सर विव्हियन अलेक्झांडर रिचर्ड्स यांचा जन्म ७ मार्च १९५२ रोजी अँटिग्वा येथे झाला. ते सेंट जॉन्स बॉइज स्कुल आणि अँटिग्वा ग्रामर स्कुल मध्ये स्कॉलरशिप मेळवून जाऊ लागले. त्यांचे दोनही भाऊ अँटिग्वामध्ये खेळात होते. रिचर्ड्स त्यांचे वडील आणि त्यांचे शेजारी पॅट इवन्सन यांच्याबरोबर खेळण्याचा सराव करू लागले. पॅट इवन्सन हे अँटिग्वाच्या संघाचे कप्तान होते. रिचर्ड्स यांनी १८ व्या वर्षी शिक्षण सोडले आणि ते एक हॉटेल आणि बार मध्ये काम करू लागले. रिचर्ड्स हे सेंट जॉन क्रिकेट क्लब मध्ये जाऊ लागले तेव्हा ते ज्या हॉटेलमध्ये काम करत होते त्या हॉटेलच्या मालकांनी त्यांना नवीन पांढरे ग्लोज, पॅड्स आणि बॅट आणून दिली. ते रायझिग सन क्रिकेट क्लब मध्येही जाऊ लागले आणि ते जोपर्यंत बाहेर खेळण्यास जाईपर्यंत ते त्या क्लब मध्ये होते.
रिचर्ड्स यांनी फर्स्ट क्लास क्रिकेट सामना जानेवारी १९७२ मध्ये वयाच्या १९ व्या वर्षी खेळला. त्यावेळी त्यांनी २० आणि २६ धावा केल्या. त्यांनतर त्यांनी अनेक फर्स्ट क्लास क्रिकेटचे सामने खेळले.
विव्ह रिचर्ड्स यांनी २७ एप्रिल १९७४ मध्ये पहिला बेन्सन अँड हेजेस मधील सामना खेळले. त्यावेळी त्यांना मॅन ऑफ द मँच देण्यात आले. रिचर्ड्स यांनी पहिला कसोटी सामना वेस्ट इंडिजकडून भारतीय संघाविरुद्ध २२ नोव्हेंबर १९७४ रोजी बेंगलोर येथे खेळला. त्याच सिरीजमध्ये त्यांनी १९२ धावा दिल्ली येथे केल्या.
१९७६ हे विव्ह रिचर्ड्सच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे वर्ष होते कारण त्या वर्षात त्याने १७१० धावा केल्या त्या ९० च्या सरासरीने. त्यावेळी त्यांनी ११ कसोटी सामन्यांमध्ये ७ शतके केली.
वेस्ट इंडिजला एक जबरदस्त सलामीचा फलंदाज रिचर्ड्स च्या रूपाने मिळाला. १९७९ चा वर्ल्ड कप रिचर्ड्समुळे वेस्ट इंडिज जिकू शकली. त्यावेळी अंतिम सामन्यामध्ये लॉर्ड्सला रिचर्डस यांनी शतक केले होते.
रिचर्ड्स यांनी १९८६-८७ मध्ये एकदिवसीय सामन्यामध्ये न्यूझीलंडविरुद्ध शतक करून ५ विकेट्स घेतल्या होत्या तो विक्रम २००५ पर्यंत अबाधित होता.
१९८४ ते १९९१ पर्यंत रिचर्ड्स ५० कसोटी सामन्यामध्ये वेस्ट इंडिजचे कप्तान होते. रिचर्ड्स हा एकमेव असा कप्तान होता की ज्याने कप्तान असताना एकही कसोटी मालिका गमावली नाही. तसे पाहिले तर रिचर्ड्स अत्यंत शात होते पण प्रसंगी प्रचंड तापटही होते. जर पंचाने त्याना बाद देताना त्याला वाटले काही चूक झाली की तो मैदानावरून शांतपणे ड्रेसिंगरूम मध्ये जात असताना त्याचे रागाने लाल झालेले डोळे पाहून त्याच्या जवळ जाण्याचे कोणाचेही धाडस होत नसे आणि ड्रेसिंग रुम मध्ये गेल्यावर मात्र आतून काचा वगैरे फुटण्याचा आवाज येई असे अनेक जण सांगतात.
