अल्फ व्हेलेंटाईन यांचा जन्म २८ एप्रिल १९३० रोजी किंग्जस्टन जमेका येथे झाला. त्यानी पहिला कसोटी सामना खेळला तो ८ जून १९५० रोजी. त्यावेळी वेस्ट इंडिजचा संघ इंग्लंडच्या टूरवर होता. त्यावेळी वेस्ट इंडिजच्या संघामध्ये वॉलकॉट , एव्हर्टन विक्स आणि फ्रॅंक वॉरेल या सारखे जबरदस्त फलंदाज होते परंतु त्यांच्याकडे गोलंदाजांची त्यावेळी कमतरता होती. त्यावेळी त्यांच्या संघामध्ये दोन तरुण स्पिनर्स घेण्यात आले एक होता सोनी रामाधीन आणि दुसरा अल्फ व्हेलेंटाईन . दोघांनीही फक्त दोन – दोन फर्स्ट क्लास सामने खेळलेले होते. अत्यंत कमी अनुभव त्यांच्याकडे होता परंतु त्यांची निवड कसोटी सामन्यासाठी झाली होती. खरे तर अल्फ व्हेलेंटाईन याची निवड कशी झाली याचे सर्वाना आस्चर्य वाटले होते कारण त्याने दोन सामन्यामध्ये दोनच विकेट्स काढलेल्या होत्या त्यासुद्धा ९५ च्या सरासरीने. परंतु त्यावेळचा वेस्ट इंडिजचा कप्तान जॉन गोगार्ड याला मात्र अल्फ व्हेलेंटाईन याला टीममध्ये घ्यावेसे वाटले. सुरवातीच्या काही सामन्यामध्ये अल्फ व्हेलेंटाईन हा जास्त प्रभाव पाडू शकला नाही. परंतु कसोटी सामन्याच्या आधी झालेल्या ‘वॉर्म अप’ सामन्यामध्ये त्याने २६ धावांमध्ये ८ विकेट्स काढल्या तर दुसऱ्या इनिंगमध्ये ४१ धावांमध्ये ५ विकेट्स काढल्या आणि त्या सामन्यामध्ये वेस्ट इंडिजने लँकशायरचा एक इनिंग आणि २२० धावांनी पराभव केला.
अल्फ व्हेलेंटाईन याने पहिल्याच कसोटी सामन्यामध्ये पहिल्या इनिंगमध्ये त्याने ८ विकेट्स घेतल्या त्यामधील ५ विकेट्स त्याने लंचच्या पूर्वी घेतल्या त्या पहिल्याच दिवशी . त्या इनिंगमध्ये त्याने १०४ धावांमध्ये ८ विकेट्स घेतल्या , तर त्या सामन्यामध्ये २०४ धावा देऊन ११ विकेट्स घेतल्या त्या १०६ षटकांमध्ये . एका इनिंगमध्ये कसोटी सामन्यामध्ये ८ विकेट्स घेणारा तेव्हा तो पहिला खेळाडू होता . परंतु इंग्लंडने तो सामना जिंकला पुढे लॉर्ड्स वरील दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये वेस्ट इंडिजने रेकॉर्डच केला , वेस्ट इंडिजने तो सामना ३२६ धावांनी जिंकला. त्यावेळी वॉलकॉटने दुसऱ्या इनिंगमध्ये नाबाद १६८ धावा केल्या. त्या सामन्यामध्ये अल्फ व्हेलेंटाईन याने १२७ धावांमध्ये ७ विकेट्स घेल्या तर सोनी रामाधीन याने १५२ धावांमध्ये ११ विकेट्स घेतल्या. हा वेस्ट इंडिजचा इंग्लंडमधला सिरीज विजय होता कारण वेस्ट इंडिजने तिसरा आणि चौथा सामनाही जिंकला होता.
अल्फ व्हेलेंटाईनने तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये ५ विकेट्स घेतल्या तर चौथ्या कसोटी सामन्यामध्ये १० विकेट्स घेतल्या. त्याने तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या इनिंगमध्ये ९२ षटके टाकली हाही रेकॉर्ड त्यावेळी झाला. त्या सिरीजमध्ये अल्फ व्हेलेंटाईन याने २०.४२ च्या सरासरीने ३३ विकेट्स घेतल्या. त्याने त्या कसोटी सिरीजमध्ये त्याने ४२२.५ षटके टाकली आणि या सर्व षटकांमध्ये धावांची सरासरी होती १.५९ धाव प्रति षटक . ही आकडेवारी बघूनच त्याने कशी गोलंदाजी केली असेल याची कल्पना येईल सुदैवाने त्याची गोलंदाजी आजही इंटरनेटमुळे आपण बघू शकतो. दुर्देवाने आज आपल्याला आपल्या बापू नाडकर्णी यांची गोलंदाजी इंटरनेटवर उपल्बध नाही.
त्या संपूर्ण टूरमध्ये २१ सामन्यामध्ये अल्फ व्हेलेंटाईन याने ११८५.२ षटके टाकली आणि ती १७.९४ च्या सरासरीने १२३ विकेट्स घेतल्या त्याने १.८६ धाव प्रति षटक अशा इकॉनॉमीने गोलंदाजी केली होती. त्याने त्या २१ सामन्यामध्ये एका इनिंगमध्ये ५ विकेट्स किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स १० वेळा घेतल्या होत्या. केंट विरुद्ध त्याने १३.२-९-६-५ अशी गोलंदाजी केली होती. ह्या सर्व रेकॉर्डसमुळे त्याची निवड १९५१ च्या ‘ विझडेन क्रिकेटियर ऑफ द इयर ‘ साठी झाली होती. ऑस्ट्रेलिया विरुद्ध १९५१-५२ मध्ये खेळताना त्याने पाच सामन्यामध्ये २४ विकेट्स घेतल्या होत्या तसेच १९५३ मध्ये वेस्ट इंडिजचा संघ जेव्हा भारतामध्ये खेळण्यासाठी आला तेव्हा त्याने पाच सामन्यामध्ये २८ विकेट्स घेतल्या. १९५४ मध्ये १०० विकेट्स फक्त २० कसोटी सामन्यामध्ये घेतल्या. परंतु १९५४ ते १९६२ पर्यंत त्याने ४०.६३ च्या सरासरीने ४६ विकेट्स घेतल्या. त्यांनंतरही त्याने २.०६ च्या सरासरीने विकेट्स घेतल्या परंतु १९५७ नंतरच्या इंग्लंड टूरनंतर त्याचा स्वतःवरचा आत्मविश्वास अक्षरशः कोलॅप्स झाला. त्याने शेवटचा कसोटी सामना १८ एप्रिल १९६२ रोजी भारतीय संघाविरुद्ध खेळला.
अल्फ व्हेलेंटाईनने ३६ कसोटी सामन्यामध्ये १४१ धावा काढल्या आणि १३९ विकेट्स घेतल्या त्या ३०.३२ च्या सरासरीने. त्याने एका इनिंगमध्ये १०४ धावा देऊन ८ विकेट्स घेतल्या आणि १३ झेल पकडले. त्याने १२५ फर्स्ट क्लास सामन्यामध्ये ४७० धावा केल्या आणि ४७५ विकेट्स घेतल्या त्या २६.२१ च्या सरासरीने. त्याने एका इनिंगमध्ये ५ किंवा ५ पेक्षा जास्त विकेट्स ३२ वेळा घेतल्या तर एका सामन्यामध्ये १० किंवा १० पेक्षा जास्त विकेट्स ६ वेळा घेतल्या. त्याने एका इनींगमध्ये २६ धावा देऊन ८ विकेट्स घेतल्या आणि ४५ झेल पकडले.
निवृत्तीनंतर त्याने जमेकासाठी क्रिकेट कोचिंगही केले.
अल्फ व्हेलेंटाईन याचे ११ मे २००४ रोजी अमेरिकेमधील फ्लोरिडा येथील ऑरलॅंडो येथे निधन झाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply