ललित कला या समाजाभिमुख असतात असं म्हणतात. कला ही समाजाला आनंद देण्यासाठी असते असेही काही जण म्हणतात. ललित कलेमध्ये संगीत, चित्रकला, शिल्पकला, काव्यकला आणि रचना शास्त्र कला या मुख्यत्वे येतात. या कला माणसाला मानसिक आनंद प्रदान करतात. इतर कला ज्या काही ऐहिक गोष्टींपासून बनतात त्या माणसाच्या इतर शारीरिक गरजा पूर्ण करण्यास मदत करतात. ज्या कला मानसिक आनंद देतात त्यांचं महत्त्व नक्कीच जास्त असते.
समाजाभिमुख कला म्हणजे नक्की काय हे जाणून घेण्यासाठी माझं विचारचक्र चालू झालं आणि त्यातून मला जे काही समजलं ते मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.
कला ही कलाकाराच्या प्रतिभाशक्तीतून निर्माण होते आणि त्याच्या संस्कारातून आकार घेते. हे एक दैवाचं किंवा देवाचं देणं असतं. ते एक विशिष्ट ऊर्जा घेऊन प्रकट होतं. ही ऊर्जा बऱ्याच वेळेला चांगलीच असते असं मला वाटतं. विशेष करून संगीताच्या बाबतीत बोलायचं झालं तर कुठल्याही शास्त्रीय गायन, उपशास्त्रीय गायन, भावगीत, भक्तीगीत यातून एक चांगली ऊर्जा निर्माण होते आणि ती समाजाला आनंदित करीत राहते. अनेक वर्षांच्या या दीर्घकालीन श्रवणानंतर आणि कलाकाराच्या तपश्चर्ये नंतर काही विशिष्ट रुची ,आवडी समाजात विकसित होतात. समाजामध्ये विविध प्रकारचे लोक असतात आणि त्यांच्यावरील संस्कारांप्रमाणे त्यांची आवड ही तयार होत असते. आपल्याला काय आवडतं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो.
याचा अर्थ असा नव्हे की एखाद्याला एखादी गोष्ट आवडते म्हणजे ती सगळ्यांना आवडेल आणि आदर्श अशी असेल.
समाजात अनेक प्रकारचे लोक, अनेक स्वभावाचे लोक असतात. त्यांना वेगवेगळे सादरीकरण आवडत असते. परंतु त्यात चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रकार असतात. समाजाला प्रगतीकडे आणि उत्कर्षाकडे नेणारी कला ही कला माझ्यामते आदर्श म्हटली पाहिजे. ज्यामुळे समाजात एकात्मता, शांती सलोखा, मैत्री, आनंद आणि सुख निर्माण होतं ती कला ही आदर्श मानली गेली पाहिजे. परंतु कलेच्या सर्वच सादरीकरणातून हा हेतू साध्य होताना दिसत नाही. लोकांची आवड आणि आदर्श कला यामध्ये एक मोठी दरी निर्माण झालेली असते. लोकांना जे आवडते तेच चांगले असे म्हणता येणार नाही. कित्येक वेळा कलेच्या सादरीकरणातून चुकीचे संदेश दिले जातात. अशा सादरीकरणातून चुकीचे विचार व्यक्त केले जातात. आणि हे समाजाला नक्कीच नकारात्मक विचार करण्यास भाग पाडतात. असे सादरीकरण निषिद्ध मानले गेले पाहिजे. कलाकाराने त्याच्या कलेतून समाजामध्ये कलेची आवड ही उच्च स्तरावर नेऊन ठेवली पाहिजे. ज्या कलेमुळे आनंद मिळतो आणि निर्मळ अशा भावनांचे प्रकटीकरण केले जाते ती कला जरी लोकांना आवडत नसली तरी सादर केली गेली पाहिजे.
कलाकाराने आपल्या दैवी प्रतिभा शक्तीच्या आविष्कारातून जे चांगले आहे तेच समाजा समोर सादर केले पाहिजे. समाजाला ते आवडो अथवा न आवडो पण कलाकाराने समाजाच्या उन्नतीसाठी त्याला जे चांगले आणि योग्य वाटते ते सादर केले पाहिजे. किंबहुना कलाकाराने समाजाची कले प्रतीची जाण, रुची ही विकसित केली पाहिजे. जे हिणकस आहे सवंग आहे, सपक आहे ते केवळ लोकांना आवडते म्हणून सादर करणे मला योग्य वाटत नाही.
थोडक्यात कलाकाराने नवीन, सशक्त विचार करायला लावणारी अशी कलाकृती समाजासमोर ठेऊन समाजाची रुची घडवायला हवी. उदा. सुधीर फडके यांनी गायिलेले ग. दि. माडगूळकर रचित गीत रामायण, भीमसेन जोशींनी गायलेली अभंगवाणी, आयुष्यावर बोलू काही, जगजितसिंग याच्या अनेक गझल, लता मंगेशकर यांची अनेक चित्रपटगीते, श्रीनिवास खळे, हृदयनाथ मंगेशकरांनी स्वरबद्ध केलेली अजरामर गीते.
प्रतिष्ठा आणि पैसा यासाठी समाजाबरोबर वाहत न जाता, समाजाला काय चांगले ऐकायचे , पहायचे हे शिकविले पाहिजे. कलाकाराने समाजाची आवड उन्नत आणि चोखंदळ केली पाहिजे. समाज घडविला पाहिजे.
–किरण फाटक
……१५/११/२०२२
Leave a Reply