रिचर्डसचे व्यक्तीमत्व आणि स्टाईल आजच्या भाषेत सांगायचे तर ‘ लई भारी ‘ होते. साहेब ज्या दिमाखात मैदानावर येत की समोरचा गोलंदाज विचार करत असे जर याची बॅट लागली तर मेलोच आपण. आपल्या फटक्यांनी तो समोरच्या गोलंदाजाला पार डॉमिनेट करायचा. त्यांना जर कुणी गोलंदाजाने चॅलेंज दिले की त्या गोलंदाजांचे बारा वाजले म्हणून समजावे एकदा रिचर्ड्स सोमरसेटकडून खेळत असताना ग्लॅमॉर्गनच्या विरुद्ध सामना होता त्यांचा गोलंदाज गोलंदाजी करत होता काही चेंडू रिचर्ड्स कडून मिस झाले तेव्हा तो रिचर्ड्सला म्हणाला तू आता माझा चेंडू शोधून मार, भटकणे बंद कर. झाले रिचर्ड्स तो असा भडकला की त्याने जो दणदणीत षटकार पुढल्या चेंडूवर मारला, चेंडू डायरेक्ट मैदानाबाहेर. त्यानंतर त्या गोलंदाजाला रिचर्ड्स म्हणाला आता मैदनाबाहेर जा आणि चेंडू शोधून आण.
रिचर्डसने ‘ हिटिंग अक्रॉस द लाईन ‘ हे त्याचे आत्मचरित्र लिहिले त्यात त्याने त्याच्या खेळाबद्दल लिहिले आहे. भारताने १९८३ मध्ये वर्ल्ड कप जिंकला परंतु जोपर्यंत रिचर्ड्स बाद होत नव्हता तो पर्यंत भारतीय संघाला जिंकण्याचे होप्स नव्हते कारण धावाही जास्त झालेल्या नव्हत्या. कपिल देवने रिचर्ड्स चा झेल उलटे धावत जाऊन त्याच्या ३३ धावांवर घेतला आणि भारतीय संघाचे वर्ल्ड कप जिकंण्याचे अर्धे स्वप्न तेव्हाच पूर्ण झाले होते.
अशा रिचर्ड्स ला बघण्याचा त्याच्याशी बोलण्याचा अनेक वेळा प्रसंग आला. त्याला सहज विचारले तुम्ही सराव कसा करायचा तेव्हा तो सहजपणे म्हणाला क्रिकेट नसेल तेव्हा समुद्राच्या रेतीवरून सायकल घेऊन आम्ही जात असू त्यामुळे आमचे हात आणि मनगट मजबूत झाले. रिचर्ड्स बद्दल खुपच लिहिता येईल तो खऱ्या अर्थाने ऑल राऊंडर होता. विव्ह रिचर्ड्स १९७४ वर्ल्ड कप च्या फ़ुटबाँलच्या सामन्यांमध्ये अँटिग्वा आणि बर्बुडाकडून खेळला होता.
रिचर्ड्सने १२१ कसोटी सामन्यामध्ये ५०.२३ च्या सरासरीने ८,५४० धावा केल्या त्यामध्ये त्याची २४ शतके आणि ४५ अर्धशतके होती तर त्याची सर्वोच्च धावसंख्या होती २९१. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने ३२ विकेट्सही घेतल्या. १८७ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने ६,७२१ धावा केल्या त्यामध्ये ११ शतके आणि ४५ अर्धशतके होती तर त्याची सर्वोच्च धावसंख्या होती नाबाद १८९. त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये ११८ विकेट्स घेतल्या तर एका इनींगमध्ये ४१ धावा घेऊन ६ विकेट्स घेतल्या. विव्ह रिचर्डस यांनी ५०७ एकदिवसीय सामन्यात ३६,२१२ धावा केल्या त्या ४९.४० या सरासरीने त्यामध्ये त्याची ११४ शतके आणि १६२ अर्धशतके होती. हा त्याचा रेकॉर्डच म्हणावा लागेल. फर्स्ट क्लास सामन्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या होती ३२२, त्याचप्रमाणे त्याने २२३ विकेट्सही घेतल्या.
व्हिव्ह रिचर्ड्स हा सोबर्सनंतर खऱ्या अर्थाने ‘किंग’ म्हणावा लागेल. त्यांना खूप सन्मान मिळाले त्याचप्रमाणे त्यांना ‘सर’ हा किताब दिला गेला.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply