एकाच प्रसंगाच्या आसपास दोन सुंदर रचना ऐकायला मिळाल्या. पूर्वापार ऐकत आलोय तरीही तू-नळीच्या कृपेने एकीचा चक्क भावपूर्ण व्हिडीओ पाहायला मिळाला. प्रसंग समांतर भावनांना वेढून उरलेला आणि दोन्ही गायिका, दोन्ही गीतकार,दोन्ही संगीतकार एकाच तोलामोलाचे आहेत म्हणून की काय उन्नीस-बीस करायला मन धजावत नाही.
“समाधी घेऊन जाई ज्ञानदेव ” या अशोकजी परांजपेंच्या शब्दांना सुमन कल्याणपूर यांनी चित्रबद्ध शैलीत सादर केलंय – जणू आपल्या नजरेसमोर माऊली समाधी घेण्यासाठी सिद्ध झालीय अशा शब्दा-शब्दातून तो प्रसंग जिवंत झालाय. गंमत म्हणजे हा व्हिडीओ पाहिला आणि नंतर डोळे मिटून पुन्हा गाणे ऐकले. काहीही फरक नाही शब्द-सुरात आणि पडद्यावरील दृश्यात ! ही सर्वांगीण तन्मयता भान हरपून टाकणारी आणि नकळत ” नीर वाहे डोळा ” अशी अवस्था झाली आणि “सोपान मुक्ताई जाहली व्याकुळ ” ही स्थिती समजली. संगीतकार कमलाकर भागवत काहीसे अप्रसिद्ध पण ते नवखेपण रचनेत आढळत नाही. ज्ञानाचा पुतळा तेजी विसावताना त्यांनी एकसंधपणे साकार केला. अशोकजी संतरचनेच्या आसपास पोहोचले आहेत आणि सुमन कल्याणपूर यांच्याबद्दल काय बोलायचे?
दुसरे गीत खुद्द माउलींच्या तोंडून वदविले आहे- ” आता लावा लावा शिळा “. उषाताई मंगेशकर यांच्या सुरेल स्वरांमध्ये पराकोटीचे हळवेपण,कातरपण उतरले आहे. अर्थात घटनाही त्याच तोलामोलाची आहे. पाडगावकरांचे भावपूर्ण शब्द आणि काहीशा दुर्लक्षित राहिलेल्या विश्वनाथ मोरेंचे संगीत या गीताला निरोपाचे कोंदण देतात. ” मुक्ते आसू तू आवर ” अशी चित्कलेची जशी समजूत काढलेली आहे तद्वत “निवृत्ती हे हो काय,अहो येणारा तो जाय ” असं आश्चर्ययुक्त आदरार्थी संबोधन आहे. जातानाही ” येतो येतो देवा ” म्हणत असताना ज्ञानाची कवाडे माऊलींना खुणावत असतात.
स्तब्ध करतात दोन्ही गाणी ! आपण फक्त आरती प्रभूंच्या सूरात सूर मिसळत म्हणायचे- ” दाद द्या आणि शुद्ध व्हा ! ”
संगीतातील सचैल स्नान असे अंतर्बाह्य शुद्ध करणारे असते.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply