जुळा भाऊ स्टीवपेक्षा चार मिनिटांनी लहान असल्याने ‘ज्युनिअर’ म्हणून ओळखल्या जाणार्या मार्क वॉचे कसोटीपदार्पण झाले २५ जानेवारी १९९१ रोजी इंग्लंडविरुद्ध अॅडलेडवर. संघात निवड झाल्याची बातमी ज्युनिअरला स्टीव वॉनेच दिली. गंमत म्हणजे मार्क वॉची संघात निवड स्टीव वॉची कामगिरी अपेक्षेनुरूप होत नसल्याने झाली होती. २६ डिसेंबर १९८५ रोजी म्हणजे जवळपास सहा वर्षांपूर्वी स्टीफन रॉजर वॉने भारताविरुद्ध खेळून कसोटीपदार्पण केले होते. ज्युनिअरचे एकदिवसीय पदार्पण १९८८ मध्येच झाले होते.
उजव्या हाताने खेळणारा प्रतिभावंत आणि अधुनमधून संघासाठी उपयुक्त ऑफस्पिन टाकू शकणारा मध्यमगती गोलंदाज आणि त्याहीपलीकडे स्लिपमधील अतिचलाख क्षेत्ररक्षक अशी मार्क वॉची ख्याती होती. कालपरवा राहुल द्रविडकडून मोडला जाईपर्यंत यष्टीरक्षक वगळता इतरांनी कसोट्यांमध्ये घेतलेल्या झेलांमध्ये मार्क वॉचा क्रमांक पहिला लागत होता.
अष्टपैलू खेळाडू म्हणून एदिसांमधून मार्क वॉने पदार्पण केले. नंतर मात्र त्याने फलंदाजीवर लक्ष केंद्रित केले आणि सलामीची अर्धी जबाबदारी तो सांभाळू लागला. १९९६ च्या विश्वचषकात मार्कने तीन शतके लगावली आणि एकाच विश्वचषकात शतकांची तिकडी उभारणारा तो पहिला खेळाडू बनला. १९९९ च्या विश्वचषकातही त्याने एक शतक लगावले आणि विश्वचषकात चार शतके काढणारा आणि हजाराहून अधिक धावा काढणारा पहिला ऑस्ट्रेलियाई खेळाडू तो बनला. याच विश्वचषकादरम्यान तो एदिसांमध्ये ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा काढणारा आणि सर्वाधिक शतके लगावणारा खेळाडू बनला.
ज्युनिअरच्या पदार्पणाच्या मालिकेत त्याचा दादा स्टीव अडखळत होता. तीन कसोट्यांमधून २०.५० च्या पारंपरिक सरासरीने अवघ्या ८० धावा त्याला कमविता आल्या होत्या.
२५ जानेवारीला, आपल्या पहिल्याच कसोटी डावात मार्कने ११६ धावा काढल्या. पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावणारा तो पंधरावा ऑस्ट्रेलियाई खेळाडू ठरला. दुसर्या दिवशी त्यात २२ धावांची भर घालून तो बाद झाला. दुसर्या डावात तो तेवीसच धावा काढू शकला. पदार्पणातील शतकानंतर अनेकांनी त्याच्यावर स्तुतीवचने उधळली. ऑस्ट्रेलियाचे
तत्कालीन प्रशिक्षक बॉब सिम्प्सन यांना त्याचा खेळ आर्ची जॅक्सनसारखा वाटला तर मार्क टेलरला तो लेग-साईडचा सर्वोत्तम खेळाडू वाटला. मार्कच्या १३८ धावा १८८ चेंडूंमधून आल्या होत्या आणि यातीलही बर्याचशा धावा त्याला लेग-फ्लिक्समधून मिळालेल्या होत्या. ही कसोटी अनिर्णित राहिली.
मालिकेतील पाचव्या आणि अखेरच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. त्या कसोटीत मार्कला एकच डाव मिळाला. त्यात त्याने २६ धावा काढल्या. कॅरिबिअन दौर्याचे तिकिट मिळवून देण्यास त्याला पदार्पणातील शतक उपयोगी ठरले.
जुळा भाऊ स्टीवपेक्षा चार मिनिटांनी लहान असल्याने ‘ज्युनिअर’ म्हणून ओळखल्या जाणार्या मार्क वॉचे कसोटीपदार्पण झाले २५ जानेवारी १९९१ रोजी इंग्लंडविरुद्ध अॅडलेडवर. संघात निवड झाल्याची बातमी ज्युनिअरला स्टीव वॉनेच दिली. गंमत म्हणजे मार्क वॉची संघात निवड स्टीव वॉची कामगिरी अपेक्षेनुरूप होत नसल्याने झाली होती.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply