.S., Ph.D., Post Doc students मिळून १४-१५ जणांचा ग्रूप होता. त्यातले दहाजण चायनीज. त्यामुळे लॅबमधे First Language चायनीज आहे की काय असा प्रश्न पडायचा. त्यात भर म्हणून पार्श्वभूमीवर कायम चायनीज संगीत चाललेलं. एकही शब्द समजण्या़चा प्रश्नच नव्हता. नुसतं शांत, एकसुरी संगीत कानावर पडत रहायचं.
सहा महिन्यांनी, आयोवा राज्यातल्या Trans Ova Genetics ह्या कंपनीमधे माझ्या संशोधन प्रकल्पावर काम करायला येऊन दाखल झालो. येथे लॅबमधे सगळे गोरे अमेरिकन्स. काम भरपूर आणि कामाचा उरकही चांगला. इथेदेखील दिवसभर लॅब्ज, ऑफिस, कॅंटीन वगैरे सर्व ठिकाणी एखादं रेडिओ स्टेशन चालूच असायचं. ते बंद करायची पद्धतच नाही. त्यामुळे कधी संध्याकाळी, रात्री कामासाठी लॅबमधे, ऑफिसमधे जायचं असलं की दार उघडलं की अंधारात एकदम हे संगीतच कानावर पडून दचकायला व्हायचं. पुढे मग त्याची सवय झाली. एकूणच अमेरिकन लोकांना काम करताना शांततेचं वावडं असावं.
माझा आणि इंग्लिश संगीताचा संपर्क जुजबी म्हणण्याइतपत देखील नव्हता. लहानपणी दुपारी ११ ते ११॥ वाजता रेडिओवर मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम असायचा. आजी घरातली कामं करता करता रेडिओ ऐकायची. शाळेची तयारी करता करता गाणी कानावर पडत रहायची. पुढे रात्रीच्या वेळचे, “बिनाका गीतमाला”, “बेला के फूल”, हे कार्यक्रम, त्यातल्या जुन्या सुंदर गाण्यांमुळे आवडीचे झाले होते. गाण्यातली माझी आवड जुन्या वळणाची. मराठीतली जीवाची माणसं म्हणजे सुधीर फडके, लता मंगेशकर, आशा भोसले, अरूण दाते, माणिक वर्मा आणि सुमन कल्याणपुर. गजाननराव वाटवे, मालती पांडे आणि ज्योत्स्ना भोळेंचं नाव खूप ऐकून होतो, पण प्रत्यक्ष त्यांची गाणी फारशी ऐकायला मिळाली नाहीत. नाट्यसंगीतातलं कळत फारसं नाही पण ऐकायला मात्र आवडतं. जितेंद्र अभिषेकी, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, प्रभाकर कारेकर ही दिग्गज मंडळी आवडीची. हिंदीमधे १९५० -१९६० ची दशके म्हणजे संगीताचा सुवर्णकाळ. मुकेश, तलत मेहमुद, हेमंत कुमार, महमद रफी, मन्ना डे, किशोर कुमार, लता, आशा, गीता दत्त हे गायक, गायिका आणि शंकर जयकिशन, सचिन दा, नौशाद, सी. रामचंद्र, अनिल विश्वास, ओ.पी.नय्यर, सलील चौधरी, रोशन, खय्याम हे संगीतकार जीवाचे. त्यामुळे अमेरिकेला येताना मी मराठी आणि हिंदी जुन्या गाण्यांच्या कॅसेट्सचा मोठा खजिनाच बरोबर आणला होता. वेळ मिळेल तेंव्हा या चायनीज आणि अमेरिकन संगीताच्या तावडीतून सुटून एखादं मुकेश किंवा सुधीर फडक्यांचं गाणं ऐकलं की मन भूतकाळांत जायचं. या सार्या पार्श्वभूमीवर मी कंट्री म्युझिक कान देऊन ऐकायला लागीन आणि हळूहळू त्याची गोडी लागून मी त्याच्या प्रेमात पडेन असं कधीच वाटलं नव्हतं.
— डॉ. संजीव चौबळ
Leave a Reply