मिळवावे तिकीट, दावूनि धाक, पक्षांतराचा,
चेपावे, पाय कुणाचेही, धर बंधना कशाला ।
कधी
न मिळतां तिकीट भार्येस, आग्रह मेव्हणीचा,
घट, ओत-प्रोत येथे, असा हा घराणेशाहीचा ।।
असा हा घराणेशाहीचा ।।१।।
पाडुनि पाऊस, भरघोस अश्वासनांचा,
दंग ते, झुलविण्या, स्वप्न-रंजनीं जनांना ।
अन्
येतांच सत्तेवरी, संकेत सारे विसरण्याचा,
देई करुनि, वाट मोकळी, जनांच्या आसवांना ।।
जनांच्या आसवांना ।।२।।
वेशेवरी सत्तेच्या, टांगली, अवघी नीतिमत्ता,
शब्द ओठीं, मतांसाठी, मृदु-लाघवी, वारेमाप ।
परी
आतूर अंतरीं, हडपण्या, जनांची मालमत्ता,
करुनि ऐषो-आराम, अरे, कुठे फेडणार पाप ।।
अरे कुठे फेडणार पाप ।।३।।
निवडूनि तुम्हां, जनदेती मान, राजेपणाचा,
व्हावा पाठपुरावा, आणण्याचा, राम राज्याला ।
आस मनीं,
दाखवावा, बाणा तुम्ही त्या शिवरायाचा,
यावा पुढे, कुणीतरी, तयां, हे सांगण्याला ।।
तयां, हे सांगण्याला ।।४।।
-गुरुदास / सुरेश नाईक
२८ मार्च २००९
शनिवार, मुलुंड (पू.), मुंबई ४०००८१
— सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास
Leave a Reply