रविवार सकाळ असूनही काळ्यांच्या स्वयंपाक घरात बरीच गडबड चालू होती. डायनींग टेबलावर डिझायनर प्लेट्स, मोतीचुर लाडूंचा बॉक्स, मलई बर्फी आणि कट्यावर पोह्याची तयारी. एकीकडे गॅसवर दूधही गरम होत होत.
“काय ग, केवढी तयारी चालली आहे तुझी?”
किचनमधल्या सगळ्या पदार्थावर नजर फिरवत वंदिता म्हणाली.
“मग मैत्रीण येणार आहे माझी. आणि आता ती काय फक्त माझी मैत्रीण नाही, तर माझी होणारी विहिण बाई सुद्धा आहे. तुझी सासू. त्यांचा योग्य तो पाहुणचार व्हायला नको. मान आहे त्यांचा.”
“मान.. सिरियसली आई..?”
“वंदू… चूप. मला माझं काम करुदेत. तू जा आवर जा.… येतीलच ते एवढ्यात.”
“तयार आहे की मग मी…”
सारिकाने तिच्याकडे वरून खालपर्यंत बघितल. वंदिताने गुलाबी रंगाचा आणि निळ्या रंगाच नाजुकस नक्षीकाम केलेला कुडता आणि निळ्या रंगाची लेगीन घातली होती.
“हे का घातलं? तुला साडी काढून ठेवली होती ना मी. जा बाई जा आवर लवकर.”
“मी साडी वगैरे काही नेसणार नाहीए हा.”
“वंदू… बाळ अग, तुला बघायला येणार आहेत ना ते.”
“मला ऑलरेडी बघून झालाय त्यांचं. मीरा मावशीने मला जेव्हा पाहिलं ना तेव्हा मी जीन्स न टॉप मध्ये होते…. आ.. आणि अमित आला तेव्हा तर मी घरातल्या कपड्यात होते. त्यापेक्षा हे चांगलेच आहेत.”
“वंदू…”
“आई..! मी साडी नेसणार नाहीए…”
हातात घेतलेला झारा कट्यावर आपटत ती बाहेर निघून गेली. बाहेर येऊन तिने वैतागत स्वतःला सोफ्यावर झोकून दिल. त्याच सोफ्यावर बसलेल्या तिच्या बाबांनी असल्या जागीच उडी मारायचं नाटक करत. “अरे! भुकंप झाला..” अस म्हंटल.
“बाबा..”
वंदिता अजून वैतागली.
“काय झालं काय वैतागयला?”
“विचारा तुमच्या बायकोला…”
“अस म्हणतेस… बायको… आपलं… सारिका…”
“ओ..! असुद्या… उगाच तिला बाहेर बोलावू नका..”
“काय झालंय काय पण?”
“मी हा ड्रेस घातला आहे. काय वाईट आहे ह्यात?”
“काहीच नाही.. छान दिसत आहे… गुलाबी रंग खूपच खुलून दिसतो तुला..”
“हो की नाही. मग अस असताना मी साडी का नेसू?”
“पॉईंट व्हॅलीड आहे. पण साडी तुला अधिक सुंदर आणि शोभून दिसते.”
“बाबा..?”
बाबा हसून म्हणाले.
“हे बघ वंदू… आज तुझा दिवस आहे. तू, तुझ्या आयुष्यातल्या एका खूप मोठ्या निर्णयाकडे वाटचाल करणार आहेस. त्यामुळे असा मूड नाही घालवू. तुला नाही ना नेसायची साडी नको नेसु. बी क्लीअर अँड बी कम्फर्टेबल.”
बाबांच्या बोलण्यावर वंदू नुसती हसली.
साधारण अकराच्या सुमारास, काळ्यांच्या घरची बेल वाजली. प्रभारक म्हणजेच वंदिताच्या बाबांनी दार उघडलं.
“नमस्कार ! काळे साहेब…”
“नमस्कार ! नमस्कार ! सरनाईक… या, या..”
मीरा आणि केदार सरनाईकांच स्वागत करत प्रभाकरनी त्यांना घरात बोलावल.
“खरच बरका काळे, इतक्या वर्षांनी भेटीचा योग्य आला बघा आपला आणि तो इतका सुरेख.”
“अगदी योग्य बोललात बघा तुम्ही सरनाईक… शाळेच्या गदरींगमध्ये भेटणारे आपण, मुलांच्या लग्नाबाबत बोलणी करायला भेटू अस वाटलं ही नव्हतं बघा तेव्हा.”
दोघेही अगदी मोकळे पणाने हसले. इतक्यात आतून वंदिता बाहेर आली.
“ये बाळ… ये.”
तिचे बाबा म्हणाले.
वंदिता दोघांसमोर आली. केदारने तिला एकवार बघितलं.
“गोड.. छान, छान… सुखी रहा… मीरा पटलं मला. आपल्या अमितला ह्याहून चांगली मुलगी मिळणे नाही.”
वंदिता लाजली. बाकी तिघे केदारच्या बोलण्याने खुश झाले.
“अहो! पण आमचे जावई… अमित राव आहेत कुठे?”
“येतोय तो… खाली गाडी लावत असताना त्याला ऑफिस मधून फोन आला होता. येईलच इतक्यात.”
मीराने स्पष्टीकरण दिल.
“असुदेत, असुदेत सुट्टी असली तरी हे ऑफिसवाले काही श्वास घेऊ देत नाही. आमच्याकडे वंदूच काही वेगळं नाही.”
सारिका म्हणाली आणि अचानक तीला आठवल्यागत करत म्हणाली.
“अगो बाई! पाणीच नाही बघ विचारलं मी. आलेच हा…”
आईच्या वाक्यावर वंदिता ला त्याच्यातला मगासचा संवाद आठवला. आणि ती म्हणाली.
“मीरा मावशी…. मला एक प्रश्न विचारायचा होता. तुमची हरकत नसेल तर…”
“विचार की बाळ… पण एक अट आहे. मला मावशी फक्त आजच्या दिवसच म्हणायचं बर.”
वंदिता हसली मग थोडी गंभीर झाली.
“मावशी, तुझी आणि आईची मैत्री खूप जुनी. हो ना…?”
“हो तर, तुम्ही बालवाडीत होता तेव्हा पासूनची आमची ओळख मग मैत्री का ग?”
“मग आता ही सोयरीक जुळली तर, हे नातं बदलणार आहे का?”
“तुला नेमकं काय विचारायचं आहे?”
“मगाशी तुमच्या येण्याची बरीच छान तयारी चालली होती घरात म्हणजे मला त्या बद्दल काही म्हणणं नाही, प्लीज तुम्ही गैरसमज नका करून घेऊ. पाहुणचार करायला मलाही खूप आवडतो.”
वंदिता बोलत असतानाच सारिका ट्रेत पाण्याचे ग्लास घेऊन बाहेर आली. तिच्याकडे एकवार बघून वंदिता पुन्हा बोलू लागली.
“मला खटकलं ते आईच बोलणं… ती म्हणाली की तू आता तिची मैत्रीण नाही तर विहिण आहेस आणि तुझा मान हा राखायलाच हवा. म्हणजे एका मैत्रीच्या नात्यात अजून एक नात ऍड होणार असेल तर त्याची डेफिनेशन बदलते का?”
“वंदू, काय हा प्रश्न… अस बोलतात?”
सारिकाने तिला टोकल.
क्षणभर वंदिता शांत झाली. मिराचा आणि शेखरचा अंदाज घेत ती पुन्हा बोलली.
“हे बघा, माझ्या बोलण्याचा तुम्हाला राग आला असेल तर आय एम सॉरी..”
“राग तर आला आहे मला वंदू… पण तुझा नाही. तुझ्या आईचा… सारिका, एवढंच का ग ओळखलस मला… आपल्यात ही औपचारिकता आणलीस तू..?”
“मीरा, अग तस नाही..”
“काही बोलू नकोस… तुझी मुलगी, माझी मुलगी म्हणून मी तुझ्याकडे मागायला आले खरतर मलाच हे सोपस्कार करायला हवे…”
“मीरा…”
“सॉरी पण मला एवढंच म्हणायचं होत की जर नात मनाचं आणि मनापासून असेल तर त्यात औपचारिकता नसावी.”
वंदू मनातला सगळं बोलून शांत झाली.
तेवढयात दारावरची बेल वाजली.
“अमित आला वाटत…” केदार म्हणाला तसे प्रभाकरन दार उघडले. अमित फ्लोटर काढत होता.
“या, या… अमितराव…”
“काका… अहो! राव वगैरे नका म्हणू… खूपच अवघड वाटत ते..”
“अस कस… अहो! जावई तुम्ही आमचे…”
“त्यापेक्षा मुलगा का म्हणत नाही तुम्ही… आपल्या नात्यात औपचारिकतेची गरज आहे का?”
अमितच्या बोलण्यावर वंदिता पासून सगळेच त्याच्याकडे पहायला लागले त्याने तो अधीकच अवघडला.
“काही झालय का? तुम्ही सगळे असे का पाहताय माझ्याकडे..?”
“तू आता इथे बाहेर कधीपासून उभा होतास?” मीराने विचारलं.
“बेल वाजवून दार उघडे पर्यंत…. का?”
इतकेही कोणाचे विचार जुळू शकतात ह्यावर कोणाचा सांगूनही विश्वास बसला नसता. मीरा आणि सारिका तर ह्या घटनेने अधिकच खुश झाल्या.
अमित येऊन बसला. बऱ्याच गप्पा झाल्या. अमितच्या वंदिताच्या आई बाबांशी, वंदिताच्या अमितच्या आई वडिलांशी… पण अमित आणि वंदिताला बोलायची संधी काही केल्या मिळत नव्हती. सगळे भूतकाळात एवढे रमले होते की चौघांपैकी कोणीही मूळ मुद्यावर यायला तयार नाही. ह्याने हे दोघे वैतागले होते. खास करून अमित. वंदिताला पाहिल्यापासून आणि फक्त तिचाच विचार करून करून अमित जणू तिच्या प्रेमातच पडला होता. त्याला तिच्याशी बरच काही बोलायचं होत, विचारायचं होत. पण त्याच्याकडे तिचा काहीच कॉन्टॅक्ट नंबर नव्हता आणि आईकडून तो मागणं जरा जास्तच डेस्पो झाल्यासारखं वाटलं असत.
अमित आता हळूहळू अस्वस्थ होउ लागला. मिराच्या ते लक्षात आलं.
“मी काय म्हणते, आपल्या गप्पा चालूच रहातील पण ह्या मुलांनाही आपले विचार एकमेकांशी शेअर करायला हवे. शेवटी लग्न त्यांना करायचं आहे. काय म्हणता.”
“हो, हो.. अगदी खरं…”
तिघांनीही दुजोरा दिला.
“जा वंदू, अमितला आपलं टेरेस दाखव की..”
सारिकाने वंदिताला सांगितलं तशी दोघेही टेरेसच्या दिशेने निघाले.
प्रत्येक पावली त्यांना आपापल्या हृदयाची धडधड ऐकू येत होती. वंदनाने टेरेसच दार उघडलं. दोघेही बाहेर येताच गुलाबाचा हलकासा वास दरवळू लागला.
“तुम्ही गुलाब लावले आहेत..?”
अमितने विचारलं.
“हो… हे काय इथे..”
वंदिताने हाताच्या इशाऱ्याने दाखवलं. अमित गुलाबाच्या रोपट्याजवळ गेला आणि निरखून पाहू लागला.
“छान फुलला आहे… अजून दोन कळ्या ही आहेत दोन दिवसात त्याही फुलातील..”
“तुला आवड आहे ह्याची..?”
“हो, आपल्या घरी आहे ना माझी एक छोटीशी बाग…”
नकळतपणे अमित ‘आपलं घर’ बोलून गेला आणि वंदिता शहारली.
“इथे हे सगळं कोण बघत… तू?”
“नाही… बाबा… त्यांना आहे आवड गार्डनींगची..”
“आणि तुला…?”
“होईल… हळूहळू…”
दोघांची नजरानजर झाली आणि पुन्हा दोघे अवघडले. पुन्हा शब्दांची शोधाशोध सुरू झाली. मगासपासून ह्याच संधीची वाट बघणाऱ्या अमितला आता काहीच सुचत नव्हते. अखेरीस वंदिताने सुरुवात केली.
“तू दहावी नंतर गायबच झालास एकदम…?”
“हो, बाबांची पोस्टिंग झाली… नगरला. माझ्या दहावीच्या शिक्षणासाठी थांबले होते ते. मग बारावी पर्यंत तिथेच होतो. कॉलेजसाठी मग मी परत मुंबईतच आलो. मग इथेच होतो होस्टेलवर. अगदी आता आत्ता पर्यंत. मागच्याच वर्षी आई बाबा मुंबईत आले त्यानंतर घरीच.”
“मग काय आवडलं जास्त. हॉस्टेल लाइफ की घरी..”
“दोन्ही…”
“दोन्ही..?”
“जी गोष्ट मनात बसते ना, ती आवडतेच…”
अमितच्या बोलण्यामागचा अर्थ समजून वंदिता आतल्या आत लाजून चुर झाली. कशीबशी स्वतःला सावरत ती कठड्यापाशी उभं राहून बाहेरच्या दिशेने बघत म्हणाली.
“अजूनही काही आवडलं आहे का..?”
तिच्या विचारल्या प्रश्नाने आपल्या मनातले भाव तिच्या पर्यंत अचूक पोहचले याची अमितला खात्री झाली. तिच्या दिशेने येत तोही तिच्या बाजूला उभा राहून बाहेर बघत म्हणाला.
“हो… प्रभाकर काकांचा हा गुलाबी रंगाचा गुलाब..”
क्षणभर काहीच न कळल्यामुळे गोंधळलेल्या वंदिताने अचानक स्वतःकडे आणि तिने घातलेल्या गुलाबी ड्रेसकडे पाहिलं आणि तिची नजर कठड्यावर खिळली. अमितचा हात तिच्या हाताला अगदी लागून होता. जणू तो हात पकडायची परवानगी मागत होता.
वंदिता गार पडली हळूच स्वतःचा हात तिथून हलवून झोक्याकडे जात त्यावर बसली. अमित तिथेच उभं राहून तिला पाहत होता. त्याच्या नजरेने वंदिता अजूनच अस्वस्थ होत होती. विषय बदलत ती म्हणाली.
“तू सोशल मीडिया वर आहेस की नाही?”
“हो, आपल्या पिढीत अस कोण आहे जो ह्या जाळ्यात अडकला नाहीए?”
दोघेही हसले.
“पण तू दिसला नाहीस मला..?”
“तू शोधलस मला..?”
“का..? तू नाही शोधलं मला..?”
“शोधलं ना… आणि तू सापडलीस ही मला. पण तुझं अकाऊंट लॉक होत.”
“हम्म… फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली असतीस तर उघडलं असत लॉक..”
पुन्हा एकदा दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि हसू लागले.
इतक्यात सारिका गच्चीत आली. दोघेही झोपाळ्यावर बसले होते.
“झालं की नाही. आम्हाला ही त्या दोघांना घर दाखवायचं आहे म्हंटलं…”
अमित आणि वंदिता दोघेही हसायचे थांबले. बोलण्याची वेळ संपली पण इच्छा नाही अशी गत झाली होती दोघांची. बघता बघता मीरा, शेखर आणि प्रभारक ही गच्चीत आले.
“अरे वा! तुमची पण बाग आहे वाटत इथे आमच्या घरीही अमितने केली आहे छोटीशी बाग..”
आईच्या ह्या वाक्याने अमितला त्याच मगासच वाक्य आठवलं ज्यात तो वंदिताला आपल्या घरी अस म्हणाला होता. त्याने वंदिताकडे पाहिल आणि ती त्याच्या मनातलं तिला कळल्यासारखं गालातल्या गालात हसत होती. ते पाहून अमितला गुदगुल्या झाल्या.
त्याने लगेच आपला मोबाईल काढला आणि एफबीच पेज उघडुन वंदिताला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली तस तिच्या मोबाईल ची नोटिफिकेशन टोन वाजली. तिथे ड्रॅग करत पाहिलं
‘Amit Sirnaik send you a friend request’
तीने ही accept केली. दुसऱ्या मिनिटाला तिचा मॅसेंजर वाजला.
‘फोन नंबर..’ अमितचा मॅसेज
तिने वाचून मोबाईल बंद केला. अमितला काही कळेना. त्याने पुन्हा मॅसेज केला.
‘फोन नंबर..’
पुन्हा तेच. अमित कोड्यात पडला.
‘कदाचित तिला अजून कॉन्फरटेबल वाटत नाहीए का? की अजून तिचा काही डिसीजन झालाच नाहीए आणि आपण उगाच घाई करतो आहे.’
ह्या विचाराने अमितला मेल्याहून मेल्या सारख वाटलं.
‘शीट! तिला आपलं किती डेस्पो वाटत असू. मी जरा जास्तच घाई केली का..? शीट!शीट! शीट!’
अमित मनातल्या मनात स्वतःलाच शिव्या देत होता.
अखेरीस निरोप घ्यायची वेळ आली. मीरा वंदिता जवळ येत म्हणाली.
“आता लवकरात लवकर घरी ये. कायमची..”
मीराने तिच्या कपाळाचा मुका घेतला. इथे अमित सारिका आणि प्रभारकच्या पाया पडला.
“चला काका, काकू येतो..”
प्रभारक नेही अमितला मिठी मारली. वंदिताने ते पाहिलं
“खूप छान वाटलं बेटा तुला भेटून… सुखी राहा..”
सगळे हॉलमध्ये आले. अमित दाराबाहेर पडून फ्लोटर्स घालू लागला. त्याने केलेला मुर्खपणा त्याच्या डोक्यातून जाता जाईना. मीरा आणि शेखर ही दारातून बाहेर पडणार, तोच वंदिताने मागून हाक मारली.
“आई…”
“काय ग?” सारिका म्हणाली.
“मीरा आई…”
तिच्या वाक्याने सगळे तिच्याकडे पाहू लागले. वंदिता पुढे आली. मिराकडे बघत म्हणाली.
“तुम्हीच म्हणाला होता ना की या पुढे तुम्हाला मावशी म्हणायचं नाही म्हणून… नमस्कार करते.”
तिने शेखरला आणि मिराला नमस्कार केला.
तिच्या डोक्यावरून हात फिरवत मीरा म्हणाली.
“मग अजून एक ऐक, मला ए आई म्हणायचं.. हम्म..”
मीराने वंदिताला मिठीत घेतलं. वंदिताची नजर दाराबाहेर जिन्यावर उभ्या असलेल्या अमितकडे गेली. तो एकटक तिच्याचकडे पाहत होता.
मीरा, शेखर आणि अमित, काळे कुटुंबाचा निरोप घेऊन गाडीत बसले. अमित गाडी चालू करत असताना त्याच्या मोबाईलवर मेसेंजरची टोन वाजली. त्याने स्क्रीन ड्रॅग केली आणि नाव बघताच पटकन मेसेंजर ऑन केला.
वंदिताचा मॅसेज होता. तिने तिचा नंबर पाठवला होता आणि सोबत दोन स्माईलीज…
लेखिका : रेणुका दीक्षित जोशी
Leave a Reply