भारतातील सर्वात वयस्कर क्रिकेटपटू वसंत रायजी यांचा जन्म २६ जानेवारी १९२० रोजी झाला.
रायजी यांनी १९४० च्या दशतकात ९ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २७७ धावा केल्या होत्या. त्यात ६८ ही त्यांची सर्वोत्तम खेळी होती. त्यांनी मुंबई आणि बडोदा संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
आयुष्याच्या खेळपट्टीवर नाबाद शतक नावावर लावणारे ते केवळ दुसरेच भारतीय क्रिकेटपटू आहेत. त्यांच्याआधी डी.बी. देवधर यांनी वयाची शंभरी पूर्ण केलेली होती.
वसंत रायजी हे क्रिकेटपटू बनले याचे श्रेय त्यांचे वडील नायसदराय रायजी यांचे. एम.एम. रायजी अँड सन्स ही त्यांची चार्टर्ड अकाऊन्टसीची फर्म होती तरी त्यांनी वसंत व त्यांचे बंधू मदन यांना क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहित केले मात्र केवळ हौस म्हणूनच त्यांनी क्रिकेट खेळावे, त्याला आपला व्यवसाय बनवू नये, आपल्या फर्ममध्ये त्यांनी मदत करावी अशी त्यांची इच्छा होती.
त्यांच्या आई जयश्री या गांधीवादी विचाराच्या. मिठाच्या सत्याग्रहासह स्वातंत्र्याच्या चळवळीत त्यांनी भाग घेतला. दोन वेळा तुरुंगवासही सोसला. मात्र मुलांना त्यांनी याची माहिती होऊ न देता त्यांचे लक्ष त्यांनी शिक्षण आणि खेळावरच राहू दिले.
रायजी यांनी १९३३ मध्ये मुंबई जिमखाना मैदानावर पहिला कसोटी सामना पाहिला तेंव्हा ते फक्त १३ वर्षांचे होते. त्या सामन्यात लाला अमरनाथ यांनी ११८ धावांची शतकी खेळी केली होती या खेळीने त्यांचे क्रिकेटकडे आकर्षण वाढवले. विशीत असतांना रायजी यांना दोन रणजी सामन्यांसाठी मुंबईच्या संघात संधी मिळाली पण चांगली कामगिरी न झाल्याने त्यांनी संघातील स्थान गमावले. त्यावेळी मुंबईच्या क्रिकेटमध्ये खूप स्पर्धा होती. त्यामुळे संघातील स्थान गमावल्याचे आपल्याला फारसे वैषम्य नाही असे ते सांगतात. विजय मर्चंट व एल.पी. जय यांच्यासोबत मैत्रीच्या आठवणीही ते सांगतात.
पुढे त्यांना बडौदा संघाकडूनही खेळायचे निमंत्रण आले. त्यांचे आजोबा बडोदा संस्थानचे दिवाण होते आणि वसंत यांचा जन्म बडोद्याचा असल्याचे समजले तेंव्हा बडोदा क्रिकेटच्या आयोजकांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि वसंत रायजी यांनी बडोद्यासाठी पहिल्याच डावात ६८ आणि ५३ धावांच्या खेळी केल्या.
दरम्यान त्यांचे चार्टर्ड आकाउन्टन्सीच्या शिक्षणासाठी इंग्लंडलाही जाणे झाले. तिथे इंडियन जिमखानासाठी सलामी फलंदाज म्हणून ते बरेच सामने खेळले. पण मुंबईच्या तुलनेत तेथील क्रिकेट फारसे दर्जेदार नव्हते.
वसंत यांच्या क्रिकेट वेडाबद्दल पन्ना सांगतात की, क्रिकेट हेच त्यांचे आयुष्य होते. त्यांच्या श्वासाश्वासात क्रिकेट होते. प्रत्येक विकेंडला ते क्रिकेट क्लब आॕफ इंडियामध्ये जायचे आणि मित्रांसोबत क्रिकेटवर भरपूर गप्पा व्हायच्या. थिओ ब्रागान्झा यांच्या खेळांशी संबंधीत पुस्तकांच्या दुकानालाही ते नियमीत भेट द्यायचे. एकावेळी वसंत यांच्या संग्रहात तिनशेपेक्षा अधिक क्रिकेटशी संबंधीत पुस्तके होती. मात्र कामाकडे त्यांनी कधी दुर्लक्ष केले नाही. कामाच्या वेळी काम आणि खेळाच्या वेळी खेळ हे त्यांचे तत्व होते असे पन्ना सांगतात.
वसंत यांचे बंधू मदन हेसुध्दा उपयुक्त अष्टपैलू क्रिकेटपटू होते. मदनसह आनंदजी डोसा व उदय मर्चंट या मित्रांसोबत त्यांनी १९३६ मध्ये जॉली क्रिकेटर्स क्लबची स्थापना केली. १९५१ मध्ये या क्लबने कांगा लीग जिंकली. १९५६ मध्ये एका सामन्यात क्रिकेट क्लब आॕफ इंडियासाठी फलंदाजी करतांना त्यांनी ड्राईव्हचा एक फटका एवढ्या ताकदीने मारला की, समोरच्या यष्टींचे तुकडेच पडले होते. या आठवणीत रमताना हसत हसत वसंत सांगतात की यष्टी कशी तुटली ते मला कळलीच नाही पण आठवणीसाठी ती माझ्याकडे देण्याची विनंती आयोजकांना केली होती. अजुनही त्यांच्या घरातील शोकेसमध्ये ती यष्टी ठेवण्यात आली आहे.
सी. के. नायडू व सर डॉन ब्रॕडमन हे त्यांचे आवडते क्रिकेटपटू. सर डॉन यांच्याशी त्यांचा पत्रव्यवहारसुध्दा होता आणि ती पत्रे त्यांनी आॕस्ट्रेलिया स्थित आपल्या मुलीकडे दिली आहेत. ब्रॕडमन यांना त्यांनी आॕटोग्राफ मागितला होता आणि त्याला त्यांनी प्रतिसादही दिला. त्यातून त्यांची मैत्री झाली. आपल्या प्रत्येक पुस्तकाची एक प्रत ते सर डॉन यांना पाठवत असतात.
क्रिकेट खेळणे थांबविल्यावर वसंत रायजी यांनी या खेळाचे इतिहासतज्ज्ञ म्हणूनही भूमिका बजावली. रायजी यांची क्रिकेटची कारकीर्द फार मोठी नव्हती पण त्यांना लेखनाची प्रचंड आवड होती. ती आवड सचोटीने जोपासत त्यांनी अनेक पुस्तके लिहिली होती. त्यात सी. के. नायडू यांच्या चरित्राचाही समावेश आहे. २०१० मध्ये आलेले ‘क्रिकेट मेमाॕयर्स’ हे त्यांचे शेवटचे पुस्तक होते.
वसंत रायजी यांचे १३ जून २०२० रोजी निधन झाले.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply