भारतीय संघाला कसोटी दर्जा मिळाल्यानंतर आपल्याला पहिला विजय मिळवून देणारे क्रिकेटपटू विजय मांजरेकर यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३१ मुंबई येथे झाला.
विजय मांजरेकर यांनी प्रथम श्रेणीतील आपल्या करिअरमध्ये आंध्र प्रदेश, पश्चिमम बंगाल, महाराष्ट्र, मुंबई, राजस्थान, उत्तर प्रदेश या संघातूनही रणजी ट्रॉफीसाठी प्रतिनिधित्व केले. ते आवश्याकतेनुसार यष्टीरक्षक तसेच ऑफ स्पिनर म्हणून गोलंदाजाचीही भूमिका निभवायचे. त्यावेळचा जमाना हा खेळाडूंची सांघिक भावनेला बळकटी आणणारा होता. खेळाडू संघासाठी देशासाठी खेळायचे. पैशांपेक्षा आत्मसन्मान महत्त्वाचा होता. पंचतारांकित संस्कृती अजिबात रुजलेली नव्हती. मांजरेकर एकूण ५५ कसोटी सामने खेळले. वर्ष १९५२ मध्ये वयाच्या विसाव्या वर्षीच त्यांनी इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी खेळला होता, त्या कसोटीमधे भारताची अवस्था ३ बाद ४३ अशी झाली होती. पण कप्तान विजय हजारे यांच्याबरोबर चौथ्या विकेटसाठी २२२ धावांची भागीदारी करून विजय मांजरेकर यांनी भारताची स्थिती भक्कम केली होती व विजयही मिळवला होता. या विजयाचे शिल्पकार दोन विजयच होते विजय हजारे आणि विजय मांजरेकर.
विजय मांजरेकरांनी कसोटीत पदार्पण केले त्यावेळी वेगवान गोलंदाजांना सफलपणे तोंड देऊ शकणारे फलंदाज भारताकडे नव्हते. ही उणीव त्यांनी भरून काढली. वर्ष १९६१-६२ च्या हंगामात त्यांनी ८३.० च्या सरासरीने ५८६ धावा केल्या होत्या. कसोटीमध्ये ७ शतके झळकाविताना त्यांनी दिल्ली कसोटीमध्ये १८९ ही स्वत:ची सर्वोच्च धावसंख्या नोंदवली होती. एकूण ५५ कसोटी सामन्यात ३९. १२ या सरासरीने त्यांनी ३२०८ धावा काढल्या तर प्रथमश्रेणी खेळात १९८ सामन्यात ४९.१२ च्या सरासरीने १२,८३२ धावा काढल्या. कसोटीत १९ झेल घेतले तर प्रथमश्रेणी सामन्यांत ७२ झेल घेतले होते. वर्ष १९६४-६५ च्या हंगामात ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्यांनी केलेल्या ५९ व ३९ धावांमुळे विजय सुकर झाला होता. तसेच फेब्रुवारी १९६५ मध्ये मद्रास येथे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात त्यानी त्यांच्या शेवटच्या कसोटीत शतक झळकावले व निवृत्ती घेतली. माजी कसोटीपटू संजय मांजरेकर हे त्यांचे चिरंजीव. सध्या ते समालोचकाची भूमिका बजावत आहेत.
विजय मांजरेकर यांचे निधन १८ ऑक्टोबर १९८३ रोजी झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply