हल्लीच्या बदलत्या काळात आरोग्याबाबत जागरूक लोकांमध्ये रोज नियमितपणे सायकल चालवणे हे मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. आज आपल्या आजूबाजूला खूप मोठ्या संख्येने लोकं चांगल्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी सायकल चालवत आहेत. सायकलींग एक साधा आणि सोपा असा व्यायामाचा प्रकार असून ज्याने शरीराच्या सर्व मांसपेशींची योग्य प्रमाणात हालचाल होते. त्यामुळे आपले शरीर कोणतेही काम करण्यासाठी सदैव तत्पर राहते. पण सायकल चालवण्याचे आणखीही अनेक फायदे आहेत ते आपण आज जाणून घेऊयात.
हृदयाचे आजार
आजकाल सर्वच वयोगटातील अनेक लोकांना हृदयासंबंधीच्या आजाराने ग्रासलेले आपल्याला दिसून येते पण नियमित सायकल चालवून हृदयासंबंधीचे आजार दूर करण्यासाठी आपल्या शरीराला सायकलची खूपच मदत होते. तज्ञांच्या संशोधनातून असा खुलासा झाला आहे की, नियमित सायकल चालवल्याने हृदय रोगांचा धोका ४६ टक्के कमी होतो, तर रोजच्या रोज नियमित पायी चालण्याने हृदय रोगांचा धोका २७ टक्के कमी होतो.
कॅन्सरचा धोका कमी होतो
सायकलींग केल्याने हल्लीच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढत चाललेल्या कॅन्सरसारख्या गंभीर आजारापासूनही बचाव होऊ शकतो. नुकत्याच झालेल्या शोधातून ही बाब समोर आली आहे की, रोजच्या रोज सायकलींग केल्याने कॅन्सरचा धोका खूप मोठ्या प्रमाणात कमी होतो. हा अभ्यास ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित करताना तब्बल २ लाख ६४ हजार ३७७ लोकांवर हा अभ्यास केला गेला आणि अंतिमतः अभ्यासकांनी सांगितले की, ऑफिसमध्ये किंवा इतर ठिकाणी सतत एकाच जागी बसून काम करणाऱ्या लोकांनी नियमितपणे सायकल चालवल्याने कॅन्सरचा धोका ४५ टक्के कमी होतो.
वेगाने बर्न होतात कॅलरी
जर आपल्याला आपले वाढलेले वजन योग्य प्रकारे कमी करायचे असेल तर त्यासाठी साधारण प्रत्येक आठवड्यातून कमीत कमी २ हजार कॅलरी बर्न कराव्या लागतात. पण जर आपण नियमितपणे सायकल चालवली तर प्रत्येक तासाला ३०० कॅलरी बर्न होतात. अशा वेळेस तुम्ही जितकी जास्त सायकल चालवाल तितक्या जास्त कॅलरी बर्न करून वाढलेले वजन योग्य आहाराच्या मदतीने लवकरात लवकर तुम्हाला कमी करता येईल.
बेली फॅट कमी होते
नियमितपणे सायकल चालवल्याने आपला हार्ट रेट तर वाढतोच पण आपल्या शरीरातील कॅलरीही चांगल्या प्रकारे बर्न होण्यास खूपच मदत होते. नियमित सायकल चालवल्याने शरीरातील सर्वच भागातील फॅट कमी व्हायला सुरुवात होते. यात बेली फॅटचाही समावेश होतो.
— संकेत रमेश प्रसादे
Leave a Reply