
अस म्हणतात की शेवटच्या काळात माणसाला आपल्या चुकांची, पाप पुण्याची, आत्मपरीक्षण करण्याची इच्छा होते. आणि आज माझ्या बाबतीत असेच झाले आहे. आता जून महिन्यात शाळा सुरू होणार असून त्यासाठी मुलांना गणवेश. इतर शालेय वस्तू आणण्यासाठी आईबाबांची लगबग सुरू होते. काल नातू वरद म्हणजे कान्हा माझा हा बाजारात जाऊन हे सगळे आणले. ते दाखवत असताना मी त्याला म्हटले की कान्हा मी तुला डब्यात काही करुन देऊ शकत नाही पण डबा घेऊन देते तुला म्हणून त्याचे पैसे द्यायचे ठरवले आहे. आता या डब्याची किंमत आणि ते पाहून माझाच मला राग आला होता….
माझ्या लहानपणी डबा हा प्रकार नव्हता. साडेदहा ते साडे चार अशी शाळा. सकाळी गरम गरम जेवण करून जायचे मधल्या सुट्टीत खेळणे. शाळेत पाण्याची सोय होती. घरी आल्यावर कपडे बदलून थोडे काहीही खाऊन खेळायला जाणे. परत रात्री गरम गरम जेवण आणि झोप. त्यामुळे डब्याचा आनंद कसा असतो हे माहित नव्हते. मात्र माझ्या मोठ्या मुलीला मी डबा घेऊन दिला होता तो ती पाचवीत असताना. तोपर्यंत ती माझ्याच शाळेत होती म्हणून माझ्याच डब्यात आणलेले जेवायची. दुसर्या शाळेत गेल्यावर तिला डबा आणायला बाजारात गेलो. आणि दुकानात हिंडालियमचा डबा घेण्यासाठी किंमत विचारली. पाच रुपयाच्या आत असावी. छोटा गोल चपटा. मुलीच्या चेहर्यावर आनंद नव्हता तिला स्टिलचा हवा असेल. पण मी तिला म्हटले. हा डबा घेऊन जात जा हरवला तरी काही फरक पडत नाही. ती काय बोलणार. आणि त्यावर नांव टाकून घेतले. किती वाईट वागले ना मी. डबा हरवेल म्हणून मी तिचा आनंद हरवून बसले हे माझ्या लक्षात आले नाही त्या वेळी आणि आजही तिच्या कडे हा डबा आहे तिने हरवला नाही. उलट जपून ठेवला आहे तिला सकाळी मेसेज केला होता असेल डबा तर फोटो पाठव तिच्या कडे डबा आहे पण माझ्या कडे….
माझी सगळी मुलं मांडी घालून किंवा पालथी मांडी घालून वाचायची लिहायची. आणि जेंव्हा माझी पहिली नात शाळेत जायला लागली तेव्हा मी तिला डेस्क आणि नंतर टेबल खुर्ची घेऊन दिली होती. कारण तिच्या पाठीत दुखेल म्हणून. आणि माझ्या मुलांच्या बाबतीत मी हा विचार का केला नाही याची खंत वाटते आता मुलापेक्षा नातवंडावर जास्त माया प्रेम असते हे मान्य आहे पण इतकी निष्ठुर का हे माझे मलाच कळत नाही. आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती पण मी करु शकले असते की नाही माहित नाही पण आता मात्र अपराधी असल्याचे जाणवते. त्यामुळे मनातून याच नव्हे तर अनेक गोष्टी होत्या मुलांनी एकमेकांच्या वस्तू वापरल्या होत्या. खरच मी एक आई म्हणून कमी पडले असेल तर मुलांनो मला समजून घ्या आणि जमल्यास माफ करा.खरच अगदी मनापासून सांगते बाळांनो मला माफ कराल ना? आणि आता एवढी मोठी किंमत मी देणार आहे हे असे का? कारण मला आता नातवाच्या चेहर्यावर हसू आणि आनंद दिसणार आहे म्हणून. कितीही मनाला आवरल तरीही माझ्या चुकांचा लेखाजोखा मांडला आहे म्हणून माझी झालेली चूक किंवा जे काय असेल ते ते क्षम्य नाही पण आज मन मोकळे करत आहे. मन मोकळे झाले की ते डोळ्यातील पाण्याबरोबर घळाघळा वहात असते. आणि तेच झाले आहे माझ्या बाबतीत…
— सौ. कुमुद ढवळेकर.
Leave a Reply