
आपल्याकडे संगीत म्हटलं की गीतकार, संगीतकार आणि गायक अशी त्रिमूर्ती असावी लागते. हिंदीमधे गीतकार शैलेंद्र किंवा हसरत जयपुरी, संगीतकार
शंकर जयकिशन आणि गायक मुकेश किंवा गीतकार शकील बदायुनी, संगीतकार नौशाद आणि गायक महमद रफी किंवा गीतकार राजा मेहेंदी अली
खां, संगीतकार मदन मोहन आणि गायिका लता मंगेशकर असे त्रिवेणी संगम असले की डोळे मिटावेत आणि शब्द आणि स्वरगंगेत बुडून जावं. क्वचित्
कधी सी.रामचंद्र, हेमंतकुमार किंवा सचिन दा आपल्याच आवाजात गायले तर तेवढ्यापुरतं संगीतकार आणि गायक एक होणार. अर्थात मराठीमधे गोष्ट
थोडी वेगळी आहे. ग.दी.मांनी लिहावं आणि बाबुजींनी (सुधीर फडके) चाल देऊन गावं हा अलिखित नियम !
पण कंट्री म्युझिकमधे सहसा गीतकार आणि गायक एकच असतो. त्यात बहुतेक सगळे (निदान पुरुष कलाकार) गिटार वाजवणारे. त्यामुळे पठ्ठ्या
स्वत:च गाणे लिहिणार, त्याला चाल लावणार आणि गिटार वाजवत स्वत:च गाणार. काही वेळां त्यांच्या जोड्या किंवा ग्रूप्स असतात. त्यामुळे दोघांनी
मिळून गाणी लिहायची, त्याला संगीत द्यायचं आणि गायचं असं चालतं. तीन चार जणांचा ग्रूप असला तर सहसा एक दोन जण गाणं लिहितात, एखादा
मुख्य गायक आणि बाकी साथ देणारे, आणि बहुतेक जण एखादं वेगवेगळं वाद्य वाजवणारे.
कंट्री म्युझिक आणि मराठी संगीताची तुलना करायची झाली तर काही साधर्म्य जाणवतं. कवितेचा ढंग, गाण्याची शैली, त्यातला आशय, त्याचे
चित्रांकन (Video) वगैरे सगळ्याचा विचार केला तर आपले वसंत बापट, शाहीर साबळे आणि दादा कोंडके यांच्या गाण्याचं आणि शैलीचं अजब
मिश्रण डोळ्यांसमोर तरळून जातं.
कंट्री म्युझिकमधे काही काही विषय ठळकपणे पुन: पुन्हा येतांना दिसतात. यातला महत्वाचा विषय म्हणजे “माझा गाव”. यात आपल्या कुठल्यातरी
कोपर्यातल्या छोट्याश्या गावाचं मोठं कौतुक केलेलं असतं. गदिमांच्या “खेड्यामधले घर कौलारू”ची आठवण यावी असं! मग आपल्या गावातली छोटी
शाळा, गावाबाहेरचा ओढा, गावाच्या वेशीवरची पाण्याची टाकी, गावातलं जुनं छोटं चर्च, झोपाळू रस्ते, पिढ्यान पिढ्यांचे शेजारी, कोपर्यावरचं तुटपुंज्या
वस्तू मिळणारं छोटसं किराणा दुकान, यांच्या आठवणी काढलेल्या असतात. त्यात आपण काऊबॉय किंवा काऊगर्ल आहोत हे मोठ्या अहमहमिकेने
सांगण्याची धडपड असते. “आम्ही आपले गावंढळ आहोत आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे” हे “गर्वसे कहो हम हिंदू है” या चालीवरचं पालूपद!
अमेरिकेत गावाकडच्या लोकांना ‘रेड नेक’ म्हणतात. (उन्हा तान्हात काम करणार्या लोकांच्या माना, उन्हात रापून तांबड्या लाल होतात. त्यामुळे शहरी
लोकांनी शेतकरी – गावंढळ लोकांना ठेवलेलं हे शेलकी विशेषण) त्यामुळे आपल्या ‘रेड नेक’ पणाचं कौतुक कंट्री म्युझिकमधे होणं हे ओघाने आलंच.
— डॉ. संजीव चौबळ
Leave a Reply