नवीन लेखन...

जानेवारी २४ : पदार्पणात सचिनला दोनदा बाद करणारा नील जॉन्सन

Cricket Flashback - 24 January 1970 - Neil Johnson of Zimbabwe who bowled Sachin in both innings was born

२४ जानेवारी १९७० रोजी नील क्लार्क्सन जॉन्सनचा सॅलिस्बरीत (आताचे हरारे) जन्म झाला. झिम्बाब्वेतर्फे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्याने प्रसिद्धी मिळवली. डावखुरा फलंदाज आणि उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज अशी नीलची क्रिकेटच्या मैदानावरील ओळख आहे.

प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये तो मधल्या फळीत आक्रमक फलंदाजी करी. १६१ प्रथमश्रेणी सामन्यांमधून त्याने काढलेल्या ७५६९ धावा आणि घेतलेले २३० बळी त्याला अष्टपैलू म्हणण्यास पुरेसे आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये तो सलामीवीर म्हणून खेळत असे.

१९९९ चा विश्वचषक हा नील जॉन्सनच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम काळ ठरला. या विश्वचषकात झिम्बाब्वेने सुपर सिक्स साखळीत मजल मारली होती. केनियाविरुद्धच्या सामन्यात सलामीला येऊन ५९ धावा करीत त्याने संघाला विजय मिळवून दिला आणि सामनावीर पुरस्कार पटकावला.

याच विश्वचषकात झिम्बाब्वेने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खळबळजनक विजय नोंदविला होता. या सामन्यात झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना २३३ धावा केल्या होत्या. त्यात जॉन्सनचा वाटा ७६ धावांचा होता. दक्षिण आफ्रिकेच्या डावातील पहिल्याच चेंडूवर त्याने गॅरी कर्स्टनला बाद करून येणार्‍या खळबळीची सूचना दिलेली होती. डावात पुढे त्याने जॅक कॅलिसलाही शून्यावर परतविले होते आणि अखेर कडी म्हणजे हॅन्सी क्रोनिएला अवघ्या चार धावांवर त्रिफळाबाद केले होते. हीथ स्ट्रीक आणि अँड्‌र्‍यू विटलची साथ त्याला लाभली आणि १८५ धावांवर प्रोटियांचा डाव संपला. सामनावीर अर्थातच जॉन्सन ठरला.

लॉर्ड्सवरच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात ३०४ धावांच्या लक्ष्यासमोर नीलने पूर्ण पन्नास षटके मैदानावर काढत १४४ चेंडूंमध्ये १४ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद १३२ धावा काढल्या. झिम्बाब्वेने हा सामना ४४ धावांनी गमावला असला तरी जॉन्सन सामनावीर ठरला. विश्वचषकाच्या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी दोहोंमध्ये सलामीला उतरणारा खेळाडू म्हणून नील जॉन्सन द्खलपात्र ठरतो.

जॉन्सनचा सर्वात मोठा पराक्रम ठरतो तो मात्र वेगळाच. ७ ऑक्टोबर १९९८ रोजी जॉन्सनने कसोटीचे मापटे ओलांडले. भारताविरुद्ध हरारे स्पोर्ट्स क्लबवर खेळून.

पहिल्या डावात त्याला एकच बळी मिळाला : सचिन तेंडुलकर (झेल अ‍ॅलिस्टर कॅम्पबेल). दुसर्‍या डावात त्याला तीन बळी मिळाले. त्यात पुन्हा सचिन होता (आता झेल अ‍ॅंडी फ्लॉवर). पदार्पणाच्या कसोटीत दोनदा सचिन तेंडुलकरचा बळी !
सन २००० मध्ये वेतनाच्या प्रश्नावरून झिम्बाब्वे मंडळाशी त्याचे वाजले आणि त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला.

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..