क्रिकेटपटू, क्रिकेट समालोचक, उद्योगपती व समाजसेवक विजय मर्चंट यांचा जन्म. १२ ऑक्टोबर १९११ रोजी मुंबईत झाला.
विजय मर्चंट यांचा जन्म मुंबईतील एका सुखवस्तू कुटुंबात झाला. विजय मर्चंट यांना इंग्लंडच्या संघातून खेळवण्याची इच्छा त्यांच्या (इंग्लंडच्या) खेळाडूंची होती. भारताकडून फक्त दहा कसोटी खेळलेल्या मर्चंट यांना भारताचे डॉन ब्रॅडमन म्हटलं जातं. कॉलेजमध्ये असल्यापासूनच विजय मर्चंट यांनी स्पर्धांमधून धावांचा पाऊस पाडायला सुरुवात केली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही त्यांची कामगिरी चांगली राहिल्यानं भारतीय संघात वर्णी लागली. मात्र, देशभक्ती आणि गांधीजींच्या विचारांनी प्रभावित झालेल्या विजय मर्चंट यांनी १९३०-३१ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या दौऱ्यातून माघार घेतली. त्यावेळी गांधीजींसह अनेक स्वातंत्र्यसैनिकांना तुरुंगात टाकलं होतं.
चार वर्षांनी १९३३-३४ मध्ये भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला तेव्हा विजय मर्चंट संघात होते. त्यावेळी स्वातंत्र्य चळवळीतील अनेक नेत्यांची तुरुंगातून सुटका झाली होती. वयाच्या २२ व्या वर्षी विजय मर्चंट यांनी भारताकडून पहिला सामना खेळला. त्यानंतर १९३६ मध्ये इंग्लंडविरुद्ध मर्चंट यांनी मॅनचेस्टरवर शतक साजरं केलं होतं. तेव्हा इंग्लंडचा क्रिकेटपटू सीबी फ्रायने म्हटलं होतं की, चला विजय मर्चंटला रंग देऊया आणि ऑस्ट्रेलियाला घेऊन जाऊया. म्हणजे तो आपल्याकडून सलामीला खेळू शकेल.
विजय मर्चंट यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द एकूण १८ वर्षांची होती. मात्र, यातील दहा वर्ष दुसऱ्या महायुद्धामुळे वाया गेली. याचा परिणाम म्हणून मर्चंट यांना फक्त १० कसोटी सामनेच खेळता आले. १९५१ साली खांद्याच्या दुखापतीमुळे त्यांनी निवृत्ती घेतली. विजय मर्चंट यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत १० कसोटी सामने खेळले, व ते सर्व सामने इंग्लंडविरुद्धच होते. १९३३ मध्ये इंग्लंडविरुद्ध त्यांनी इंग्लंडविरुद्ध कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी कारकिर्दीतील अखेरचा सामना १८ वर्षांनंतर १९५१ मध्ये खेळला. आपल्या १८ वर्षाच्या करीयर मध्ये त्यांनी एकूण ८५९ धावा केल्या. यात तीन शतकं आणि तीन अर्धशतकांचा समावेश होता. त्यांच्या या कामगिरीनंतरही भारताला १० पैकी एकही सामना जिंकता आला नव्हता.
विजय मर्चंट यांचे २७ ऑक्टोबर १९८७ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply