डास उडत असताना त्याच्या डोळ्यातील संवेदना पेशी व मिशांवरील Thermal Receptors यांचा सुरेख मेळ घालून, एखादे विमान जसे धावपट्टीवर उतरावे त्याप्रमाणे ते अलगत आपल्या भक्ष्यावर बसतात. तोपर्यंत त्यांचे गुणगुणणे चालू असते. बसण्याच्या क्रियेत स्थिरता येण्यासाठी पंखांची मदत होते. डासाच्या सोंडेच्या दोन्ही कडा धारदार पाती सदृश असतात. यांच्या मदतीने एखादी Intradermal Syringe ची Needle (लहान इंजेक्शनच्या पिचकारीची बारीक सुई) जशी त्वचेत घुसते; तशीच डासाची सोंड शरीराच्या कातडीवरील सूक्ष्म पेशी कापत आत शिरते. या सोंडेचा उपयोग आता एखाद्या पेय पिण्याच्या पोकळ काडीसारखा (Straw) करण्यात येणार असतो.
आत शिरता शिरताच सोंडेतून एक प्रकारचा द्राव डासाकडून सोडला जातो. या द्रावातील रसायनामुळे मनुष्याच्या कातडीचा तो भाग तात्पुरता बधिर केला जातो.व त्यामुळे माणसाला डास बसल्याचे जाणवत नाही. आता डासाला व्यवस्थित पणे आपले काम साध्य करण्यासाठी अचूक दिशा व थोडासा वेळ मिळतो. यानंतर सोंडेचे तोंड सर्व पेशी समूहातून रक्त केशवाहिन्यांच्या पोकळीत जाणे आवश्यक असते. कारण डासाच्या दृष्टीने त्याला असलेली रक्त मिळविण्याची गरज ही पहिली महत्त्वाची गोष्ट आहे. आता सोंडेतून दुसरा द्राव सोडला जातो ज्यातील रसायनामुळे मनुष्याच्या रक्ताची गुठळी बनण्याची प्रक्रिया थांबते. त्यामुळे सोंडेतून शोषलेला रक्तप्रवाह सलग वाहता राहतो. पहिल्या चाव्यात रक्त सोंडेच्या आत आले नाही तर डास सोंडेची जागा थोडी सरकवतो व रक्ताचा प्रवाह खंडित होत नाही ना याची खबरदारी घेतो. एकदा रक्त प्रवाह सुरू झाला की त्याच स्थितीत बसून डास रक्तशोषणाची त्याची क्रिया शांतपणे चालू ठेवतो. परंतु निसर्गाने फक्त स्वतःसाठी रक्त मिळवणे एवढीच जबाबदारी डासावर सोपवलेली नाही. त्याच्या लाळग्रंथीत मलेरियाचे वाढलेले परोपजीवीमनुष्याच्या रक्तात व्यवस्थित पणे नेऊन सोडणे हे एक अतिशय महत्त्वाचे कार्य डासाकडून निसर्ग बिनबोभाट पार पाडीत असतो. यासाठी डासाच्या सोंडेत एक झडप असते. रक्त शोषून घेताना लाळग्रंथीतील लाळरसालाही झडप रोखून ठेवते. रक्त शोषण्याची क्रिया एकदा पूर्ण झाली की झडप उघडली जाते व नंतर परोपजीवांना मनुष्याच्या रक्तात शिरण्याचा मार्ग मोकळा होतो. हे सर्व काम यशस्वीपणे पार पाडल्यानंतर डास माणसाच्या शरीरावरुन उडतो व आपल्या रोजच्या भ्रमंतीत रममाण होतो. डासाच्या लाळग्रंथी मधील द्रावात अनेक तर्हेची प्रथिने असतात ज्यांचा मलेरियाचे परोपजीवी डासाच्या स्वतःच्या शरीरात वाढण्यास उपयोग होतो व त्या वाढलेल्या परोपजीवांमध्ये माणसात मलेरिया हा रोग निर्माण करण्याची क्षमता येते. भावी काळात प्रतिबंधक लस निर्माण करण्यासाठी या द्रावातील प्रथिनांच्या संशोधनाचा उपयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हजारो माणसांमधून बरोबर आपल्यासाठी योग्य असे यजमान डास कसे शोधतात, त्यासाठी त्यांना मार्गदर्शन कसे व कुठून मिळत असावे हे प्रश्नचिन्ह माणसापुढे आजही, अजूनही आहे. निसर्गतः मिळालेली ही देणगी डासांसाठी हजारो वर्षे तशीच चालू आहे. डासांच्या आयुष्याची दोरी अंदाजे फक्त दोन ते तीन आठवडे, परंतु वातावरणातील तापमान , हवेतील आद्रता, खेरीज माणसांनी वापरलेले विविध प्रतिबंधक उपाय यामुळे ते केव्हाही नष्ट होतात. असे असूनही या डासांचे जीवनचक्र पृथ्वीतलावर अखंड चालू आहे. डासाची ज्ञानेंद्रिये अतिशय तीव्र असतात. त्याच्याजवळ असलेल्या दृक, गंध व तापमान या तीनही संवेदनांचा उपयोग करून डास आपले आश्रयस्थान अचूकपणे शोधून काढतो. मनुष्याजवळ पोहोचल्यावर डासांच्या गंध संवेदना अधिक कार्यक्षम होतात. माणसाच्या शरीरात होणाऱ्या चयापचयाच्या प्रक्रियेमुळे शेकडो प्रकारची रासायनिक द्रव्ये त्वचेवाटे बाहेर पडत असतात. तसेच असंख्य प्रकारचे वायू श्र्वसनाक्रियेतून बाहेर येत असतात. याठिकाणी डासाला त्याच्या गंध व तापमानाच्या संवेदनांचा उपयोग होतो. माणसाच्या त्वचेवरील तापमान, आर्द्रता व गंध डासांना आकर्षून घेतो. म्हणूनच असे म्हणतात की डासांना काही व्यक्तींचेच रक्त अधिक भावते ते काही अंशी खरेही आहे. परंतु त्याचबरोबर असेही आढळून आले आहे की काही व्यक्तींना डास अजिबात चावतच नाहीत. खरेतर हा एक संशोधनाचा विषय आहे.
— डॉ. अविनाश केशव वैद्य
Leave a Reply