२२ जानेवारी १९८७ : बेन्सन अँड हेजेस विश्वमालिकेतील चौथा सामना. स्थळ सिडनी क्रिकेट ग्राऊंड, ऑस्ट्रेलिया.
ऑस्ट्रेलिया : नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांमध्ये ८ बाद २३३ धावा. डर्क वेलहॅम ९७, जेफ मार्श ४७.
इंग्लंड ४९ षटकांनंतर ७ बाद २१६. शेवटच्या सहा चेंडूंमध्ये इंग्लंडला जिकण्यासाठी १८ धावांची आवश्यकता होती. टोल्या होता अॅलन लँब (कालच्या फ्लॅशमध्ये हा होता.) तोवर या सामन्यात त्याने ९७ चेंडूंचा सामना करीत ५९ धावा काढल्या होत्या, केवळ एका चौकारासह. बिनटोल्या होता फिल डिफ्रेटस ६ चेंडूंमध्ये सहा धावा त्याने काढलेल्या होत्या.
गोलंदाज होता ब्रूस रीड. आपल्या नऊ षटकांमध्ये आतापर्यंत त्या डावात अवघ्या २६ धावा दिलेल्या होत्या. म्हणजे त्याच्याकडून या षटकात तीनहून अधिक धावा दिल्या जाणे अपेक्षित नव्हते आणि मारगती पाहत लँबकडून चारहून अधिक धावा होणे अपेक्षित नव्हते पण….
लँबने पहिल्याच चेंडूवर दोन धावा घेतल्या आणि दुसर्या चेंडूवर चक्क स्क्वेअर लेगला चौकार मारला ! आता चार चेंडूंमध्ये १२ धावा असे ‘असमीकरण’ आले. तिसरा चेंडू डीप मिडविकेट क्षेत्राची हवाई सफर करून गेला… षटकार ! ६ चेंडू १८ धावांचे आव्हान आता ३ चेंडू सहा धावा असे झाले.
चौथ्या चेंडूवर लँबने दुहेरी धाव घेतली आणि मग पुन्हा स्क्वेअर लेगला चौकार मारत त्याने सामना संपविला ! इंग्लंड एक चेंडू राखून विजयी.
दोसौ उनसठ दिन बाद
विश्वचषक १९८८. इंग्लंड वि. वेस्ट इंडीज. स्थळ : म्युनिसिपल स्टेडिअम, गुजरांवाला, पाकिस्तान.
विंडीज : निर्धारित ५० षटकांमध्ये ७ बाद २४३.
सत्ताविसाव्या षटकात तो फलंदाजीसाठी उतरला तेव्हा इंग्लंडच्या ३ बाद ९८ धावा झालेल्या होत्या. शेवटच्या तीन षटकांमध्ये इंग्लंडला विजयासाठी ३५ धावा हव्या होत्या. कोर्टनी वॉल्शने १६ धावा दिल्या, त्यातील १५ त्याने काढल्या होत्या. पॅट्रिक पॅटरसनने पुढचे
षटक टाकले, त्यात फक्त सहाच धावा निघू शकल्या. आता अखेरच्या षटकात १३ धावांची आवश्यकता.
अगदी सिडनीप्रमाणे पहिल्या चेंडूवर दोन आणि दुसर्या चेंडूवर ४ धावा त्याने काढल्या. वॉल्शचा तिसरा चेंडू फलंदाजाने खेळणे तर सोडाच, यष्टीरक्षक जेफ दुजाँलाही अडविता आला नाही. चार वाईड धावा इंग्लंडला मिळाल्या. पुढचा चेंडू नोबॉल ठरला आणि त्यावर त्याने एक धावही काढली : दोन अवांतर धावा इंग्लंडला मिळाल्या. (नोबॉलवर फलंदाजाने काढलेल्या धावा फलंदाजाच्या खात्यात जात नाहीत, त्या नोबॉल म्हणूनच अवांतर धावांमध्ये गणल्या जातात. अगदी अलीकडचे उदाहरण म्हणजे सेहवागला रणदीवने टाकलेला नो-बॉल !) नील फॉस्टरने पुढच्या चेंडूवर चौकार मारला. इंग्लंड आता दोन चेंडू राखून विजयी.
यावेळीही तो फलंदाज होता अॅलन लँब !
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply