अजित लक्ष्मण वाडेकर यांचा जन्म १ एप्रिल १९४१ रोजी मुबंईत झाला. मध्यमवर्गीय कुटूंबात असते तसे वातावरण त्यांच्या घरचे वातावरण होते. दादरला शिवाजी पार्कजवळ ते रहात असत. अजित वाडेकर यांचा स्वभाव लहानपणी थोडा अबोल आणि गंभीर होता. ते सदोदित वाचनात गर्क असायचे . जेम्स हॅडली चेस त्यांचा आवडता लेखक होता . त्यांना क्रिकेटमध्ये फारशी गोडी नव्हती . त्यांचे गणित चांगले होते , त्यांना इंजिनीअरिंगला जायचे होते. एस. एस. सी . ची परिक्षा ते उत्तमपणे ७९ टक्क्यांनी पास झाले होते. उत्तम गुण कां म्हणतो मी , कारण त्यावेळी गुणांची खिरापत वाटत नव्हते. त्यांचे शिक्षण दादरच्या बॉईज हायस्कूलमध्ये झाले. एस. एस. सी . नंतर त्यांनी एल्फीस्टन महाविद्यालयात शास्त्र विभागात प्रवेश घेतला , आणि इथेच अजित वाडेकर यांच्या क्रिकेट कारकीर्दीचा प्रारंभ अचानक झाला. एक आंतर महाविद्यालयीन सामना होता त्यावेळी एक खेळाडू कमी पडला अजित वाडेकर त्यावेळी पहिल्या वर्गात शिकत होते. त्यांना खेळायचा आग्रह केला आणि ते तो सामना खेळले परंतु खेळण्यापेक्षा जो काही अडीच-तीन रुपयाचा अलाउन्सवर त्यांचा डोळा होता. त्यावेळी अडीच ते तीन रुपये उपहारासाठी देण्यात येत .
दुसऱ्या वर्षी अजित वाडेकर यांनी कॉलेज बदलले आणि घराजवळ असलेल्या रुईया कॉलेजमध्ये जाऊ लागले , पुढे त्यांची कॉलेजच्या संघात आणि विद्यापीठाच्या संघात निवड झाली. विशेष महत्वाची सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांनी पहिल्याच आंतर विद्यापीठ सामन्यात दिल्ली विद्यापीठाविरुद्ध ३२३ धावा केल्या. हा त्यांचा विक्रमच होता पुढें हा विक्रम १९७० साली सुनिल गावस्कर यांनी मोडला. हा विक्रम केला त्याच वर्षी अजित वाडेकर यांनी शिवाजी पार्क जिमखान्यात आपले नाव नोंदवले आणि ते रणजी ट्रॉफी सामन्यात ते मुबई संघाकडून मद्रास संघाविरुद्ध खेळले .त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेट खेळायला १९५८-५९ साली सुरवात केली. त्यांची कसोटी सामन्यासाठी निवड होत नव्हती. माधव मंत्री आणि निवड समितीने त्यांना संधी द्यायचे ठरवले तेव्हा अजित वाडेकर यांनी त्या संधीचा भरपूर फायदा घेतला. पतौडीच्या जागी ते कप्तान झाले कारण अनेक वर्षे ते मुबईकडून कप्तानी करत होते. त्यावेळी भारतीय संघात सुनील गावस्कर , गुंडाप्पा विश्वनाथ , फारूख इंजिनीअर , सलीम दुराणी आणि जोडीला गोलनंदाजीतले ‘ त्रिदेव ‘ म्हणजे बिशनसिंग बेदी , प्रसन्ना आणि भागवत चंद्रशेखर हे होते आणि जोडीला वेंकट राघवन हें होते. १९७१-७२ चे वेस्ट इंडीज आणि इंग्लंड विरुद्ध आपण सिरीज पहिल्यांदा जिंकली. त्याचे शिल्पकार अजित वाडेकर आणि संपूर्ण संघ होता.
अजित वाडेकर खऱ्या अर्थाने पहिले ‘ कॅप्टन कूल ‘ म्हणावे लागतील आपण आता धोनीला कॅप्टन कूल म्हणतो ते खरे नाही . पाहिले कॅप्टन कूल अजित वाडेकरच . अत्यंत अभ्यासू वृत्ती आणि अचूक निर्णयक्षमता त्यांनी दाखवली ती वेस्ट इंडिजच्या पहिल्या सामन्यात. पावसामुळे पहिला दिवस फुकट गेला होता . त्या दिवशी एकही चेंडू टाकला गेला नाही. सामना चार दिवसाचा झाला होता. भारतीय संघाने १५८.४ षटकात ३८७ धावा केल्या आणि वेस्ट इंडिजने ९३.५ षटकात २१७ धावा केल्या . म्हणजे १७० धावांचा लीड होता. तेव्हा अजित वाडेकर यांच्या लक्षात आले की सामना जर पाच दिवसाचा असेल तर फॉलोऑन साठी २०० धावा कमी लागतात . इथे तर १७० धावा होत्या परंतु चार दिवसाच्या सामन्यात नियमाप्रमाणे १५० धावा कमी असल्या तर फॉलोऑन देता येतो . हे त्यांच्या लक्षात आले . सर गॅरी सोबर्सला ‘ फॉलोऑन ‘ सांगण्यासाठी अजित वाडेकरांनी सुनील गावसकरांना सांगितले . सुनील गावसकर सांगतात मी त्यांच्या ड्रेसिंग रूममधला दरवाजा नॉक केला , आतमध्ये हसण्याचे आवाज येत होते जरा वेळाने दार उघडले आणि सुनील गावस्करानी सोबर्सला सांगितले तुम्हाला फॉलोऑन दिलेला आहे , कुणालाही हा नियम माहीत नव्हता . सगळीकडे शांतता पसरली. सुनील गावस्कर म्हणाले मी तांबडतोब निरोप देऊन तिथून सटकलो. त्यावेळी ‘ हे गॅरी , यू हॅव टू फॉलोऑन ‘ हे वाक्य फेमस झाले होते. तो सामना अनिर्णयीत सुटला . पुढला दुसरा सामना ओव्हलवर होता इथे मात्र वेस्ट इंडिजचा संघ सावधपणे खेळू लागला आणि इथेच घोळ झाला . वेस्ट इंडिजचा संघ २१४ धावात कोसळला. पुढील तीनही सामने अनिर्णयीत झाले आणि भारताने १-० ने ती मालिका जिंकली. इंग्लंडच्या विजयाबद्दल तर सर्वाना माहीत आहे तो ऐतिहासिक विजय ठरला . भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने . परंतु १९७४ साली सपाटून मार खावा लागला. शेवटी क्रिकेट हा ‘ वर्तमानकाळातील ‘ खेळ आहे . पुढे काय होईल हे सांगता येणार नाही. तिथे सगळ्या फॅक्टस , निर्णय स्वीकारावे लागतात. अजित वाडेकर यांनी ३७ कसोटी सामन्यात २,११३ धावा केल्या त्यात त्यांचे एक शतक आणि १४ अर्धशतके होती , तर त्यांचे सर्वोच धावसंख्या हॊती १४३ . तर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये २३७ सामन्यात १५, ३८० धावा केल्या त्यात ३६ शतके आणि ८४ अर्धशतके होती, त्यात त्यांचे सर्वीच धावसंख्या होती ३२३ . त्यांनी कसोटी सामन्यात ४६ झेल पडले तर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये २७१ झेल पकडले . अजित वाडेकर अत्यंत चपळतेने क्षेत्ररक्षण करत . त्यांनी असे काही अप्रतिम झेल पकडले आहेत की त्यावेळी सामना भारताच्या बाजूला झुकला आहे. त्यांनी फक्त २ एकदिवसीय सामने खेळलेले आहेत . त्यात त्यांची सर्वीच धावसंख्या होती नाबाद ६७. अजित वाडेकर १९९० साली भारतीय संघाचे मॅनेजर होते. त्याचप्रमाणे ते मुंबईमधील बँकेत मोठ्या हुद्यावर काम करत होते. ‘
अजित वाडेकर यांना भारत सरकारने ‘ अर्जुन अवॉर्ड ‘ आणि ‘ पदमश्री देऊन त्यांचा सन्मान केला आहे. त्याचप्रमणे सी. के. नायडू लाइफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड देऊन त्यांचा सन्मान केला .
15 ऑगस्ट 2018 रोजी त्यांचे निधन झाले.
सतीश चाफेकर
Leave a Reply