नवीन लेखन...

कोर्सेस

एक वर्षाचा प्री सी ट्रेनिंग कोर्स पूर्ण केल्यावर जोपर्यंत जहाजावर नोकरी करायची आहे तोपर्यंत जहाजावर आणि घरी असताना सुध्दा कोर्सेस करावे लागतील याची फारशी कल्पना नव्हती. प्री सी ट्रेनिंग पूर्ण करता करताच पाच बेसिक कोर्स आणि त्यांचे पाच सर्टिफिकेट मिळाले. मग आणखीन दोन कोर्सेस जे सुमारे सात ते आठ दिवसांचे होते. त्यानंतर ब्राझिल व्हिसा साठी पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट. एका मागून एक कोर्स आणि त्यांचे सर्टिफिकेट मिळवता मिळवता सुरवातीलाच नाकी नऊ आले होते.

जहाजावर जॉईन करायच्या पहिलेच पासपोर्ट सीडीसी सह आणखीन सात आठ कोर्सेस चे सर्टिफिकेट घ्यावे लागले. जहाजावर गेल्यावर जहाजावर काम करतोय याचे सी टाईम सर्टिफिकेट. कॉम्प्यूटर बेस्ड ट्रेनिंग म्हणजे सीबीटी हे पण कोर्सेस चाच एक प्रकार फक्त तो जहाजावर कॉम्प्यूटर वर बसून करायचा एवढाच फरक. जहाजावर ट्रेनी इंजिनियर म्हणून जाऊन आल्यानंतर परीक्षा देऊन फोर्थ इंजिनियर किंवा थर्ड मेट बनण्यासाठी आणखी काही कोर्स करायचे.
कंपनी स्वतः चे आणखी काही कोर्सेस ऑफिस मध्ये करवून घेते. त्यांना इन हाउस कोर्सेस म्हटले जाते. या इन हाउस कोर्सचे कंपनी कडून पैसे सुध्दा मिळतात. मुंबई ठाण्याबहेरील अधिकाऱ्यांना त्यांच्या रँक प्रमाणे चांगल्या दर्जाचे हॉटेल मध्ये जितके दिवस कोर्स असेल तितके दिवस राहायची सोय येण्याजाण्याच्या प्रवास खर्चासह केली जाते. कंपनीचा कोर्स त्याचे पैसे मिळून देखील कितीतरी अधिकारी या कोर्स साठी नाकं मुरडतात. आम्ही एवढी वर्ष नोकरी केली एवढा अनुभव आहे तरीपण सुट्टी मध्ये घरच्यांसोबत वेळ घालवायचा तर इथे कोर्सला येऊन काय उपटतोय अशी भावना असते. सकाळी साडे आठ नऊ वाजता सुरू होणारे कोर्स संध्याकाळी पाच साडेपाच वाजता संपतात. थंडगार ए सी मध्ये सेफ्टी, पोल्युशन प्रिवेंशन, ॲक्सीडेन्ट प्रिवेंशन, कंपनी पॉलिसी यावर इंग्लिश मध्ये ब्ला ब्ला ऐकुन झोपायला येते. दुपारी लंच ब्रेक नंतर अर्ध्याहून अधिक जण डुलक्या काढायला लागतात. ट्रेनिंग किंवा कोर्सचे प्रशिक्षण देणारे अधिकारी बोलायला लागले की सगळेजण घड्याळावर नजर ठेऊन असतात. कधी एकदा लंच ब्रेक, टी ब्रेक होईल सुट्टा ब्रेक होईल याची वाट बघत असतात. कोर्सच्या निमित्ताने एका जहाजावर काम केलेले अधिकारी जेव्हा भेटतात तेव्हा मग त्यांचे कौटुंबिक चौकशी किंवा विषय ना होता. अरे ह्या जहाजावर असं झाले आणि त्या जहाजावर हे प्रॉब्लेम आले आम्ही असे सॉल्व्ह केले आणि तसे सॉल्व्ह केले किंवा अमेरिकेत असा प्रॉब्लेम आला आणि रशियात आमच्या जहाजाला एवढा फाईन भरावा लागला. कोणी कोणी सांगतात मी अमुक एक गाडी घेतली किंवा मी एवढ्या लाखाचा का करोडोचा फ्लॅट घेतला. कंपनी कडून घेतल्या जाणाऱ्या इन हाउस कोर्स मध्ये पूर्ण दिवस आठ तास बसून राहावे लागते. सकाळी हजेरी लावून घरी पळून जाता येत नाही. पण प्रायव्हेट इन्स्टिट्यूट मध्ये सकाळी हजेरी लावून मुंबईतले असतील तर कोणी ज्यांचे लग्न झाले असेल तो घरी जातो कोणी ज्यांचे लग्न झाले नसेल आणि प्रेयसी असेल तर तिला भेटायला जातो तर कोणी दुसरी काम करून पुन्हा संध्याकाळी कोर्स संपायच्या आत परत येतो. प्रत्येक कोर्स झाल्यावर त्या त्या कोर्सचे सर्टिफिकेट मिळत असते. जेवढे कोर्स कराल तेव्हढे सर्टिफिकेट. काही कोर्स कम्पल्सरी तर काही एक्स्ट्रा क्वलिफिकेशन म्हणून करावेच लागतात. जहाजावर कितीही काम करा अनुभव मिळवा पण सरकारी नियम आणि कंपन्यांची सक्ती म्हणून हे कोर्स करावेच लागतात. जहाजावर जाण्यापूर्वी बेसिक कोर्सेस जहाजावर जाऊन आल्यावर ॲडव्हान्स्ड कोर्सेस आणि पाच वर्ष झाल्यावर रिफ्रेशर कोर्सेस. तस पाहिलं तर ज्याला जहाजावर किंवा शिपिंग इंडस्ट्री मध्ये नोकरी करायची आहे त्याला स्वतःला नवीन कायदे किंवा आधुनिक मशिनरी आणि इंजिन यांच्याशी जुळवून घेण्याकरिता अपडेटेड रहावेच लागते. पण जेव्हा सरकार किंवा कंपनी कडून अशी सक्ती केली जाते तेव्हा मात्र सुट्टीवर असताना ही काय पिडा मागे लावलीय, सालं जहाजावर असताना पण कंपनीचा आणि जहाजाचा विचार करायचा आणि घरी सुट्टीवर आल्यावर सुध्दा जहाज आणि कंपनीसाठी कौटुंबिक जीवन सोडून धडे गिरवत बसायचे. दोन ते तीन महिन्याच्या सुट्टीमध्ये पुन्हा एकदा घरदार सोडून रटाळ लेक्चर आणि क्लास अटेंड करायचे. पूर्वी काही इन्स्टिट्यूट मध्ये पैसे भरले की एकही दिवस लेक्चर किंवा क्लास अटेंड न करता सर्टिफिकेट दिले जायचे. काही इन्स्टिट्यूट पद्धतशीरपणे अभ्यासक्रम शिकवल्या शिवाय तसेच प्रत्येकाने पूर्ण कोर्स अटेंड केल्याशिवाय सर्टिफिकेट देत नसत. पण सगळे खलाशी आणि अधिकारी जिथे कोर्स अटेंड न करता सर्टिफिकेट मिळेल अशाच ठिकाणी कोर्स करत असत. पण मागील काही वर्षांपासून सगळ्याच इन्स्टिट्यूट मध्ये कोर्स पूर्णपणे अटेंड केल्याशिवाय सर्टिफिकेट देत नाहीत. सीसीटीव्ही कॅमेरे असलेले क्लास रूम आणि बायोमेट्रिक थंब ने हजेरी सक्तीची केल्याने हल्ली प्रत्येकाला झक मारून कोर्स अटेंड करावा लागतोय. सरकार आणि इन्स्टिट्यूट वर ही वेळ आली कारण बऱ्याच घटना पण तशाच घडल्या जसे की एखादा खलाशी खुना सारख्या गंभीर आरोपात अटक होतो पण त्याचवेळी तो एखाद्या इन्स्टिट्यूट मध्ये हजर असल्याचे सर्टिफिकेट दाखवतो. काहीजण अपघातात जखमी होऊन हॉस्पीटल मध्ये दाखल होतात आणि त्याच वेळेला त्यांच्याकडे कोर्स पूर्ण केल्याचे सर्टिफिकेट येते. काहीजण परदेशात आणि जहाजावर असताना देखील कोर्स केल्याचे सर्टिफिकेट दाखवतात. हे आणि असे अनेक फ्रॉड हे निव्वळ रटाळ कोर्सेस आणि सुट्टीतील वेळ टाळण्यासाठीच केले जात असत. परंतु या व अशा अनेक केसेस झाल्यानंतर आणि मोदी सरकार आल्यापासून हे गैरप्रकार हळू हळू करता करता पूर्णपणे बंद झाले. शिपिंग इंडस्ट्रीवर नियंत्रण ठेवणारी सरकारी यंत्रणा सक्षम तसेच कार्यक्षम झाल्याचे वेळोवेळी दिसते आहे. जहाजावरील नोकरी करण्याकरिता व स्वतःला अपडेट आणि अपग्रेड ठेवण्याकरिता , त्याहीपेक्षा कागदोपत्री दाखवण्या करिता प्रत्येक जण रडत रडत का होईना कोर्सेस करून एक एक नवीन नवीन सर्टिफिकेट आपापल्या फाईल मध्ये वाढवत असतो. कंपनी आणि सरकारला आपले भारतीय अधिकारी सक्षम आणि क्वालिफाईड पाहिजेत जेणेकरून भारतीय खलाशी आणि अधिकारी हे जगातील सर्वोत्तम दर्यावर्दी म्हणून ओळखले जावेत. जहाजावर असताना जहाजाला नियोजित बंदरात नेण्यासाठी योग्य दिशेने नेण्यासाठी चार्ट पेपर वर म्हणजेच नकाशावर मार्गाची आखणी केली जाते त्याला कोर्स म्हणतात. जहाज एका बंदरातून दुसऱ्या बंदरात पोहचेपर्यंत प्रत्येक अधिकाऱ्याला नियोजित कोर्स मेन्टेन करावा लागतो आणि जहाजावरुन घरी आल्यावर प्रत्येकाला नोकरी करण्यायोग्य मेन्टेन राहण्यासाठी कोर्स करावे लागतात.

© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर
कोन, भिवंडी, ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 186 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..