ही गोष्ट एका दुकानाविषयी आहे.
दुकानांविषयी अनेक गोष्टी आहेत.
एकदां बिशपना सेंट पॉल चर्चमधे प्रवचन द्यायचे होते.
हा एक खास आणि महत्त्वाचा प्रसंग होता.
त्यामुळे राज्यांतील प्रत्येक धर्म मानणाऱ्या वर्तमानपत्रांनी आपले खास प्रतिनिधी त्या प्रसंगाचे वार्तांकन करायला पाठवले होते.
अशा प्रकारे पाठवलेल्या तीन वार्ताहर प्रतिनिधींपैकी एकजण इतका रूबाबदार आणि नीटनेटका होता की कुणालाही तो वार्ताहर वाटतच नसे.
लोकांना तो शहराचा महापौर किंवा वरिष्ठ धर्मगुरूंपैकी एक असेल असेच वाटे.
पण प्रत्यक्षात तो एक अनीतीने वागणारा माणूस होता कारण त्याला मद्य पिण्याची फार चटक लागली होती.
ज्या रविवारी ती खास प्रार्थना आयोजिली होती तेव्हां तो बो नांवाच्या गांवी रहात होता आणि संध्याकाळी पांच वाजतांच तो घरून प्रार्थनेच्या ठिकाणी आपले वार्ताहराचे काम करायला निघाला.
बो पासून शहरापर्यंतच्या रस्त्यावरून चालतांना बोंचऱ्या थंडीतली ती संध्याकाळ साहाजिकच थोडी उदासवाणी व कंटाळवाणी वाटत होती. त्यामुळे त्याने जर वाटेंत एखाद दोन किंवा कदाचित तीन ठिकाणी थांबून आपल्या आवडत्या मद्याचे, जिनचे, एखाद-दोन घोट रिचवले तर त्याला कोण कसं दोष देऊ शकेल ?
सेंट पॉल चर्चजवळ पोहोंचल्यावर त्याने घड्याळांत पाहिले तर प्रवचन सुरू व्हायला अजून तब्बल वीस मिनिटांचा अवधी आहे आणि ती वीस मिनिटे शेवटचा एक “घुटका” घ्यायला पुरेशी आहेत, हें त्याच्या लक्षांत आले.
चर्चपासून चर्चयार्डकडे जाणाऱ्या रस्त्यावरच्या मोठ्या प्रांगणातच एक छोटीशी टपरी त्याला दिसली, ते दारूचेच दुकान होते.
मग तो त्या खाजगी बारमधे प्रवेश करत जराही वेळ न घालवतां कुजबुजला,
“कृपा करून जिनचे दोन गरम गरम पेग आणा.”
त्याच्या आवाजांत चर्चमध्ये प्रवचन करण्यांत प्रवीण असणाऱ्या एखाद्या धर्मगुरूच्या आवाजाची झांक होती व ऑर्डर देण्याच्या पध्दतीवरून तो आपल्याकडे कुणाचे लक्ष जाऊ नये म्हणून काळजी घेत असल्यासारखे वाटत होते.
बारवरचा माणूस त्याने प्रभावित झाला व त्याने आपल्या मालकाचे त्या गिऱ्हाईकाकडे लक्ष वेधले.
मालकाने त्याच्याकडे एक चोरटी नजर टाकली आणि त्या वार्ताहराचा सर्व बटणे लावलेला कोट व जरा खाली ओढलेली हॅट यांमधून दिसेल तेवढे त्याला पाहून घेतले. त्याला आश्चर्य वाटले की इतक्या निरागस आणि सभ्य माणसाला जिन ह्या मद्याचा परिचय कसा झाला ?
पण मालक म्हणून तर्क आणि आश्चर्य करत बसणं हे त्याचं कर्तव्य नव्हतं.
त्याला त्याच्या मागणीप्रमाणे मद्य पुरवणे हे त्याचे काम होते.
त्याप्रमाणे त्याने मागवलेली जिन त्याच्या समोर ठेवण्यात आली आणि ती तो प्याला.
त्याला ती आवडली.
ती खूपच चांगली जिन होती.
तो मद्याचा जाणकार होता आणि त्याला तें लगेच जाणवले.
ती जिन त्याला इतकी चांगली वाटली की आणखी दोन हाफ न घेणे म्हणजे अशी झकास जिन घेण्याची संधी दवडण्यासारखे होते.
मग त्याने दुसऱ्यांदा तीच मागणी पुन्हां केली, कदाचित तिसऱ्यांदाही.
मग तो आपली छोटी वही आपल्या गुडघ्यांवर धरून चर्चच्या बांकावर जाऊन बसला आणि वाट पाहू लागला.
जसे प्रवचन सुरू झाले तसे त्याच्या मनांत आजूबाजूच्या सर्व भौतिक जगाबद्दल वैराग्य आले; असे वैराग्य फक्त धर्म आणि मद्य ह्या दोहोंनीच येऊ शकते.
त्याने त्या भल्या बिशपचे प्रवचन ऐकले आणि लिहूनही घेतले.
मग बिशपचे शब्द त्याच्या कानांवर आले, “सहावा आणि शेवटचा मुद्दा असा आहे की”.
त्याने लागलीच ते लिहून घेतले.
मग त्याने वहीकडे एक नजर टाकली तर तिथे पहिला मुद्दा ते पांचवा मुद्दा (दोन्ही धरून) वहीवर दिसतच नव्हते.
त्याचे त्याला आश्चर्य वाटले.
आजूबाजूचे सर्व श्रोते जाऊ लागले तरी तो तिथे तसाच आश्चर्य करत बसला होता आणि मग त्याच्या अचानक आणि झटकन ध्यानांत आले की पहिले पांच मुद्दे ऐकतांना खरं तर तो झोंपला होता आणि त्यामुळे प्रवचनाचा प्रमुख भाग लिहून घ्यायचा राहूनच गेला होता.
आतां तो हें कसे काय निभावणार होता.
त्याचे वृत्तपत्र प्रतिष्ठीत धार्मिक वृत्तपत्र होते.
प्रसंगाचे वर्णन आणि भाषणाचा पूर्ण वृत्तांत रात्रीच द्यायला हवा होता.
बाजूने जाणाऱ्या एका चर्चमधल्या एका मुलाचा झगा पकडून त्याने खेंचला व विचारले, “बिशप गेले की अजून आहेत ?” त्याला उत्तर मिळाले की बिशप अजून तिथेच आहेत पण जाण्याच्या तयारींत आहेत.
वार्ताहर उत्तेजित होऊन ओरडला, “ते जाण्यापूर्वी मला त्यांना भेटलेच पाहिजे.”
तो मुलगा म्हणाला, “तुम्ही त्यांना भेटू शकत नाही.”
वार्ताहर हैराण झाला.
तो आर्जवी आवाजात म्हणाला, “त्यांना सांग की त्यांचे आतांचे प्रवचन ऐकून पश्चात्तापदग्ध झालेला एक पापी त्यांना आतांच भेटू इच्छितो.
उद्या खूप उशीर होईल.”
हे ऐकून चर्चमधील शिकाऊ उमेदवाराचे मन हेलावले आणि तेंच ऐकून बिशपांचेही मन द्रवले.
ते म्हणाले, “त्या गरीब माणसाला आणा मला भेटायला.”
फक्त दोघेच खोलीत राहिल्यावर डोळ्यात पाणी आणून वार्ताहराने बिशपना सगळं अगदी खरें तें सांगून टाकले – अर्थात् तो जिन पिण्याचा भाग मात्र वगळला.
तो म्हणाला की तो फार गरीब होता आणि त्याची प्रकृती बरी नव्हती.
आदल्या रात्री त्याची झोंप अर्धवट झाली होती आणि आज तो लांबच्या बो गांवापासून चालत येऊन दमला होता.
जर आजचे त्यांचे प्रवचन त्याने आपल्या वृत्तपत्राला दिले नाही तर त्याची नोकरी जाईल व त्याला व त्याच्या कुटुंबाला फार वाईट परिणाम भोगावे लागतील.
बिशपना त्याची खूपच दया आली.
शिवाय आपले पूर्ण प्रवचन एवढ्या महत्त्वाच्या पेपरमधे छापून येणेही त्यांना हवेच होते.
त्याची समजूत काढणारे स्मित करत बिशप म्हणाले, “चर्चमधे झोपू नये अशी ताकीदच तुला मिळाली समज.
तुझ्या नशिबाने मी माझ्या भाषणाचे व्यवस्थित टिपण काढले आहे.
तू जर ते नीट सांभाळणार असशील आणि उद्या सकाळीच मला परत आणून देणार असशील तर मी ते तुला तात्पुरते देईन.”
असे म्हणून त्यांनी एक छोटी काळी कातडी बॕग त्याच्या समोर ठेवली.
तिच्यात टिपणाचे हस्तलिखित कागद नीट गुंडाळी करून ठेवलेले होते.
“तू ही बॕगच घेऊन जा, त्यात ते नीट रहातील.
उद्या सकाळी लवकर टिपणाच्या कागदांसकट बॅग मला परत आणून दे.” बिशप म्हणाले.
वार्ताहराने चर्चच्या मधल्या वाटेत असलेल्या दिव्याच्या प्रकाशांत टिपणाच्या कागदावरून नजर फिरवली आणि क्षणभर त्याचा आपल्या नशिबावर विश्वासच बसेना.
त्या हुशार बिशपनी काळजीपूर्वक तयार केलेलं ते टिपण इतके व्यवस्थित आणि इतकं छान लिहिलेले होते की ते जसेच्या तसे वृत्तांतासाठी तयारच होते.
त्याचे काम आधीच झाले होते.
त्यावर सोपस्कार करण्याची कांहीच गरज नव्हती.
तो स्वतःच्या नशीबावर इतका खूष झाला की त्याने परत जातांना वाटेतल्या त्या टपरीत जाऊन स्वतःला दोन पेग देऊन ते साजरे करायचे ठरवले.
साहजिकच त्याचे पाय पुन्हां त्याच टपरीकडे वळले.
“तुमच्याकडे खरोखरच फार चांगली जिन मिळते.” तो त्या बारमधील नोकराला म्हणाला.
“मी आणखी फक्त एक घेईन. घेऊन ये.”
मग तो पीतच राहिला.
अकरा वाजतां मालकाने त्याला बळजबरीने तिथून बाहेर काढला.
नोकराने त्याला आधार देऊन चर्चच्या आवारा बाहेरील एका बांकावर नेऊन बसवले.
तो गेल्यावर मालकाच्या लक्षांत आले की तो जिथे बसला होता तिथे एक काळी कातडी बॅग पडलेली आहे.
ती नीट न्याहाळून पहातांना त्याला दिसले की त्या बॅगवर हँडलच्या खाली एक चकचकीत पितळी पट्टी आहे.
त्यावर मालकाचे नांव आणि हुद्दा लिहिलेला आहे.
ती बॅग त्याने उघडली तर आतमधे टिपणाच्या कागदांची गुंडाळी मिळाली.
त्या हस्तलिखितावर शेवटी कोपऱ्यात बिशप यांचे नांव व पत्ताही लिहिलेला होता.
मालकाने एक लांब पण हलकी शीळ वाजवली आणि आपले बटबटीत डोळे आणखी विस्फारून तो त्या बॅगेकडे पहात उभा राहिला.
मग त्याने आपली हॅट घातली, कोट घातला आणि रस्त्यावरून तोंडातल्या तोंडात पुटपुटत चालू पडला.
तो निघाला तो सरळ चर्चच्या जागेंत रहाणाऱ्या चर्चचे दुय्यम अधिकारी म्हणजे ‘कॅनन’ यांच्या दाराशी आला आणि त्याने दारावरची बेल वाजवली.
दार उघडणाऱ्या नोकराला तो म्हणाला, “मिस्टर…..कॅननना ना सांगा मला त्यांना आताच्या आता भेटायचे आहे.
तसंच कांही महत्त्वाचं असल्या शिवाय मी एवढ्या रात्री उशीरा आलोच नसतो.”
नोकराने टपरीच्या मालकाला घरात घेतले व बसायला सांगितले.
कॅनननी तिथे येताच विचारले, “काय पीटर, काय काम आहे ?”
ते टपरीच्या मालकाला ओळखत होते.
“त्याचं असे आहे साहेब,” मुद्दामच सावकाश सुरूवात करत तो टपरी मालक पीटर म्हणाला, “मला आशा आहे की माझ्या टपरीचा भाडेकरार १४ वर्षांचा आहे तो एकवीस वर्षांचा करण्याचा कांही मार्ग तुम्ही काढाल !”
कॅनन उद्वेगाने पाय आपटत म्हणाले, “देव तुझं भलं करो.
तू मला हे सांगू नकोस की रविवारी एवढ्या रात्री तू तुझ्या भाडेकराराबद्दल बोलण्यासाठी आलायस !”
बिलकुल खजील न होतां टपरीचा मालक म्हणाला, “खरें म्हणजे तेवढ्यासाठीच नाही आलो.
दुसरेही एक मामुली काम आहे, ज्याबद्दल मला तुमच्याशी बोलायचे आहे. ते असें…..”
म्हणून त्याने बिशप यांची बॅग कॅनन समोर ठेवली आणि आपली गोष्ट ऐकवली.
कॅनननी पीटरकडे पाहिले आणि पीटरने कॅननकडे पाहिले.
कॅनन म्हणाले, “ह्यांत कांहीतरी चूक असेल.”
टपरीचा मालक पीटर म्हणाला, “त्यांत कोणतीही चूक नाही.
त्यांना मी पहिल्यांदा पाहिले तेव्हाच मला संशय आला होता.
तो सामान्य माणूस नाही आणि तो चेहरा लपवतोय, हे मी तेव्हाच ओळखले.
ते जर बिशप नसतील तर बिशप पाहूनही मी बिशप ओळखू शकत नाही, असंच म्हणावं लागेल.
शिवाय ही त्यांचीच बॅग आहे आणि त्यांत त्यांच्या सहीचं हस्तलिखित प्रवचन आहे.”
टपरीचा मालक पीटर एवढं बोलून हाताची घडी घालून उभा राहिला.
कॅनननी थोडा मनाशी विचार केला.
चर्चच्या इतिहासांत अशा गोष्टी घडल्याचे त्यांच्या ऐकीवात होते.
मग पुन्हां कां नाही होणार ?
त्यांनी पीटरला विचारले, “तुझ्याशिवाय हे कुणाला माहित आहे ?”
पीटरने उत्तर दिले, “आतांपर्यंत तरी दुसऱ्या कुणालाही हें अजिबात ठाऊक नाही.”
कॅनन म्हणाले, “मला वाटते… मला वाटते आम्हाला तुझ्या टपरीच्या भाडेकराराची मुदत २१ वर्षेपर्यंत वाढवतां येईल.”
“तुम्ही दाखवलेल्या दयेबद्दल धन्यवाद, महाशय.”
पीटर म्हणाला आणि तिथून निघून गेला.
दुसऱ्या दिवशी सकाळी कॅनन बिशपकडे जाऊन त्यांची वाट पहात बसले.
ते येताच त्यांनी ती बॅग त्यांच्यासमोर ठेवली.
बिशप आनंदाने म्हणाले, “अच्छा ! ही बॅग त्याने (वार्ताहराने) तुमच्याकरवी पाठवली तर ! वा: !”
“हो, त्यानेच (टपरीच्या मालकाने) आणून दिली आणि मी त्याचे आभार मानतो की त्याने ही बॅग माझ्याकडेच आणून दिली.
हें खरे आहे
आणि साहेब, मी तुम्हाला सांगू इच्छितो की कोणत्या परिस्थितीत ही बॅग तुमच्या हातून निसटली, तें ही मला ठाऊक आहे.”
हे बोलताना कॅननचे डोळे बिशपकडे रागाने बघत होते.
बिशप अस्वस्थ होऊन हंसले.
ते थोड्या ओशाळेपणे म्हणाले, “मी तें तसें करणे (वार्ताहराला टिपण देणे ) फारसे योग्य नव्हते.
पण ठीक आहे.
ज्याचा शेवट गोड तें सारेंच गोड.”
कॅननना बिशपच्या बेपर्वाईची चीड आली.
ते कळकळीने आणि रागाने म्हणाले, “अहो साहेब, चर्चच्या भल्यासाठी मला तुम्हाला विनंती करावीशी वाटते की पुन्हां असा प्रसंग (बिशपने मद्य पिऊन टपरीमधे शुध्द हरपण्याचा) घडू देऊ नका.”
ह्यावर बिशप रागाने कॅननना ओरडले, “एवढ्या लहान गोष्टीचा (वार्ताहराला टिपण देण्याच्या) किती बाऊ करतां आहांत ?”
मग कॅननच्या चेहऱ्यावरची नाराजी पाहून ते थांबले.
त्यांनी विचारले, “बॅग तुमच्याकडे कशी आली ?”
कॅनन म्हणाले, “ ‘क्रॉस कीज’ ह्या टपरीच्या मालकाने ही बॅग मला काल रात्री आणून दिली.
तुम्ही ती त्याच्या टपरीत विसरला होतात.”
बिशपनी एक खोल श्वास घेतला आणि ते खाली बसले.
थोडा दम घेऊन त्यांनी वार्ताहर आपल्याकडून बॅग घेऊन गेल्याची व आपण दया बुध्दीने त्याला ते टिपण बॅगसकट दिल्याची सर्व खरी हकीकत कॅननना सांगितली.
कॅनन मात्र अजूनही बिशपनी सांगितलेल्या हकिकतीवर विश्वास ठेवायचा केवळ अयशस्वी प्रयत्नच करताहेत.
— अरविंद खानोलकर.
मूळ कथा – द लीज ऑफ द क्रॉस कीज
मूळ लेखक – जेरोम के. जेरोम
तळटीप : जेरोम के. जेरोम हा लेखक प्रवास वर्णने, भयकथा आणि विनोदी लेखन यासाठी प्रसिध्द आहे.
त्याने बरीच नाटकेही लिहिली.
त्याच्या एकूण साहित्याची यादी बरीच मोठी आहे. ‘थ्री मेन इन बोट’ हे त्याचे गाजलेले प्रवास वर्णन.
इथे सादर केलेली त्याची लघुकथा ही विनोदी आहे.
गेल्या कांही कथा ह्या भयकथाच होत्या म्हणून इथे त्याची भयकथा न घेतां साधी विनोदी कथा घेतली आहे.
ह्या गोष्टी इंग्रजीतलं क्लासिक लिटरेचर समजल्या जातात.
बहुतांश कथा १८४० ते १९१० ह्या कालखंडातील आहेत.
ब्रिटन त्यावेळी जगावर राज्य करत होतं तर अमेरिका पुढे येण्यासाठी धडपडत होती.
तेथील सामान्य माणसांसाठी मात्र तो काळ खडतर होता.
त्याकाळी सरासरी आयुष्मान कमी होते.
ह्यांतील बरेचसे लेखकही ४० ते ५० एवढेच जगले.
समाजांत अस्थिरता होती.
कॕथलीक चर्च आणि त्यांच्या नीतीनियमांचे जोखड लोक फेंकून देत होते.
नोकऱ्या मिळणं कठीण होतं.
शिक्षण महाग होतं.
सर्वांना परवडत नव्हतं.
उच्च नीच भेद होता.
राजे, सरदार, दरबारी, खानदानी घराणी, सावकार, आदींचे जग वेगळेच होते.
मध्यम आणि गरीब वर्गांतील मुलं बाराव्या-चौदाव्या वर्षीच काम शोधू लागत.
कांहीनी पुढे नांव काढलं.
नियतकालिकांचा विकास होत होता. वाचनाची आवड उच्च वर्गापूरती न रहाता खप वाढविण्यासाठी नियतकालिके खूप लोकांपर्यंत पोंचायचा प्रयत्न करता होती. सामाजिक सुधारणांसाठी लोक धडपडत होते.
१८७२ पासून झगडणाऱ्या स्त्रियांना १९१८ला मतदानाचा हक्क मिळाला, ही एक गोष्टदेखील समाजाची स्थिती दाखवते.
अशा अवस्थेत ह्यापैकी कांही लेखकांनी अनुभवावर आधारीत, थोडे वास्तव, थोडी कल्पना करून अशा गोष्टी लिहिल्या.
त्यांच्या बहुतेकांच्या आयुष्याची कहाणी या कथांइतकीच वाचनीय आहे.त्या काळांत दुःखपर्यवासी लेखन खूप झाले आहे. तशाच साहसकथा आणि भयकथाही लोकप्रिय होत्या.
‘द लिज ऑफ द क्रॉस कीज’ मधे केवळ गैरसमजावर आधारीत विनोद आहे.
अप्रत्यक्षपणे चर्चच्या अधिकाऱ्यांवर विनोद आहे.
चर्चचे अधिकारी वाईट नसूनही केवळ गैरसमजांतून दुय्यम अधिका-याला बिशपबद्दल खात्री वाटत नाही.
चर्चच्या प्रमुखाचे नांव खराब होऊ नये म्हणून चर्चचा दुय्यम अधिकारी टपरीच्या मालकाला टपरीचा भाडेपट्टा चौदाऐवजी एकवीस वर्षांसाठी वाढवून द्यायला सहज तयार होतो.
मात्र ज्याच्यामुळे हे घडतं त्या वार्ताहराचं पुढे काय झालं, हे कथेत सांगितलेलं नाही.
वाचकांच्या कल्पनाशक्तीवर सोडलं आहे कारण तें फार महत्त्वाचं नाही.
Leave a Reply