साधू वासवानी मिशनचे संस्थापक, सिंधी समाजाचे आध्यात्मिक गुरू हा लौकिक परिचय असलेले दादा जे. पी. वासवानी यांनी शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात अनमोल योगदान दिले. त्यांचा जन्म २ ऑगस्ट १९१८ रोजी पाकिस्तानमधील सिंध प्रातांतील हैदराबाद येथे झाला. जे. पी. ऊर्फ जशन पहलाजराय वासवानी असे त्यांचे मूळ नाव. आध्यात्मिक गुरू साधू वासवानी यांचे ते पुतणे होते.
साधू वासवानी यांच्यासमवेत १२ नोव्हेंबर १९४८ रोजी दादा भारतामध्ये आले. ‘इंडियन डायजेस्ट’ आणि ‘ईस्ट अँड वेस्ट सिरीज’ या मासिकांचे संपादन करणाऱ्या दादांनी १९६२ ते १९७६ या कालावधीत सेंट मीरा कॉलेजचे प्राचार्य म्हणून काम पाहिले. २५ नोव्हेंबर १९८६ या साधू वासवानी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ‘शाकाहार दिन’ ही चळवळ दादांनी सुरू केली. दादा जे. पी. वासवानी यांनी शाकाहारासाठी देश-विदेशात प्रचार केला. जे. पी. वासवानी हे अविवाहित होते. त्यांचे भौतिकशास्त्रात त्यांनी एमएस्सीपर्यंतचे शिक्षण झाले होते. त्यानंतर एल.एल.बी.चीही पदवी संपादन केली होती.
दादा जे. पी. वासवानी यांच्या आयुष्याचा सारांश ‘प्रेम’ या शब्दात होते. लहानपणाासून त्यांच्यात सेवा आणि दयेचा अंकुर विकसित झाला होता. अत्यंत बुद्धिमान अशी त्यांची ख्याती होती. केवळ सतराव्या वर्षी त्यांनी एमएस्सीची पदवी प्रथम क्रमांकाने संपादित केली होती. भौतिकशास्त्रातील प्रबंधांची त्यावेळचे नोबेल विजेते सर व्ही. व्ही. रामन यांनी प्रशंसा केली होती. वासवानी यांचे इंग्रजी; तसेच सिंधी या भाषांवर प्रभुत्व होते. ते सतत वाचन व मननात मग्न असत. जगातील प्रख्यात लेखकांच्या पुस्तकांतील परिच्छेद ते आपल्या भाषणांतून नेहमी सांगत असत. दादांची राहणी साधी होती.
अंगात पांढरा शर्ट, पायजमा, पांढरी शाल आणि पायात साधी चप्पल. हसरा चेहरा आणि चमकदार डोळे, मोठे कान ही दादांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये होती. दिलखुलास हास्य आणि अंगभूत समयसूचकतेने ते इतरांची मने जिंकून घेत. हसताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जणू ओसंडून वाहात असे.
दादा जे. पी. वासवानी यांनी साधू वासवानी मिशनतर्फे अनेक सामाजिक कार्यांना प्रारंभ केला. त्यांनी स्त्री शिक्षणाला प्राधान्य दिले होते. सेंट मीरा स्कूल व कॉलेज सुरू केले. त्यांनी इंग्रजी, सिंधी भाषेत सुमारे १९० पुस्तके लिहिली. देशभरात १८ शाळा काढल्या, तर पुण्यात इनलॅक्स बुधरानी हे हॉस्पिटल; तसेच शांती क्लिनिकदेखील सुरू केले.
विदेशी भाषेत त्यांच्या पुस्तकांचे अनुवाद झाले आहेत. जगातील अनेक नामांकित नेत्यांसह धर्मगुरू त्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधत असत. त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. दादा जे. पी. वासवानी यांचे १२ जुलै २०१८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply