विजय सॅम्युअल हजारे यांचा जन्म ११ मार्च १९१५ रोजी सांगली येथे झाला. त्यांच्या क्रिकेटर म्हणून उदय त्यांच्या वयाच्या १८ व्या वर्षीच झाला. १९३३-३४ साली जॉर्डिनच्या नेतृत्वाखाली एम. सी. सी. चा संघ भारतामध्ये आलेला असतानाच विजय हजारे महाराष्ट्रांकडून त्या संघाविरुद्ध खेळले होते. त्या पहिल्याच सामन्यामध्ये विजय हजारे यांनी बार्नेट, मिचेल, व्हॅलेंटाईन आणि टाउनसेड यांच्या विकेट केवळ ४० धावांमध्ये उडवल्या होत्या. त्याच वर्षी म्हणजे १९३४ साली विजय हजारे यांनी त्यांचे रणजी ट्रॉफी सामन्यांमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यानी कितीतरी वर्षे रणजी सामने गाजवले. पहिल्याच रणजी ट्रॉफी सामन्यांमध्ये त्यांनी मुंबईविरुद्ध ६५ धावा केल्या. पुढल्याच वर्षी ते महाराष्ट्राकडून न खेळता ते सेंट्रल इंडियाकडून खेळले. त्या संघाकडून खेळताना त्यांनी राजपुतान्याविरुद्व १०३ धावांचे पहिले शतक काढले.
पुढे १९३१ मध्ये राजपुतान्याचा संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला असताना हजारेही त्या संघाबरोबर गेले तेव्हा केंब्रिज विद्यपीठाविरुद्ध विजय हजारे यांनी ११७ धावा केल्या आणि त्यानंतर मात्र ते धावा करतच राहिले.
१९३७-३८ चा हंगाम मात्र त्यांना चांगला गेला नाही ते लॉर्ड टेनिसनच्या संघाविरुद्ध तीन कसोटी सामने खेळले परंतु म्हणावे तशी त्यांची कामगिरी झाली नाही. परंतु ती कसोटी मालिका गाजवली ती विनू मंकड यांनीच. विजय हजारे आपला पहिला कसोटी सामना २२ जुन १९४६ रोजी इंग्लंडविरुद्ध खेळले.
१९३९ सालनंतर मात्र त्यांच्या बॅट मधून शतके, द्विशतके आणि त्रिशतके यांचा पाऊस पडू लागला. त्यामुळे ते भारताचे ‘ जबरदस्त फलंदाज ‘ म्हणून ओळखले जाऊ लागले. ते जेव्हा पुन्हा महाराष्ट्राकडून खेळू लागले तेव्हा त्यांनी त्यावेळी बडोद्याविरुद्ध नाबाद ३१६ धावा केल्या. परंतु हा त्यांचा विक्रम विजय मर्चन्ट यांनी मुंबई-महाराष्ट्र्र सामन्यामध्ये नाबाद ३५९ धावा करून विजय हजारे यांचा नाबाद ३१६ चा विक्रम मोडला.
ज्या वर्षी विजय हजारे यांनी त्रिशतक केले त्यावर्षी त्यांनी रणजी ट्रॉफी सामन्यांमध्ये ऐकून ६१९ धावा केल्या त्या १५४.७५ धांवांच्या सरासरीने. त्यानंतरच्या हंगामामध्ये त्यांनी ५६५ धावा केल्या त्या १४१.२५ सरासरीने. त्यामध्ये त्यांची तीन शतके होती. ही तीनही शतके त्यांनी वेस्टर्न इंडिया, मद्रास आणि गुजराथ यांच्या संघाविरुद्ध काढली होती.
विजय हजारे यांच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे मोठी धावसंख्या काढण्याची त्यांची पात्रता मोठी होतीच परंतु त्यांच्याकडचे ते स्किलही जबरदस्त होते. ते कव्हरमधून उत्तम ड्राईव्ह मारू शकत होते आणि तोच त्यांचा खरा ‘ टोला ‘ होता. उडता चेंडू ते ‘ हुक ‘ करत असत. त्याचप्रमाणे अनेक फटके ते मारीत असत. खरे तर ते डिफेन्सिव्ह खेळाडू होते कारण जेव्हा जेव्हा संघ अडचणींमध्ये सापडला की ते त्याला सावरून नेत. त्यांची शांत, धीमी वृत्ती खरोखर महत्वाची होती. त्यांनी त्यांचा खेळ विशिष्ट चौकटीमध्ये बसवला होता, उगाच न मानवणारा फटका ते मारीत नसत. त्यामुळे ते आततयीपणे चेंडू मारायला गेले आणि बाद झाले असे कधीच दिसले नाही. विजय हजारे यांना बाद करणे हे अत्यंत कठीण काम होते. त्यामुळे विजय हजारे दोन त्रिशतके काढू शकले असे म्हणावे लागेल.
१९४७ मध्ये बडोदा येथे झालेल्या रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये बडोद्याविरुद्ध बडोद्यासह सर्वाधिक ५७७ धावा. हा विक्रम अनेक वर्षांपासून अबाधित होता. तो विक्रम २००६ मध्ये तो कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने यांनी मोडला. विजय हजारे यांच्याबद्दल खूपच लिहिता येईल कारण अनेक विक्रम त्यांच्या नावावर होते. सलग तीन कसोटी सामन्यांमध्ये शतक झळकावणारा पहिला भारतीय खेळाडू होते अर्थात के. एस. दुलिपसिग यांना इंग्लिश खेळाडू म्हणून हा मान मिळाला होता. त्याचप्रमाणे आपल्या प्रथम श्रेणीतील कारकिर्दीत पन्नास शतके झळकावणारा पहिला भारतीय खेळाडू, सर डॉन ब्रॅडमन यांना त्यांनी तीन वेळा बाद केले होते. त्यांनी शेवटचा कसोटी सामना २८ मार्च १९५३ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळाला. परंतु ते पुढे बराच काळ रणजी सामने खेळत होते.
विजय हजारे यांनी ३० कसोटी सामन्यामध्ये २, १९२ धावा केल्या त्या ४७.६५ या सरासरीने. त्यामध्ये त्यांची ७ शतके आणि ९ अर्धशतके होती. कसोटी सामन्यामध्ये त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती नाबाद १६४.त्यांनी २३८ फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये १८, ७४० धावा केल्या त्या ५८.३८ या सरासरीने त्यामध्ये त्यांची ६० शतके आणि ७३ अर्धशतके होती. त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती नाबाद ३१६ त्याचप्रमाणे त्यांनी ५९५ विकेट्सही घेतल्या. त्यांनी २७ वेळा एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक असे खेळाडू बाद केले.
विजय हजारे यांना पहिल्यांदा मी पाहिले ते ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवर ते तेथे एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यानंतर काही वर्षाने त्यांना पत्र पाठवले होते तेव्हा त्यांनी त्याचे उत्तरही पाठवले होते.
दरवर्षी ११ मार्चला त्यांचा जन्मदिवस ‘ लिजेंट्स क्लब ‘ मध्ये मुंबईला साजरा केला जातो.
भारत सरकारने त्यांना पदमश्री देऊन त्यांचा सन्मान केला होता.
विजय हजारे यांचे १८ डिसेंबर २००४ रोजी ८९ व्या वर्षी बडोद्यामध्ये निधन झाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply