
क्रेडिट कार्डचे एक बिल भरले नाही की खर्या अर्थाने कळते मानसिक त्रास म्हणजे नक्की काय असतो ते. क्रेडिट कार्ड वापरणे हा असा शौक आहे जो फक्त अती श्रीमंत लोकांनाच परवडू शकतो. मध्यमवर्गीयांनी हा शौक न पाळलेलाच बरा ! आयुष्यात एखाद्या माणसाला कधीही न झालेला मनस्ताप अवघ्या दोन – चार दिवसात देण्याची ताकद या क्रेडिट कार्डमध्ये असते. मी न मागताही मला गरज नसतानाही बॅंकेच्या प्रतिनिधींनी म्हणजे खास करुन गोड आवाजाच्या स्त्रियांनी गोड बोलून क्रेडिटकार्ड माझ्या माथी मारले. माझा मूल्यांक 1 असल्यामुळे मला नेहमीच लोकांना प्रसंगी सोडूनही द्यायची सवय होती. पण कोणाकडे काहीही मागणे मात्र मला जिवावर येते अगदी स्वत:च्या हक्काच्या गोष्टीही ! ज्याचा फायदा अनेकांनी कालही घेतला आजही घेत आहेत.
माझे लोकांकडे उसणे दिलेले हजारो रुपये येणे बाकी आहेत पण मला कोणाकडे एक रुपयाही उसना मागायला जिवावर येतो. अगदी घरच्या रक्ताच्या नात्यातील माणसांकडेही पैसे मागायला जिवावर येतात. मी उसने मागितले तर मला लाख रुपयेही देणारे आहेत. पण ते मागावे लागू नये म्हणूनच त्या गोड स्त्रियांच्या गोड बोलण्याला भुलून मी क्रेडिट कार्ड घेतले. ते क्रेडिट कार्ड घेण्यापूर्वी माझ्यावर एक रुपयाही कर्ज नव्हते. ते कार्ड घेतले आणि मी कर्ज बाजारी झालो. त्या क्रेडिट कार्डच्या पैशातून मी माझ्यासाठी साधा रुमालही विकत घेतला नाही. त्या क्रेडिटकार्डने मी फक्त लाईट, मोबाईल आणि गॅसची बिले भरली. एक दोनदा माझ्या उद्योगात गुंतवणुक म्हणून काही पैसे वापरले असतील इतकेच ! माझ्या त्याच उद्योगातून मला अपेक्षित नफा न झाल्यामुळेच माझ्या क्रेडिटकार्डचे बिल वाढत गेले आणि ते क्रेडिट कार्ड माझ्या अवघड जागेचे दुखणे झाले.
प्रत्येक महिन्याला या महिन्यात क्रेडिटकार्डचे बिल कसे भरायचे या विचारात माझे चार- पाच दिवस वाया जातात. मागचे दोन वर्षे मी क्रेडिटकार्डचे बिल सातत्याने वेळेत भरत होतो पण शेवटी ती वेळ आलीच जेंव्हा मला केडिट कार्डचे एक बिल वेळेत नाही भरता आले. मला वाटले होते दोन महिन्याचे बिल एकदम पाठवतील मी ते भरेन जशी इतर बिले भरतो. पण ! कसेल काय ? बिल भरण्याची अंतिम तारीख उलटून गेल्यावर लेट फी ती तर लावतातच तिही कमी नाही हजार रुपयाच्या आसपास ! मला वाटले होते हजार रुपये लेट फी घेतात म्हणजे पैसे भरायला निदान आपल्याला पंदरा दिवस तरी देत असतील ? पण कसले काय ? चवथ्या दिवशी बॅंक प्रतिनिधींनी पैसे भरण्यासाठी फोन करुन तगादा लावला. माझे एकच बिल भरायचे बाकी असतानाही ! मी त्यांना म्हणालो दोन चार दिवसांनी माझे पैसे येणार आहेत मी बिल भरतो ! तर ते महाभाग प्रतिनिधी आम्ही पैसे घ्यायला माणूस तुमच्या घरी पाठवतो म्हणाले, मी मनात म्हणालो,’’ मुर्खांनो तुमच्या माणसाला द्यायला माझ्याकडे पैसे असते तर ते मीच नसते का भरले. त्यानंतर माझ्या बॅंक खात्यात जितके पैसे होते ते क्रेडिट कार्डचे बिल म्हणून मला सुचित न करता काढून घेतले… ही समोरच्याची गैरसोय करण्याची आणखी एक चुकीची पद्धत ! त्यानंतर जितके म्हणून पैसे माझ्या खात्यात जमा होत होते ते क्रेडिट कार्डचे बिल म्हणून काढून घेत होते. असे करून करून तीन – चार दिवसात माझ्या क्रेडिट कार्डचे त्या महिन्याच्या बिलाचे सर्व पैसे परस्पर काढून घेतल्यानंतरही त्यांचे प्रतिनिधी फोन करून विचारतात की बिल भरले का ? याचा अर्थ कोणाला कोणाचा मेल नाही. एक बिल जरा चुकले की लेट फीच्या नावाखाली त्याच्याकडून हजार रुपये उकळायचे आणि तो बिल भरेपर्यत त्याला सारखे फोन करून करून मानसिक त्रास द्यायचा ! त्यावर कहर म्हणजे पैसे वसूल करायला आमचा प्रतिनिधी घरी येईल अशी धमकी द्यायची ! ज्या धमकीला सामान्य मध्यमवर्गीय माणूस नेहमीच घाबरतो. ज्यांनी लाखो रुपये बुडवले आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे आणि सामान्य मध्यमवर्गीय माणसांचे एक बिल चुकले तरी त्यांच्या मागे हात धुवून लागायचे !
क्रेडिटकार्ड हा मध्यमवर्गीय माणसासाठी सोय नाही तर त्याला अडकविण्यासाठी तयार केलेला एक आर्थिक साफळा आहे. या साफळ्यात एखादा मध्यमवर्गीय माणूस अडकला की त्याला बाहेर पडणे अवघड होते. क्रेडिट कार्ड त्याच मध्यमवर्गीय माणसाने वापरायला हवे ज्याच्याकडे उत्पन्नाचे कायमस्वरुपी स्त्रोत आहे. आता माझे काम असे आहे एका महिन्यात पैसे येतात एखाद्या महिन्यात नाही येत. कधी- कधी दोन – तीन महिन्याचे पैसे एकत्र येतात. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरणार्यांनी काही रक्कम आपल्याकडे अगोदरच वेगळी जमा ठेवायला हवी ! तरच त्यांना होणारा मानसिक त्रास टाळता येईल. समाजात जे मानसिक रुग्णांचे प्रमाण वाढत आहे त्याला काही अंशी हे क्रेडिटकार्डही जबाबदार असावेत का ? अशी शंकाही माझ्या मनात निर्माण होते. क्रेडिटकार्ड घेऊन मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा गाढवपणा केला असे मला व्यक्तीश: वाटते. त्या गाढवपणाची शिक्षा मला बहुतेक पुढचे काही महिने भोगावी लागणार आहे. क्रेडिट कार्ड वापरणे हे माझ्यासारख्या गाढवाला झेपणारे नाही हे माझ्या वेळीच लक्षात यायला हवे होते. त्यासाठी माणूस अत्यंत बुद्धीमान, पैसे फावड्याने ओढणारा, कणखर मनाचा, निडर आणि राजकारणी बुद्धीचा असायला हवा !
लेखक :- निलेश दत्ताराम बामणे ( एन.डी.)
Leave a Reply